थरथरत असतात
जुन्या कवितांतली अक्षरे,
कागदाची शंभर टक्के
खारपड जमीन पोटातून
धडधडू लागते,
गलोरीला निर्णायक खेच
मिळू लागते,
कवितेच्या परिसरात
कवीची भेलकांडलेली
पावले पडतात
तेव्हा कविता
कल्लोळून उठते,
जुने शब्द उन्मळून पडतात,
जमिनीच्या थरांची थारेपालट होते,
गलोरीचा ताण सुटतो,
कवी हृदयाजवळच्या खिशातून
पेन काढून
कोऱ्या तावावर टेकवतो :
एक पांढरा बिंदू
निळा होतो. चमकतो.