स्वप्नातल्या कळ्यांनो-भाग १

सूचनाः ह्या कथेतील सर्व पात्रे काल्पनिक आहेत. कुणाशी साधर्म्य असल्यास योगायोग मानावा.

 

स्वप्नातल्या कळ्यांनो

              संगणकशास्राच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा तास संपवून शैलेशने आपल्या अध्यापक कक्षात पाऊल टाकले. घड्याळ्याकडे नजर जाताच त्याने चटकन" अरे, आज उशीर तर झाला नाही ना ?"असे म्हणत याहू निरोपकावर आलेले निरोप पाहिले. प्राची, आसावरी, आदिती, वैदेही सगळ्याजणी एका संभाषणकक्षात येऊन आपली वाट पाहतं असतील आणि उशीर केल्याबद्दल"काका, तुम्ही असे कसे विसरलात ?"असे ऐकावे लागेल याची त्याने तयारी ठेवली होती.  मित्रमंडळींशी याहू निरोपकावर फ्रेंच भाषेवर चर्चा व वाद विवाद करण्याची त्यांची नेहमीची वेळ होऊन गेली होती तरी अजून कोणाचाच पत्ता नव्हता. "काही न सांगता सगळ्या गायब कश्या झाल्या?" अशा विचारत शैलेश होता तेवढ्यात निरोपकावर"काय काका आहात का?"असे विनीत ने लिहिले.
"विनीत,तू कसा आहेस? सगळ्या मुली सोडून माझ्या मागे कसा काय लागलास रे बाबा?"

"काका, उगीच मला चिडवता तुम्ही!"
उगीच?कोण विचारत असत मला, नम्रता काय करते आणि विद्या कुठे असते?"
"काका, काल सचिनची बॅटींग पाहिली का? काय धावांचा पाऊस पाडला आहे त्याने. जबरी!काका तुम्ही क्रिकेट खेळला आहात का हो?"
"विनीत, विषय कसा बदलायचा ते तुझ्याकडून शिकायला हवे. आपले म्हणणे पटवून देण्यात तुझा हात कोणी धरू शकणार नाही.मग कुठे अडते आहे रे?"
"मामा आहेस का? "निरोपकाच्या दुसऱ्या खिडकीत निकीताचा निरोप.
"मामा तुझा लेख वाचला, धमाल आहे, कसे सुचते रे तुला एवढे सगळे?आम्ही इथे काही लिहा, तुझा लेख वाचला की सगळे काय छान! सही! असे करायला लागतात. मी लिहिणारच नाही आता.
"निकीता, अग तू लिहीत रहा. छान लिहितेस, आणखी वाचन वाढव, तुझे तूच बघ, किती फरक झाला आहे तुझ्या लिखाणात! असे नाही म्हणून कुठे पळून जाणार आहेस?"
"आजोबा आहात का?आजी कशा आहेत?"नववीत असलेल्या वरूण ने सल्ले देणाऱ्या शैलेशला "आजोबा" केले होते.
"आहात का?"आणखी एक निरोपक खिडकी सुरेशने उघडली होती.
"तुम्ही कुठे असता? काय करता? मी व्यवस्थापन क्षेत्रात आहे, नोकरी बदलायची म्हणतो, काही मदत करू शकाल का तुम्ही?"
"सुरेश आलोच ह मी" असे म्हणून शैलेशने संभाषण खिडकी बंद केली.

              अनेकांच्या प्रश्नाना उत्तरे देण्याची व त्याच्या बरोबर संभाषण सुरु ठेवण्याची, तसेच प्रश्नांना टाळून संभाषण युक्तिने बंद करण्याची ही कला आता शैलेशने आत्मसात केली होती. त्याच्यासारखाच विविध विषयात रस असणाऱ्या लोकांच्या याहू गटांमध्ये तो दोन वर्षापूर्वी सामील झाला होता तोच एका टोपणनावाने. त्याने आजवर तमाम मित्रमंडळींपासून आपले खरे रूप दडवून ठेवले होते. अर्थात अगदी काही मोजक्या मित्रांना हा लेखन करतो ह्याची कल्पना होती. त्या मित्रांबरोबर कधी भेट झाली की मित्रमंडळींचा आवडता मुद्दा असे विशेषतः स्त्रियांचा ह्याची माहिती विचारण्यात असलेला पुढाकार!  त्याने लोकांची कशी गंमत केली, मग कसे वादविवाद झाले हा चर्चेचा आणि गप्पांचा मुद्दा असायचाच. आपुलकीने शैलेशने सगळ्याची माहिती मिळवली होती पण आपली एवढीही माहिती न सांगता. कुणातही न गुंतण्याची कला त्याला काही अंशी नक्की साधली होती.
"काका, बॉसचा फोन"विनीत ने निरोप पाठवला.
"ठीक आहे बोलू आपण नंतर" शैलेशने मुलांच्या पपरवर्क वर नजर टाकत असताना विनीतला निरोपकावर उत्तर लिहिले.

 

              पुढच्या आठवड्यात सेमिनार आहेत, त्यापुढील आठवड्यात संशोधनाच्या निमित्त्याने अमेरिकेची वारी, जेटलॅग जायच्या आतच पुन्हा दिल्ली आय आय टीत एक कॉन्फ़रन्स, वाचनालयात मुलांना विज्ञान चर्चासत्र व गोष्टीचे वाचन. वयाच्या पंचेचाळीशीला पोहोचलेल्या शैलेशचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. अविवाहित असलेला शैलेश समाजापासून दूर न जाता लोकांमध्ये मिसळून वागत होता. त्यामुळे त्याला एकटेपणाची जाणीव सहसा होत नसे. बरोबरीच्या मित्रांचे "तुला कशाची काळजी? ना बायको ,ना मुले ,ना संसार !"असे टोपणे हसत ह्सत परतवण्याची त्याला सवय होती. मित्रांना व त्यांच्या मुलांना गरज असेल तेंव्हा धावून त्याने मदत केली होती. आता विविध गटांमुळे झालेल्या ओळखीने त्याचा संसार मोठा झाला होता असे म्हणायला हरकत नव्हती.  त्याला आपल्याला माणसांची गरज आहे हे जाणवले होते आणि म्हणूनच त्याने आपुलकीची ही चार माणसे जोडली होती. एकमेकांना न भेटता शैलेश त्याच्याबद्दल सर्व काही जाणत होता. आदितीचा परवा वाढदिवस आहे, तिला काय भेट द्यावी अशा विचारात शैलेश असताना शेजारचा फ़ोन वाजला.


                      "हॅलो, काका, मी मुग्धा बोलते आहे,बाबांना काल अपघात झाला, गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, आठवडाभर इस्पितळात राहावे लागेल."
"अरे बाप रे, कुठे धडपडला आता हा सुभाष?हे काय वय आहे का धाडस करण्याचे! वहिनी कशा आहेत ?
"काय? त्यांना पण मार लागला आहे?आई ग! मुग्धा मी येतोच. आणि एवढे सगळे झाल्यावर तू फोन करते आहेस?रागावलो आहे मी ! येतो आणि बघतो तुझ्याकडे! "
"तस नाही रे काका,मी आणि कुकुल बाळ नाही आता, शिवाय एकटी पण नाही, माझी आत्या आहे ना सध्या पुण्यात, ती आली मदतीला. म्हणून मी तुला कळवले नाही."
"ओके,अग तुझ्या हिमतीची तर दाद देतो मी. तू कशी आहेस?काकाची हिम्मतवान पुतणी आहेस! मी येतो लवकरात लवकर"असे म्हणून फोन ठेवून शैलेशने आपल्या वेळापत्रकाकडे एक नजर टाकली. आपल्या पुढील कार्यक्रमांमध्ये शक्य ते बदल करून शैलेश पुण्याला जायला निघाला.


                  संचेती हॉस्पिटल मध्ये असलेल्या कॅन्टिनमध्ये मुग्धा आपल्या आत्याशी, मानसीशी बोलण्यात मग्न होती. बाबांचे ऑपरेशन नीट पार पडले व आई देखील आता बरी होईल या विचाराने तणावमुक्त झालेली मुग्धा मानसीला नेहमीप्रमाणे शंभर प्रश्न विचारून भंडावत होती. साधारण चाळीशीच्या जवळ आलेली मानसी एका मल्टिनॅशनल कंपनीत मार्केटिंग विभागात मॅनेजर होती. हसतमुख चेहरा, पाणीदार बोलके डोळे आणि वागण्या बोलण्यात आत्मविश्वास असलेली आपली आत्या मुग्धाचा आदर्श होती. आत्यासारखे लेखन, वाचन, पोहायला जाणे सगळे मुग्धा शिकली होती आणि कौतुकाने मानसी तिला प्रोत्साहन देत होती. दोघीच्या राजकारण, कला, क्रीडा अशा विविध विषयांवरच्या चर्चा तासनतास रंगत. मानसी कामानिमित्त शिकागोला असली तरी तिचे फोन, इमेल, आणि निरोपक सुरु असल्याने मुग्धाला आपली आत्या आपल्याजवळ आहे असेच वाटे. सध्या कामानिमित्त सहा महिने मानसी भारतात आली होती, तेही पुण्याला! त्यामुळे दोघींच्या गप्पांना वेळकाळाचे भान नसायचे यात काही नवल नव्हते.

 

            बोलता बोलता ,'चर्चा स्त्रीने विवाह केल्यास ती आपल्या कार्यक्षेत्रात जास्त पुढे जाऊ शकते की अविवाहित राहून ?'असा मुद्दा आला. मानसीने विवाहित स्त्रीसुद्धा घराबाहेर कतृत्व गाजवू शकते असे मत मांडल्यावर मुग्धाने अनेक वर्षे मनात ठेवलेला प्रश्न मानसीला विचारला.
"आत्या तू का लग्न केले नाहीस?"
"लग्न करायचे नव्हते असे नाही, पत्रिकेत तो मंगळ आहे ना! त्याला घाबरून आपला जीव धोक्यात घालायला कुणी तयार झाले नाही बघ. जेंव्हा मंगळाचा प्रश्न मिटला त्यानंतर एकमेकांना आवडलो असेही झाले नाही. एक ना दोन, अनेक कारणे आहेत. आता या आयुष्याची सवय झाली आहे. तुझ्या वयाची मुले मुली सुद्धा आहेत आता माझ्या मित्रमंडळात.  एकटेपणा वाटू नये म्हणून आपण कामात गुंतवून घ्यायचं. अग एक पती पत्नी जशी एकमेकांची काळजी घेतील तसे कोणीच मिळणार नाही .पण जोडीदार तरी कुठे आयुष्याला पुरतो?काही असले तरी स्त्रीने लग्न न करता राहावे असे मत मी मांडणार नाही"
"आता कुणी लग्नाचे विचारले तर?"
" छे काही तरीच काय? मुग्धा, आता स्वतःच्या लग्नाचे पाहा, आत्याच्या नाही! "हा विचार आजवर कधी केला नव्हता पण त्याच विचाराने मानसीला मनावर खूप दडपण आल्यासारखे झाले. मुग्धाचे मन इतर विषयात गुंतवत मानसी बोलत राहिली. तर दुसरीकडे तिचे मन असे खरंच घडले तर आपल्याला हा बदल कसा हाताळता येईल या शंकेने ग्रासले होते.  'स्वप्नातल्या कळ्यांनो' हे मानसीचे आवडते गाणे कॅन्टीनमध्ये आकाशवाणीवर लागले आहे याचेही भान तिला राहिले नाही. मुग्धा ते गाणे ऐकताच मानसीला उत्साहाने आपल्या शैलेशकाका बद्दल सांगायला लागली.तो असा आहे तसा आहे ,तो हे गाणे छान गातो आणि बाबांना भेटायला तो येणार आहे  असे बरेच काही मुग्धा बोलत होती. मानसीचे मन मात्र वेगळाच विचार करत होते.

 

             शैलेशने आत आला तेव्हा सुभाष झोपला होता. नर्सकडे त्याने आपल्या मित्राची व वहिनींची आपुलकीने चौकशी केली. डॉक्टरांना भेटून त्याने शस्त्रक्रिया,उपचार व पुढे काय काळजी घ्यायला हवी याची माहिती मिळवली. मुग्धाला शोधायला म्हणून तो खोलीबाहेर पडणार तेवढ्यात मुग्धा आणि मानसी खोलीत आल्या.  मुग्धाने शैलेश व मानसीची ओळख करून दिली. आपला मित्र झोपेतून जागा झाला आहे असे पाहून शैलेशने त्याच्याकडे आपला मोर्चा वळ्वला.
"सुभाष कसा काय धडपडलास?"असे शैलेशने विचारताच मुग्धाने बोलायला सुरुवात केली.
"बाबा आईला मोटरसायकलवर दोन्ही हात सोडून त्यांनी बॅडमिंटनचा शॉट कसा मारला ते सांगत होते."
"शैलेश तुम्हीच सांगा,आता काय गरज आहे म्हणते मी उगीच या वयात स्पर्धात्मक खेळायची?आणि खेळायचे तर खेळायचे वरून मला सांगताना अगदी मोटरसायकल चालवतानाचाच मुहूर्त सापडला ह्यांना."
"वहिनी, दादा खेळतो मात्र छान माझा! अजूनही विशीच्या तरुणांना पाणी पाजू शकतो तो!फक्त आल्यावर "नयना, माझी पाठ जरा शेकून दे, पायाला मलम लावून दे. एवढंच तर मागणं करतो तुझ्याकडे! 
हो, जास्त थकलेला असतो म्हणून त्याचे घोरणे अगदी बाहेरच्या खोलीत ऐकू येते!आता वयोमानानुसार एवढे तरी होणार नाही का?"असे म्हणत मानसीने हसत शैलेशकडे नजर टाकली. मानसीचे काळेभोर कसे, बोलके डोळे, तिला शोभून दिसणारी फिकट रंगाची साडी, गळ्यातली सोन्याची साखळी आणि त्यात असलेले हिऱ्याचे पदक त्याच्या नजरेतून सुटले नव्हते. "वयोमानानुसार" म्हणताना मानसीने ज्या अर्थाने त्याच्याकडे पाहिले होते, त्याअर्थी तिने आपले वय ओळखले आहे हे त्याच्या ध्यानात आले. तिच्या नजरेतील भाव पाहून शैलेशला आपल्या चंदेरी होत असलेल्या केसांची आयुष्यात प्रथम जाणीव झाली.

 

           झटकन ते विचार बाजूला सारत शैलेशने "वहिनी,पाहा एवढ्या गप्पा मारल्या आपण की सुभाषला विसर पडला आहे आपल्या दुखऱ्या पायाचा! असे म्हणत विषय बदलला.
" चला, आता मला निघायला हवे नाहीतर शांतता पाळा असे म्हणत नर्स आत येऊन माझीच हकालपट्टी करायची. तुम्ही सर्वजण निवांतपणे माझ्याकडे या , सुभाष काही महिने खेळ बंद ठेवायचा आहे तेव्हा काय करायचे हा प्रश्न उभा राहीलच, त्याची आताच सोय करून ठेवतो."
"मुग्धा, तुला माझी नवीन प्रयोगशाळा बघायची होती ना. मग केव्हा येणार आहेस. "
"मानसी, माझे कार्ड आहेच तुझ्याकडे, जमेल तेव्हा फोन कर, मुंबईला कामानिमित्त आलीस आणि मुक्काम असेल तर जरूर कळव म्हणजे भेटता येईल. कुणी नातेवाईक आहेत का, मी पवईला असतो."
" चल, सुभाष येतो मी. "


                 सगळ्यांचा निरोप घेऊन शैलेश मुंबईला आला पण त्याचे मन मध्येच मानसीभोवती घोटाळत होते.  मुग्धाची बडबड सुरु होती आणि त्यात शैलेशचा उल्लेख होत होता.    त्याच्या कथा,विनोदबुद्धी, भाषेवरचे प्रभुत्व याच बरोबर त्याच्या स्वभाव वर्णनामुळे मानसी नकळत त्याचा विचार करू लागली होती. मुग्धाबरोबर तिचेही शैलेशशी फोनवर बोलणे, इमेल करणे सुरु होते. पुढील दोन महिन्यात मित्राची तब्येत पाहायच्या कारणाने शैलेश जसा येऊन गेला तशीच मानसीसुद्धा भावाला भेटायला त्याचवेळी येऊन गेली. दरवेळी गप्पा,गाण्याच्या भेंड्या, पत्ते, जुन्या आठवणी यात कसा वेळ जायचा ते कळायचे नाही. ह्या भेटींनंतर मानसी व शैलेश दोघेही एकमेकांचा विचार करू लागले होते.  तिने कामाच्या व्यापात स्वतःला गुंगवून ठेवले होते.

क्रमशः....
   -

 भाग दोन http://www.manogat.com/node/1950  

टीपः सध्या भाग २ लिहिते आहे त्यामुळे अप्रकाशित आहे तेव्हा वाचता येणार नाही, प्रकाशित झाल्यावर ह्या दुव्यावरून तो वाचाता येईल.