स्वप्नातल्या कळ्यांनो- भाग २

  भाग एक येथे वाचावा  http://www.manogat.com/node/1948/edit


स्वप्नातल्या कळ्यांनो   



                        गप्पाच्या ओघात शैलेशच्या तोंडून एक ओळखीचे फ्रेंच वाक्य ऐकल्यावर मात्र मानसी चपापली होती. तेवढ्यात "शैलेशभाऊजी एक गाणे म्हणा आता" असे वहिनींनी केलेल्या मागणीवर शैलेशने 'स्वप्नातल्या कळ्यांनो' गाऊन दाखवले तेव्हा गाणे मानसीच्या मनात अधिकच खोलवर रूजले. एकच गाणे दोघांना एवढे आवडावे?ते गाणे मानसीची पाठ केव्हा सोडणार होते कोणास ठाऊक?



                मानसी कार्यालयात बसून तिच्या आणि शैलेशच्या भेटीचा विचार करत होती. तिची आणि त्याची मते व्यवसाय, राजकारण, संस्कृती अशापैकी फ़ारच थोड्या विषयांवर जुळत होती. त्यांच्या कपडे, घर, नाटक सिनेमा व खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी मात्र त्यामानाने एक होत्या. दोघांनाही स्वतंत्र जीवनाची सवय झाली होती.


विचारमग्न मानसी खोलीतल्या एका मोठ्या तसबिरीकडे पहात होती. सोनेरी चौकटीतले शांत पाण्यात एखादा खडा पडताना उठणाऱ्या तरंगाचे ते चित्र मानसीच्या मनातील उठणाऱ्या तरंगांशी जणु स्पर्धा करत होते.


मानसी एक स्वतंत्र विचाराची स्त्री होती, स्वतःच्या पायावर उभी असणारी, आपल्या करियचा आपल्या यशाचा अभिमान असणारी. तर शैलेश एक नामवंत संशोधक व अध्यापक होता. त्याच्या मनमिळाऊ पण हेकेखोर स्वभावाने मित्रांमध्ये त्याचे अनेक खटके उडत. ह्या व्यतिरिक्त दोघेही आपापल्या छंदांची मनोभावे जोपासना करत होते. तडजोड, पडते घेणे, समजून घेणे असे वागण्याची त्यांना व्यावसायिक पातळीवर सवय असली तरी असे दैनंदिन जीवनात एकमेकांसाठी आपण तडजोड करू याची मानसीला खात्री नव्हती. 



                   दोघेही आपापल्या याहू गटातील मित्रमंडळींबरोबर गप्पा मारत होती पण काही तरी बिनसले होते हे मात्र खरे. मित्रांनी किती ही विचारपूस केली तेव्हा 'तब्येत ठीक नाही, कामाचा ताण जास्त आहे' अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली होती. "काका तुम्ही कुठे असता? काय करता?सांगा ना काय करता?"
त्यांच्याशी बोलताना शेखर कॉफ़ीचा हळुहळू आस्वाद घेत मगावरच्या चित्राकडे  पहात होता.  लोकांच्या या प्रश्नांनी त्याच्या ओठावर नेहमीचे हसू आले आणि त्याने ह्या प्रश्नांची उत्तरे देताना शैलेशने सवयीने "स्वप्नातल्या कळ्यांनो "लिहिले पण अचानक तो ते गाणे म्हणत असतानाचा मानसीचा चेहरा आठवून अधिकच भावुक झाला. 
                 मानसीचा शिकागोला परत जाण्याचा दिवस जवळ येऊ लागला तेव्हा शेवटी अखेर शैलेशने फ़ोनवर मानसीला आपल्या मनातले विचार सांगितले आणि लग्नाची मागणी घातली.
"असे एकदम विचारले म्हणून गडबडली असशील किंवा मी पण इतर पुरुषांसारखा निघालो असे म्हणून रागावली असशील तर मला ते मान्य आहे. "
या वाक्यानंतर मानसीने बाळगलेले मौन शैलेशच्या मनाला डागण्या देऊन गेले.
"तुला विचार करायला वेळ हवा असेल तर तसेही सांग. आपण नंतर बोलू" असे म्हणून त्याने फोन ठेऊन दिला.      


                      मानसीचा अमेरिकेला जाण्याचा दिवस उगवला तरी तिचे काहीच उत्तर नव्हते, नकारच असेल तर तिच्या तोंडून ऐकायची तयारी करून तिला विमानतळावर भेटायला शैलेश आला. नकार !..त्याने आयुष्यात २५व्या वर्षी असाच एक नकार अनुभवला होता. त्याचे शल्य काळाच्या उदरात लपवून शैलेश पुढे आला होता तरी त्या नकाराला विसरला नव्हता एवढे खरे. आणि त्यानंतरच्या प्रवासात त्याच्या तत्त्वांखातर आपुलकीच्या माणसांना त्याने अनेक छोटे नकार दिले होते.  तेही आठवून त्याला कसेसे वाटायला लागले. विमानतळावर मानसीला भेटून शैलेशने प्रवासासाठी तिला शुभेच्छा दिल्या. तिची बॅग उचलतना तो पुटपुटला,
"मानसी, अशी कोणती माहिती तू दडवते आहेस? मी दडवली आहे  असे तुला वाटते की ज्यामुळे तू मला तुझ्या प्रेमाच्या योग्य समजत नाहीस?"
विमानतळावरील लोक आपल्याकडे पहात आहेत, मानसीची प्रतिक्रिया काय होईल? याची पर्वा न करता शैलेशने मानसीचा हात हातात घेतला. तिच्या डोळयात खोलवर पहात म्हणाला
"काही प्रश्न विचार, बोल, नकार असेल तर सरळ सांग माझी तोही ऐकायची तयारी आहे. "   निर्विकारपणे हातातून हात सोडवून घेत मानसीने त्याला त्याच्या नवीन प्रयोगशाळेविषयी विचारले. असे विषयांतर करणे व महत्त्वाच्या गोष्टीला टाळणे त्याला काय समजायचे ते सांगून गेले होते.

               त्या काही घटका त्याला कित्येक युगाप्रमाणे भासू लागल्या. विमानाची वेळ झाली तेव्हा मानसी शैलेशच्या हातात एक कागद देऊन प्रवासाकरता चालू लागली. गजबजलेला विमानतळ असुनही त्या गर्दीत शैलेशला उदास विषण्ण वाटायला लागले. हातातला कागद फाडून भिरकावून द्यावा असे वाटले तरी त्याने संयमाने वाचायला सुरुवात केली.

"शैलेश उत्तर तुम्हाला माहिती असलेलेच आहे, तुम्ही जे नेहमी देता तेच
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा
गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा
मला या एकटेपणाची आणि स्वप्नांची सवय झाली आहे. लग्न कशासाठी करायचं? या वयात? लोक काय म्हणतील? मला तरी प्रेमाला, विश्वासाला पात्र होता येईल का?असे कित्येक प्रश्न आहेत मनात.  या अचानक येणाऱ्या सुखाच्या कल्पनेने मी धास्तावले आहे. आपल्या सुखाला कोणाची तरी दृष्ट लागेल या विचाराने अंगावर काटा येतो आहे. एकमेकाविषयीचा आदर असाच राहावा आणि ह्या अपूर्णतेतच जगावं अस वाटतंय. निदान काही काळ तरी. "


संताप, दुःख अशा विविध भावनांचा उद्रेक शैलेशच्या मनात उसळला होता. घरी जाण्याकरता शैलेशने गाडी सुरू केली. मानसीकरता आणलेला गुलाबाच्या कळ्यांचा शुभेच्छांचा गुच्छ गडबडीत शेखर कारमध्ये विसरला होता. पण त्या टवटवीत कळ्यासुद्धा शैलेशच्या मनाला उमलवायला असमर्थ होत्या.

 

                 प्रयोगशाळेत उशीर झाल्याने शैलेश धावत पळत आपल्या कक्षात आला आणि वैदेहीला कोणते उत्तर द्यायचे या विचारात त्याने निरोपकावर आलेले सदस्य बघितले.
"काका आहात का? आता आज उशीर झाला त्याचे कोणते कारण आहे?"इति वैदेही. एकापाठोपाठ एक अशा तीन चार याहू निरोपकाच्या खिडक्या उघडत होत्या.


"तुमचे नाव काय आहे? काय करता तुम्ही? काकू पण फ्रेंच बोलतात का हो?इति मंदार

मनातल्या मनात मंदार तुला काय करायचे काकू फ़्रेंच बोलोत का जर्मन असे आलेले उत्तर त्याने दडवले.
"बोलतो आहे,सगळ्यांशी बोलतो आहे ना मी ,म्हणून जरा उत्तर द्यायला वेळ झाला"असे म्हणत शैलेशने निरोपकावर मित्रमंडळीशी बोलायला सुरुवात केली होती. कितिही विनय आणि संयमाने तो

राजकारण, महायुद्ध, कथा ,क्रिकेट,शेयरबाजार अशा विविध विषयांवर तो बोलत होता. तरी मध्येच विचारलेले प्रश्न आणि काही उत्तरे याने त्याचे मन मानसीकडे धाव घेत होते. त्यावेळी लोकांना शैलेश मुद्दाम निरुत्तर करू लागला होता.लोकांना चिडवणे, मुद्दाम खोचक लिहीणे, अशा प्रवृत्तीला तो खतपाणी घालत होता. 

एक दिवस अचानक या लोकांमध्ये मानसी तर वावरत नसेल ना या विचाराने त्याच्या मेंदूला एक झटका बसला.  खरच ती तर दडली नसेल ना या कुणाच्या रूपाने?  मानसी....ह्या सगळ्यामध्ये  त्याची मानसी कुठे दिसते ते शोधू लागला......

 पावसाळ्यातल्या सायंकाळी पश्चिम क्षितीजावर लोप पावणाऱ्या सूर्याला आपल्या प्रवासाची पुढील दिशाच तर मिळाली नव्हती ना?...

समाप्त

सोनाली जोशी