शोलेची आग

काही दशकांपूर्वी शोले चित्रपटाने सारा भारत गाजवला आणि हिंदी चित्रसृष्टीत एक झंझावात निर्माण केला. काल आंतरजालावर मुशाफिरगिरी करत असताना कोठेतरी ''शोले''चे नाव वाचले आणि विस्मृतीत गेलेली एक जुनी आठवण ताजी झाली. छोटीशीच पण निरागस!
शोले चित्रपट येऊन गेल्यावर बर्‍याच वर्षांनी मी व माझ्या धाकट्या बहिणीने तो पिंपरीच्या एका चित्रपटगृहात ''मॅटिनी''ला पाहिला. तेव्हा आमचे घर त्या चित्रपटगृहाच्या अगदी समोर होते. त्यामुळे मी व बहीण आईसोबत अगदी आयत्या वेळेस तिकिट काढून गेलो चित्रपट पाहायला! [तेव्हाही तो हाऊसफुल्ल व्हायचा कधी कधी!] बहिणीचे वय होते सात वर्षे आणि माझे दहा वर्षे! आमचा सर्व चित्रपट पाहून झाला, चित्रपटगृहातले दिवे लागले, प्रेक्षक बाहेर पडू लागले. आम्हीही जायला उठलो. पाहिले तर धाकटी बहीण मुसमुसून रडत होती. तिला विचारल्यावर ती काही उत्तरही देईना! वाटले, हिला काही दुखले-खुपले तर नाही ना, बरे वाटत नाही का.... काय झाले काहीच कळेना!
कसेबसे तिला चित्रपटगृहाच्या बाहेरच्या आवारापर्यंत आणले. पण तिथे मात्र तिने जोरात भोकांडच पसरला. मी व आई हतबुद्ध! लोकांच्या कुतूहलाच्या नजरांची जागा नंतर काळजीने घेतली. तिथला रखवालदार ओळखीचा होता. तो विचारू लागला, ''बेबीको क्या हो गया? सब ठीक है ना? पानी लाऊ क्या?'' त्याने बिचार्‍याने पाणीही आणले. पण आमच्या बहिणाबाईंना पाणीही नको होते. तिचा हंबरडा काही केल्या आटोपायचे चिन्ह दिसत नव्हते. आंजारून -गोंजारून झाले, जरबेने विचारून झाले, जवळ घेऊन झाले, सर्व शक्य उपाय चालू होते!
बहिणीने तर जमिनीवर लोळणच घ्यायची शिल्लक ठेवली होती!!!
दहा-पंधरा मिनिटे हे नाटक चालू होते. मग मात्र आईचा संयम सुटला. तिने तिच्या खास ठेवणीतल्या करड्या आवाजात बहिणीला विचारले, ''आता काय झाले ते सांगतेस की नाही? का देऊ एक फटका?''
ही मात्रा मात्र बरोब्बर लागू पडली.
बहिणीचा टाहो एकदम तार सप्तकातून मध्य, तिथून मंद्र सप्तकावर आला... अश्रू वाळले होते त्यांच्या जागी नवे अश्रू येणे बंद झाले. हंबरड्याची जागा हुंदक्यांनी व मुसमुसण्याने घेतली. तिचा तो ओसरलेला आवेग पाहून आईलाही जरा धीर आला. मग मोठ्या प्रेमाने तिने बहिणीच्या डोक्यावरून हात फिरवून तिला पुन्हा विचारलं, ''काय झालं माझ्या राजाला, सांगशील का आता तरी?''
बहिणीने डबडबलेल्या डोळ्यांनी, आईच्या पदरात तोंड खुपसून स्फुंदत उत्तर दिलं..... ''आई, अमिताभ बच्चन मेलाssssssssss!!!!!''
क्षण-दोन क्षण आईच्या डोक्यात काहीच प्रकाश पडेना! मग तिला उलगडले.... शोलेमध्ये अमिताभ शेवटी मरताना दाखवला आहे! बहिणीचा अमिताभ अतिशय लाडका होता तेव्हा! तिला चित्रपटातील अमिताभची मारामारीही खरीखुरी वाटायची आणि घरी ती अदृश्य शत्रूंबरोबर तोंडाने ढिश्शुम् ढिश्शुम् आवाज काढत हाणामारी करत असायची! तिच्या लेखी ते सर्व खरे असायचे. आणि आता तिला चित्रपटाचे कथानक इतके सत्य वाटत होते की अमिताभ खरोखर मेला आणि तो आता आपल्याला पुन्हा कध्धी कध्धी दिसणार नाही म्हणून तिला अगदी भडभडून व भरभरून रडायला येत होते!!!!!!!
तिच्या त्या निरागसपणापुढे आणि समजेच्या अभावापुढे आई पार शरणागत झाली! बहिणीला काही केल्या चित्रपटातील गोष्टी खोट्या असतात, त्यातील कलाकार असे चित्रपटात दाखवले म्हणजे खरेखुरे मरत नाहीत हे पटायला जाम तयार नव्हते. दादापुता करून तिला घरी घेऊन आल्यावरही तिचे डोळे वारंवार अमिताभच्या आठवणीने (!!) भरून वाहत होते. आम्हाला मात्र आता हसू दाबणे अवघड जात होते.
शेवटी दुसर्‍या दिवशी आम्ही पुन्हा शोले बघितला. त्यात अमिताभला जिवंत पाहून तिला एकदाचे हायसे वाटले! ह्या खेपेस तो मेला तेव्हा ती एवढी रडली नाही!
तिच्या बालमनाला समजेल पण ते दुखावले जाणार नाही अशा रीतीने तिला समजावता समजावता घरच्यांच्या नाकी नऊ आले! पण मग हळूहळू तिला उमजू लागले की चित्रपटातील कथानक सत्य नसते, मारामारी - ढिश्शुम् ढिश्शुम् वगैरे सगळे खोटे असते.... पुढे आम्ही अनेक मारधाड चित्रपट खदखदा हसत पाहिले. पण शोलेचा तो अनुभव अविस्मरणीय होता!!
आजही कधी कधी आम्ही तिला शोलेची आठवण काढून चिडवतो! :-)
--- अरुंधती कुलकर्णी