जुनीच गणिते पुन्हा नव्याने मांडत आहे
आयुष्याची गृहीतके पडताळत आहे
जगण्याचा कोणी शिकवावा अर्थ... कुणाला?
मीही केवळ माझ्यापुरता लावत आहे
आयुष्याचा वेग विलक्षण आहे; पण मी -
अखेर त्याला अर्ध्यावरती गाठत आहे
कोण शक्यता पेरत गेले उरात माझ्या?
'चल किरणांशी खेळू'... कोंभ खुणावत आहे!
जेथे होतो तिथेच आहे... वरवर बघता
आत आत एकेक वेस ओलांडत आहे