विरह

झाला विरह अता मी, रडणार फक्त आहे

अश्रू मुळीच नाही, ढळणार रक्त आहे

बाहेर येउनी ना, दुःखास दर्शवावे 
अश्रूंस पापण्यांची, ताकीद सक्त आहे

जाणीव पातकाची ,घडवी बदल असा की
सैतान कालचा तो , आता विरक्त आहे

आशेवरी जगावे, हे फक्त आठवावे
येणार जो उद्या तो, माझाच वक्त आहे

देउ कशी लढाई, निष्ठूर प्राक्तनाशी ?
दुबळे प्रयत्न माझे , अन ते सशक्त आहे

जो वागवी मनावर , जोखड तुझ्या मनाचे
'' कैल्या'' असेल ही तो, मी मात्र मुक्त आहे

डॉ. कैलास गायकवाड.