मराठी विचित्रपट!

           अलीकडे मराठी चित्रपटांची संख्या नजरेत भरेल इतकी वाढायला लागली आहे.  एखाद्या मॉल शेजारून जाताना चित्रपटांच्या पोस्टर्स मध्ये मराठी चित्रपटांची पोस्टर्स झळकताना बघून समाधान वाटत पण तेच समाधान प्रेक्षागृहात जाऊन मिळेलच याची खात्री मात्र शून्य!  अलीकडे बघितलेल्या चित्रपटांमध्ये काही ठराविक चित्रपट सोडले तर इतर चित्रपट कोणत्या कारणासाठी आवडले असे इतरांना सांगावे असा प्रश्न पडावा इतपत आवडले! चांगले चित्रपट येत आहेत असे वाटत असतानाच हे असे चित्रपट येणे म्हणजे भरपेट जेवण झाल्यावर ते गळ्याशी आल्यासारखं होत.  चित्रपट निर्मिती हा एक सागरगोट्यानसारखाच खेळ असावा असा तर निर्मात्यांचा समाज झालेला नाही ना?   माझ्या काही अमराठी मित्रांनी अलीकडेच प्रोमोज बघून मराठी चित्रपटांमध्ये इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केली होती आता त्यांना 'छावा' किंवा 'बायको गेली पळून' यांसारख्या चित्रपटांचे प्रोमोज पहायला मिळाले तर त्यांचा  इंटरेस्ट तो काय उरेल? हे असे चित्रपट म्हणजे मारायला टेकलेल्या माणसाला विष पाजण्यासारख आहे! हिंदी चित्रपट हेही काही फारसे समाधान देणारे नाहीत पण त्यांच्याजवळ बक्कळ पैसा आहे त्यामुळे लोखंडाच्या मूर्तीला सोन्याचा मुलामा लावून ते विकू शकतात पण आपल्याकडे ती लोखंडाची मूर्ती घेण्याइतकेही पैसे नसताना आपण गंजलेली मूर्ती घेण हे फारच रिस्की आहे! आधीच मराठी पासून दूर दूर पळत चाललेल्या तरुण पिढीला जर हे असं काही बघायला मिळाल तर ती आणखी दूर निघून जाईल! मी खूप चित्रपटांची नावं इथे घेतलेली नाहीत कारण मला सरसकट मत मांडायचं होत.  

            चित्रपटाची वेगळी अशी एक चित्रभाषा असते त्यामुळे भाषेच्या पलीकडे जाऊनही तो आपले रंजन आणि प्रबोधन करू शकतो पण हे सारे घडते ते चांगल्या चित्रपटांच्या बाबतीत! एखादा चित्रपट जर मुळातच बकवास कल्पनेवर आधारित आणि केवळ बनवायचा होता म्हणून बनवला असा बनवाबनवी च्या तत्त्वावर आधारलेला असेल तर तो प्रेक्षकांनाही बनेलच वाटतो आणि मग ते त्याच्याकडे पाठ फिरवतात ती कायमची! नुसती त्याच चित्रपटाकडे नाही तर ते जनरलायझेशन च्या तत्त्वानुसार अशा अनेक चित्रपटांकडे नुसत्या प्रोमोज वरूनही पाठ फिरवायला लागतात कारण प्रोमोज वरून त्यांना ते चित्रपट चांगले वाटत नाहीत. हे सारे थांबवायचे असेल तर असे चित्रपट मुळातच थांबवणे गरजेचे आहे!  चित्रपट हा धंदा नसून त्यात प्रेक्षक ही प्रायोरीटी आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे! हे असे आणि असेच घडले तरच एक चांगले पर्व तयार होऊ शकते मराठी चित्रपटांचे! आम्हालाही चित्रपट बघायला आवडतात पण जर चित्रपट बघत असताना शेजार्यांकडे लक्ष जावे इतपत जर तो वाईट असेल तर आम्ही देखील चित्रपटगृहाकडे फिरकायचा विचार का बरे करू?