मला रोज भेटणाऱ्या आजीबाई

आज मला एक गंमतशीर अनुभव आला.... वास्तविक पाहता हा अनुभव मला कधीच आला असता... परंतु वेळ नसल्यामुळे हा अनुभव मला या आधी न येता, आज आला. तुम्हाला वाटेल की अनुभव काय मला वेळ नाही म्हणून यायचा थांबणार आहे का, घटना अशी घडायची थांबणार आहे का? पण खरे पाहता तसेच काहीसे झाले आहे... 

मी हिंजेवाडी मध्ये नोकरी धरल्यापासून रोज मला कंपनीत नेणारी कंपनीची बस बिबवेवाडी मधल्या के के मार्केट समोर थांबते... परंतू माझ्या घराजवळील गल्लीसमोरूनच ती जात असल्याने मी बस वाल्या काकांना त्या गल्लीसमोरच थांबायला सांगितले आहे... ह्या गल्लीतून बाहेर पडले आणि रस्ता क्रॉस केला की समोर पुण्याच्या ख्यातीप्रमाणेच एक लहानसे गणपतीचे मंदिर आहे... आणि त्याला एक लहानसा कठडा आहे...

ह्या कठड्यावर रोज एक आजी बसलेल्या असतात.... मी तिथे पोहोचले की रोज मला हाक मारतात "अग ए बाये ये हिकडं बस की" आणि मी रोज त्यांना हाकेनेच उत्तर देते, "नको, बस आली माझी" आज मात्र मला हे उत्तर देता येणार नव्हते... कारण रोज बसवाले काका माझ्या आधी किंवा माझ्या वेळेतच तिथे पोहोचत असल्यामुळे मला काही त्या मंदिराच्या कठड्यावर बसायची वेळ आली नव्हती.... परंतु आज मी ५ मिनिटे आधी पोहोचल्याने आणि बस ५ मिनिटे लेट येईल असे फोनवरून कळल्यामुळे माझ्यावर तिथे बसायची वेळ आली... आणि मी आज्जींच्या हाकेला पॉझिटिव्ह प्रतिसाद देऊन फायनली तिकडे जाऊन बसले.

आजी नेहमीसारख्याच... सुती गुलाबी नऊवारी पातळ नेसलेल्या, डोक्यावरून पदर, चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या, उन्हाने बारीक झालेले/ केलेले परंतु चौकस डोळे, वय साधारण ६५ -७० च्या मध्ये असेल परंतु परिस्थितीने किंवा अजून कशाने म्हणा... ७५-८० च्या जवळचे वाटावे असा थकलेला आणि व्यथित चेहरा.... आणि कोटा टाईल वापरून बनवलेला कठडा असला तरी खेडेगावातली माणसे नेहमी जश्या पोझिशन मध्ये बसतात तश्या बसलेल्या ह्या आजी...

त्यांनी मला विचारले... कुठं जाती रोज????

मी :  नोकरीला... (आजी रोज दिसत असल्या तरी अनोळखीच त्यामुळे कमीत कमी शब्दात उत्तर देण्याचा माझा हा प्रयत्न)

आजी : हां का? पण कुठं??

मी: हिंजेवाडीला

आजी : मालक हायेत का?

मी:   (हा प्रश्न जरा विचित्र वाटला... या आधी लाँड्री वाल्या आजींनी मला मालक कोन तुजे ह्या वाड्यातल्या पोरांपैकी? असा प्रश्न विचारलेला तेव्हा मला कळायला जरा वेळ लागलेला... पण आता मालक म्हणजे नवरा हे लक्षात आले आहे. पण तरी... हायेत का?   विचित्र वाटले पण मे बी त्यांना इथेच आहेत का असे विचारायचे असेल... असा विचार केला. )

हो...

आजी : मंग कुटे दिसत न्हाइत....

मी: (माझा नवरा कशाला मला रोज रोज सोडायला येईल??? आणि ते पण स्टॉप वर??? ) मी चालत येते....

आजी : म्हंजी... तो बी नोकरी करतो न्हवं??

मी: हो... पण दुसरीकडे

आजी : मग एकत्र नाही जात?

मी: (अवघड आहे) नाही. तो दुसरीकडे नोकरी करतो.... गाडीवरून जातो... मला बस घ्यायला येते रोज

आजी : बरा बरा गाव कोणतं तुझं?? इति आजी...

मी : मुंबई

आजी : हितं नवऱ्यासोबत राहती व्हय.... किती पैका दिला तुझ्या बापानं सासरच्यांना...

मी :  आमच्यात असा पैसा वगैरे देत नाहीत...   

आजी : (आधीच्या उत्तराने आश्चर्यचकित) बरा... पोरं बाळं किती?

मी: (एव्हाना मला ह्या प्रश्नाची सवय झालेली असल्याने आता सोपं वाटतं उत्तर द्यायला ) नाहीयेत अजून ...

आजी : का?

मी: आताच लग्न झालं (मी स्वगत : : नशीब केव्हा विचारलं नाही.... एकतर खोटं सांगावं लागलं असतं नाहीतर २ वर्ष म्हटले असते तर आणखी अनेक प्रश्न समोर आले असते ज्यांना काय उत्तर द्यायचे ह्या हा मला प्रश्न पडला असता. )   

आजी : अस्सं... पगार किती हाये?

मी: आं???

आजी : पगार किती हाये??? मालकांला?

मी: (ह्यांना काय सांगणार.... तुम्ही जास्तच पर्सनल होताय पण म्हणू शकत नाही... काहीतरी सांगावं) दहा हजार

आजी : हां?? आणि तुला?

मी: (ह्यांना कशाला हवाय आमचा पगार? ) आठ हजार रुपये

आजी : खपतो का??

मी:काय?

आजी : न्हाई म्हनलं खपतो कां इतका पैका?

मी:  खपतो की.... किती महागाई झालीये...

आजी: अस्सं व्हय.... सासू सासरे??? हायेत का?

मी: (हायेत का? हा प्रश्न आवडीचा दिसतोय.... ) हो आहेत की

आजी : कुटं असतात

मी: इथेच... आमच्यासोबत...

त्या झर्रकन मागे वळल्या आणि गणपतीला नमस्कार करून पुटपुटायला लागल्या.... देवा गजानना... लई उपकार रे तुझे त्यांच्यावर... मारुतीराया... तुझी कृपा अशीच ह्राउदे...

एका क्षणात मला त्यांच्या मनातली व्यथा उमगली.... पण देवाशी बोलून झाल्यावर त्यांनी माझ्याशी बोलणं थांबवलं नाही... पुन्हा लगेच त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळला

आजी : हे काय घातलंय??

मी: कुठे काय?

आजी : न्हाई म्हनलं हे असलं कसलं पोलकं घातलंय???

(मी स्वगत : : पोलकं??? ह्यांना ड्रेस म्हणायचा असेल, नशीब मी जीन्स घातली नाहीये आज)

आजी : हे असलं बीन बाह्यांचं पोलकं काय घातलंय?

मी: (आता काय सांगावं) ऑफिसमध्ये सगळ्या बायका हे असंच घालतात आजी....

आजी : व्हय काय? बरा न्हाई दिसत ते... पोलकं कसं कोपरापर्यंत बाह्या असलेलं हवं

मी : निरुत्तर आणि गप्प

एवढ्यात एक ६० वर्षाच्या आसपास वय असलेले काका तिथे आले... गाववालेच असावेत... आणि आजींना ओळखणारे... पांढरा लेंगा, पांढरा फुलशर्ट आणि पांढरी टोपी... त्यांनी तिथे आजींच्या बाजूला बसकण मारली आणि आजीबाईंशी गप्प मारू लागले... आणी मला हायसं वाटलं... नाहीतर अजून काही क्षणात कुंकू/ टिकली का नाही लावली, बांगड्या का नाही घातल्या? हे नखांना लाल का लावलंय.? सासू सासऱ्यांना हे असलं चालतं कां? वगैरे प्रश्नांना मला उत्तरं द्यावी लागली असती.  

असो... ते काका आजींना म्हणाले....

काका : काय गं म्हातारे.... काय करतीस??

आजी : काई न्हाई बाबा...

काका : लेकीने... पोरांनी च्या दिला की न्हाई तुला...

आजी :....... (गप्प)

एवढ्यात माझी बस आली आणि मी तिथून निघाले.... आजींकडे एकदा पाहिलं त्यांचं लक्ष नव्हतं... पण आता मला त्यांची व्यथा पूर्ण कळली होती.... 

बस मध्ये पूर्ण वेळ मी त्यांचाच विचार करत होते... संपूर्ण संभाषण पुन्हा पुन्हा आठवत होते.... माझा आणि नवऱ्याचा सांगितलेला खोटा पगार... तोही मिळून अठरा हजार रुपये... आजच्या काळात कमीच.... किंबहुना खूप कमी... तो ऐकून ही खपतो का? असा विचार त्यांच्या मनात  आला.... माझ्या वडिलांनी सासरच्यांना काहीही पैसे दिले नाहीत ह्याचे त्यांना वाटलेले आश्चर्य.... आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मी सासू सासऱ्यांसोबत राहते.... ह्याचे त्यांना वाटलेले कौतुक...

कदाचित हीच त्यांची व्यथा असावी... त्या काकांच्या आणि आजींच्या बोलण्याने हेच सिद्ध केले... आज जगासमोर असलेल्या अनेक मोठ्या प्रश्नांपैकी हा एक मोठा प्रश्न मी आज माझ्या डोळ्यांनी पाहत होते... आणि दुःखी होत होते...