नाईलच्या देशात - ४ : स्फिंक्स

0एव्हाना सावल्या पायात येऊ लागल्या होत्या. आम्ही निघायचे ठरवले. समोरून एक उंटांचा काफिला आम्हाला वळसा घालून गेला. e4-1 आम्ही वाळवंटातून पावले उचलत गाडीत येऊन बसलो. गाडी रस्त्याला लागली. आलो त्याच मार्गाने आम्ही परत निघालो होतो. फरक इतकाच की येताना खुफुच्या पिरॅमिडसच्या अगदी समोरून आलो होतो, जाताना मधून म्हणजे खुफू आणि खाफ्रे यांच्या मधोमधच्या रस्त्याने जाणार होतो. पिरॅमिडसच्या बरोबर मधून जाताना रस्त्याच्या पलीकडे वाळूतून घोडागाडी व उंटवाले देखिल आता धंदा संपवून खालच्या अंगाने निघाले होते. वर काहीसं मळभ, सर्वत्र प्रकाश परावर्तित करणारी वाळू आणि त्या पार्श्वभूमीवर ती घोडागाडी व उंट यांचे छायाकृती चित्र टिपायची संधी मी सोडली नाही. क्षणात गाडी थांबवून खाली उतरलो आणि ते दृश्य टिपून परत आलो व गाडी उताराला लागली. e4-2

दोन अंगाला दोन महा पिरॅमिडस मागे राहिली होती व समोर उजव्या अंगाला स्फिंक्सचे मंदिर दिसले. दगडात कोरलेली ती २१ मीटर उंच आणि ७३ मीटर लांब स्फिंक्सची भव्य आकृती दूरूनही स्पष्ट दिसत होती. अंगात पुन्हा उत्साह संचारला. गाडी थांबताच आम्ही स्फिंक्सच्या दिशेने निघालो. संपूर्ण परिसराला पर्यटकांचा वेढा पडला होता. आम्ही क्षणभर मागे वळून पाहिले तर डावीकडे खाफ्रेचे पिरॅमिड, उजवीकडे खुफुचे पिरॅमिड, मधून उतरत येणारा रस्ता आणि खाली सर्वत्र वाळूचे साम्राज्य तर वर निळे आकाश असे विलोभनीय दृश्य दिसले. आणि नजरेत पुन्हा एकदा भरली ती भारून टाकणारी भव्यता. e4-3 समोर पासष्ट फूट उंचीचा स्फिंक्स चा पुतळा खुजा ठरविणारी भव्यता. खाली दिलेल्या चित्रातील स्फिंक्सच्या डाव्या बाजूने पिरॅमिडसच्या दिशेने जाणाऱ्या मानवी आकृत्या पाहताच त्या भव्य वास्तूंची कल्पना येईल. e4-4

स्फिंक्स विषयी अनेक हकिकती प्रचलित आहेत. सिंहाचे शरीर व मानवाचे मस्तक हे सिंहाचे सामर्थ्य, चापल्य व माणसाची बुद्धिमत्ता याचे प्रतीक मानले जाते. अशी एक हकिकत आहे की त्या वाटेने जाणाऱ्या वाटसरूला स्फिंक्स प्रश्न विचारीत असे आणि उत्तर बरोबर देणाऱ्याला पुढे जाऊ देत असे. मात्र उत्तर चुकले तर तिथेच खतम! कुणी म्हणे की हे स्फिंक्स सर्वत्र नजर ठेवून असतात. ते आपल्या कानांनी ऐकत असत, डोळ्यांनी पाहत असतात मात्र तोंड उघडून बोलत मात्र नाहीत. बोलतात ते दहा हजार वर्षातून एकदा, आणि तेही देवाला काय घडत आहे त्याचा वृत्तांत सांगण्यासाठीच. हे मानवी मस्तक म्हणजे राजाचे मस्तक आहे. इजिप्तमध्ये इथेच नव्हे तर सर्वत्र असलेले राजे - राण्यांचे पुतळे पाहताना प्रकर्षाने नजरेत भरतात ते मोठे व टवकारलेले कान. आपल्या जनतेचे म्हणणे राजा ऐकून घेण्यासाठी दक्ष राजा सदैव जागरूक असतो याचे प्रमाण म्हणजे मोठे व पुढे झुकलेले कान. e4-6 हे मस्तक बहुधा राणी हॅशेप्सूट हिचे असावे असा एक प्रवाद आहे. स्फिंक्सच्या पुतळ्या भोवती बव्हंशी नष्ट झालेले त्याचे मंदिर आहे. या पुतळ्याकडे पाहता त्याचा चेहरा बराच विद्रूप केला गेला असल्याचे जाणवते. मूर्तिपूजेच्या कट्टर विरोधात असलेल्या अरब मुस्लिमांनी सूर्यदेवता, नाग देवता वगैरे देवतांना मानणाऱ्या या चेहऱ्याचे नाक तोडून काढले आहे तर डोळेही खोबणीतून काढले आहेत. इथल्या मूर्तिकलेचे असामान्य वैशिष्ट्य म्हणजे काही विशिष्ट दगडातून कोरलेले व मूर्तीच्या चेहऱ्यावरील खोबण्यात बसविलेले विलक्षण जिवंत डोळे. चित्रातील मूर्तीच्या डोळ्यांच्या खचा पाहिल्या असता त्यातील बुबूळ हे काढून टाकलेले सहज समजतात.

मघाशी पिरॅमिड बघून परत येण्या अगोदर आलेले मळभ दूर होऊन आता पुन्हा आकाश स्वच्छ निळे दिसू लागले होते. वर रणरणीत ऊन तर मध्येच शिराशिरी आणणारी आन्हाददायक शीतल झुळुक असा विरोधाभासी प्रकार होता. आम्ही समोरच्या अंगाने स्फिंक्सच्या डावीकडून आत मंदिरात प्रवेश केला. मजबूत चौकोनी खांब व अजस्र दगडांची चिरेबंदी भिंत सोडता बाकी तिथे फारसे काही शिल्लक नव्हते. पुढे जाताच पुन्हा एकदा चिऱ्यांच्या चौकटीतून पिरॅमिडचे दर्शन घडले. e4-7 मग आतल्या पिरॅमिडकडे जाणारा मार्ग सोडून आम्ही उजवी कडच्या चौथऱ्यावर गेलो आणि त्या स्फिंक्सच्या नाना अंगांनी वैविध्यपूर्ण दिसणाऱ्या प्रतिमा टिपल्या. मग जरा आचरटपणाही केला, जे सहसा मी करत नाही: मी मागे सरकत अगदी भिंतीपर्यंत गेलो, पुढे चिरंजीवांना कड्याच्या अगदी जास्तीत जास्त पुढे स्फींक्सच्या रेषेत उभे केले वा कोन साधून त्याला हात वर करत बरोबर तो त्या पुतळ्याच्या हनुवटीला हात लावतो आहे अशी छबी टिपली. प्रत्यक्षात त्याच्या व पुतळ्याच्या मध्ये किमान शे दीडशे फुटाचे अंतर होते. e4-8 लगोलग त्याच कड्यांवरून अगदी मागच्या पायापासून ते थेट मस्तका विस्तार टिपला. याच मंदिरात एक भुयारी मार्ग आहे जो अर्थातच आता बंद केला आहे; पण हा भुयारी मार्ग थेट पिरॅमिडजवळ उघडतो. बहुधा खुफुच्या पिरॅमिडजवळ. मग ते पिरॅमिडस व स्फिंक्स यांचे अनेक कोनातून एकत्र दृश्य टिपले. e4-9 जसजसे आपले स्थान बदलावे तसे स्फिंक्सच्या पार्श्वभूमीवरचे पिरॅमिडही आपले स्थान बदलताना दिसत होते. e4-10

e4-11