माझं लग्न ठरताना...

लेखनाच्या कोणत्याही पुर्वानुभवाशिवाय लिहितोय. पण लग्न ठरत असलेल्या एका तरुणाच्या मनातील विचारांचं प्रतिबिंब उमटवण्याचा प्रयत्न करतोय. या लेखामध्ये प्रकट केलेल्या घटना व विचारांशी लेखक सहमत असेलच असे नाही. शिवाय कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहित असं वाटतंय.

माझं लग्न ठरताना...

साधारण २७ व्या वर्षी करायचं ठरवलं होतं.. दीड वर्षं अगोदर होतंय..

पण मुली बघायला सुरुवात झाली होती. मागच्या वर्षी एप्रील मध्येच.. मी घरापासून लांब राहतो.. चांगलाच लांब.. रेलवेनं घरी यायचं म्हटलं तरी २४ तास लागतातच लागतात. तिकीट वगैरेच्या पण सतरा भानगडी कराव्या लागतात.

ईंजीनीअरिंगचं शिक्षण पुर्ण केल्या नंतर पुण्याच्या एका नामांकित कॉलेज मधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आणि त्या दरम्यान भारतामधल्या सर्वात प्रतिष्ठीत कंपनीमध्ये आणि ज्या वयात आपण इतक्या सगळ्या पैशांचं काय करायच असा प्रश्न पडू शकेल इतक्या पगाराची नोकरी लागली. घरातला मोठा मुलगा पण घरचं सगळं चांगलं, आई पप्पानीं घराचं पुर्ण बस्तान किंवा ससांराची घडी व्यवस्थीत बसवलेली त्यामुळे माझ्या खांद्यावर विशेष काहिच जबाबदारी नाही. धाकट्या भावाचं शिक्ष्ण चालू होतं. लौकीकार्थाने मुलगा हाता तोंडाशी आलेला, आणि घरच्यांना जाम उत्साह. मी (खरंच) नको नको म्हणत असताना यानीं माझ्या नकळत पाहुण्यांमध्ये सांगून टाकलं "यंदा आम्हाला कर्तव्य आहे! " मग काय, मला नंतर कळलेल्या माहिती वरून सांगतो, घरी बऱ्याच फोटो पत्रिकांचा गट्ठा तयार झाला होता.

सुरवातीला आडून आडून विचारणा व्हायची, आई म्हणायची " अजून किती दिवस मेलं एकटीला सगळ्यांच करावं लागणारंय" " आज माझी लेक असती तर तिनं किती हातभार लवला असता" " तिनं असं केलं असतं" " तिनं तसं केलं असतं" आणि अशा वेळी मागे हटेल ती मावशी कसली ती पण लगेच आईची बाजू घ्यायची.  मी त्या दोघींचं बोलणं उडवून लावायचो, लगेच पप्पा तत्त्वज्ञाच्या भुमिकेत शिरून भावनिक पातळीवरून माझ्या मनाला साद घालायचे. त्यांचा वेगळाच पॉइंट, म्हणे "काही गोष्टी ठरावीक वेळेला झालेल्याच बऱ्या असतात" ते " आम्हा म्हातारा - म्हातारीचं सून मुख बघायचं एव्हढंच राहिलंय". मी काही बधत नव्हतो. अशा वेळी लोक राम बाण वगैरे काढतात पण माझ्या घरच्यांवर काय ही वेळ आली नाही.

मुलगी कशी असावी आणि जिच्या सोबत लग्न कराय्चं ती मुलगी कशी असावी, मुली कशा असतात, मुली कशा नसाव्या इत्यादी इत्यादी या वेगवेगळ्या विषयांवर आम्हा मित्रांमध्ये खुप (निरर्थक) चर्चा व्हायच्या आणि सगळ्यानां खुप रस असायचा.  मी नोकरीच्या ठिकाणी रूम वर रहायचो. चौघेजण चार कॅटेगरी मधले. सगळ्यात मोठा ज्याच्या लग्नाला ७ वर्षे पुर्ण झाली होती आणि २ मुले होती. दुसरा ज्याला त्याची अर्धांगिनी घावली होती अन त्यांचा साखरपुडा पण झाला होता, तिसरा ज्याला तेव्हा कर्तव्य होते आणि मी संटा (एकटा). मी तिघांच्या अवस्था बघत होतो. त्यातून शिकत होतो. पण लग्न म्हटले की 'स्वातंत्र्यावर घाला', कटकट, आणि एकुणच चेष्टेचा स्वर असतो. तसं वाटत नव्हतं त्यांच्याकडे बघून. त्यामुळंच खरं तर माझ्यामध्ये आत्मविश्वास जागृत का काय तो झाला. तिघांपैकी ज्याचा साखरपुडा झाला होता तो तर काय स्वर्ग सुखीच न्हाला होता. रोज किमान ३ तास तरी त्याच्या होणाऱ्या बायकोशी फोन वर बोलल्या शिवाय त्याचं समाधानचं व्हायचं नाही. मला विशेष वाटायंच, च्यायला सख्ख्या मित्राशी ते कधी ११ - १२ मिनिटाच्या वर स्वतः फोन करून बोललो नाही आणि हा मनुष्य प्राणी २ - ३ तास दुसऱ्या स्त्री प्राण्याशी बोलतो! तसा त्या दोघांच्या साखरपुड्यात आणि लग्नात ६ महिन्यांचं अंतर होतं म्हणा. मी तेव्हाच ठरवलं आपण असं काहिही करायचं नाही. अरे तिला पण तिची काही स्पेस आहे की नाही? का ह्याचा फोन येणार म्हणून तिने हातातली सगळी कामं बाजुला ठेवायची? तो म्हणायचा त्याचं त्याच्या (च) बायकोवर फार प्रेम आहे आणि ते दोघे एकमेकांसाठी वेळ देतात. मी म्हणायचो (मनातल्या मनात) ' अर्रे लब्बाडा, मुलीसोबत गुलू गुलू बोलायला मिळतं ते सांग की! '

आणि जो मुली बघत होता त्याचं जगणं मला बघवत नव्हतं. बिच्चारा, धड जेवायचा नाही, कामात लक्ष नाही, सतत त्याला चिंता लागून राहिलेली असायची - कोण भेटेल, कशी असेल, सर्व संभाळून घेइल ना? की डोक्यावर मिऱ्या वाटेल? की पदरात पडेल ते पवित्र करून घावं लागेल? एक ना अनेक शंका. पण आता त्याचे दोनाचे चार झाले आणि चाराचे सहा व्हायच्या मार्गावर आहेत.

ज्याचं लग्न झालेलं होतं तो एक सल्ला द्यायचा ' एकमेकांचा आदर करायला शिका'. तेव्हा इतकं समजायचं नाही.

अशात एका सुमुहुर्तावर मी पण माझ्या घरच्यांचा मला बेडीत अडकवण्याचा हेतू जाहीर केला तेव्हा तिघेही फक्त हसले. आणि समोर आलेल्या परिस्थितिला सामर्थ्यानं तोंड द्यायला सज्ज होण्यसाठी मी सज्ज झालो.

विना मोबदला दुसऱ्याला देता येणारी गोष्ट - सल्ला. तोच पहिल्यांदा मिळाला न मागता. काय तर " लग्न? करू नको" " जियो और जीने दो" " एकटा जीव सदाशिव" " अजून किती दिवस आपला हात जगन्नाथ? बस्स झालं" " करून बघ आणि आम्हाला पण सांग कसं वाटलं ते "  एक ना अनेक. लग्न झालेल्या अन न झालेल्या लोकांच्या  प्रतिक्रिया मजेशीर होत्या. पण दुसऱ्या बाजुला माझ्या मनात पण विचार चालुच होते. त्रयस्थाप्रमाणे मी वेगळ्या पातळीवरून मी या मनुष्य स्वभावाचा वेध घ्यायचा प्रयत्न करत होतो. नक्की काय होतं जेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री एकमेकांच सर्वस्व एकमेकांना अर्पण करायला तयार होतात आणि ज्यात व्याभिचाराला आजिबात थारा नसतो.

या सगळ्या गडबडीत सांगायचा मुद्दा बाजुला रहिला. तर जेव्हा मी ठरवलं लग्नाबद्दल विचार करण्याचं तेव्हा थोडं आत्मपरीक्षण करावंस वाटलं. मी किती तयार आहे लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या पेलायला? ज्या प्रमाणे मी मुलिबद्दल अपेक्षा ठेवतो त्या प्रमाणे ती पण मुलाकडून काही अपेक्षा ठेवत असेलच ना! माझ्याकडे असं काय आहे ज्याच्या बळावर मी मला पसंत पडलेल्या मुलिला मागणी घालू शकतो. चांगला पगार, स्वतःचं घर, ५ फूट ११ इंच उंची, सुंदर दिसणं हे एका मर्यादेपर्यंत महत्वाचं आहे. पण मी माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल किती प्रामाणिक आहे हे पडताळून पाहणं पण मला तितकंच महत्त्वाचं वाटलं.

आणि मन भुतकाळात गेलं. मुली.. पाचवीत असल्यापासून आमच्या शाळेत मुला मुलींची संख्या लक्षात घेउन एका बाकावर २ मुलिंमध्ये १ मुलगा किंवा २ मुलांमध्ये १ मुलगी आली पाहिजे हा वर्गात बसण्यासाठीचा नियम कटाक्षाने पाळला जात होता. मी पहिल्या प्रकारात मोडत होतो. ४ वर्षे 'अशी' गेल्या नंतर दहाविमध्ये मुलिंच्या रांगेचा मॉनिटर केला गेलो आणि त्याच रांगेत सर्वात पुढच्या बाकावर बसायची (माझ्यासाठी) शिक्षा / (इतरांसाठी) मजा मला मिळाली. अकरावी - बारावी मध्ये इंटरनेट आणि गाड्या पळवण्याचा गेम हाती लागल्या नंतर मुलिंच्या मागे लागण्यात रस वाटत नव्हता. सोबतच शहरातील आजुबाजुच्या डोंगराळ भागातील रम्य ठिकाणे हुडकून काढण्याचा नाद लागल्यामुळे आम्ही कॉलेज मध्ये दिसणं टाळायचं ठरवलं. बारावी पर्यंत मुलींशी विशेष संपर्क आला नाही. पण मैत्रिणी बनत गेल्या, खुप जवळच्या कोणीच नाही आणि कुणाच्या जास्त जवळ जायचंच नाही असं ठरवलं ही होतं. अकरावी - बारावी मध्ये एकत्र असलेल्या आम्ही मित्रांनी इंजिनीअरिंगला पण एकत्र ऍडमिशन घेतली आणि पुर्विचे उद्योग पुढे चालू ठेवायचं ठरवलं. यावेळी मात्र आमच्या ग्रुप मध्ये २ मुली सामील झाल्या. अन त्या पण त्या वेळच्या ऍडमिशन घेतलेल्या पैकी सर्वात अपर क्लास मुलिंपैकी दोघी होत्या. सौंदर्य आणि सरस्वतीचा वरदहस्त असा जबरदस्त मिलाफ होता. त्यांच्यामुळे आमच्या ग्रुपला आगळी शोभा आली. आमच्या उद्योगात त्या पण सामील झाल्या. खुप चांगली मैत्री झाली. कॉलेज संपल्यावर आम्ही आपापल्या दिशेला पांगलो. नंतर नोकरीच्या निमित्तानं लांब आलो आणि जगप्रसिद्ध 'कामाच्या रहाटगाड्यात' ओढला गेलो. घरापासून लांब मेट्रो सिटी मध्ये रहायची संधी मिळाली. इथली जीवन पद्धती जवळून पहायला मिळाली. इथं कोणी विचारणारं नव्हतं. मस्त पैसा होता. तो फेकून मागेल ते मिळालं असतं. पण  अशा गोष्टीमध्ये अडकावं असं कधीच वाटलं नाही. बाई झालं बाटली राहिलं. उत्सुकता म्हणून ते करून बघितलं. आत्तापर्यंत जिन, वाइन, रम, व्हिस्की, बीअर, व्होडका हे प्रकार पिउन पाहिलेले आहेत. प्रत्येकी एकदा. परत तोंडाची चव बिघडवणार नाही. नॉन व्हेज मात्र आमच्या जीभेला वंदनीय आहे. ते टाळु शकत नाही.

तर चांगल्या पगाराची नोकरी, स्वतःच घर नसलं तरी पुढं मागं तेही घेउ शकेन असा पक्का अंदाज. आणि आत्तापर्यंत सांगीतलेल्या पुर्वायुष्यावरून मी पात्र वर ठरू शकतो असा कयास बांधला. आणि माझ्या मुलीबद्दलच्या अपेक्षा काय काय असाव्या या बद्दल विचार विनिमय चालू झाला.

क्रमशः