माझं लग्न ठरताना.. मागून पुढे..मुलीबद्दल अपेक्षा

माझं लग्न ठरताना.. मागून पुढे..

मी लग्न करायचं तर घरच्यांच्या पसंतीनेच असं ठरवलं होतं. तुम्हाला वाटेल काय मनुष्य आहे हा! स्वतःच्या आयुष्याचा एव्हढा मोठा निर्णय दुसऱ्यांच्यावर सोपवणार? तर तसं काही नाहिये. आणि माझे आई पप्पा बऱ्यापैकी खुल्या विचारांचे आहेत. खरं सांगायचं झालं तर त्यांचा प्रेम विवाह झालाय. म्हणजे मला पुर्ण मोकळीक होती अशातला भाग नव्हे. कधी कधी त्यांच्या बोलण्यातून डोकवायची त्यांची सुनेबद्दलची स्वप्नं. मग मी का त्यांच्या हिरमोड करू.  आपले आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात. आपल्या सगळ्या मागण्या पुर्ण करतात. थोडक्यात आपणंच त्यांच सर्वस्व असतो. मग त्यांनी जर माझ्या कडून ही एक अपेक्षा ठेवली तर मी ती पुर्ण करायला नको? तुम्हीच सांगा. मी परस्पर एखादी मुलगी पसंत केली आणि ती घरच्यांच्या पसंतीस नाही उतरली, आयुष्यभर मनात हा सल राहणारच ना?  हा त्यांच्या भावनांचा अपमान नाही का? त्यामुळं सर्व संमतिनं मुलगी पसंत करायची असा सारांश. मुलीबद्दल काय अपेक्षा असायला हव्यात याचा मी नक्कीच कुणाला सल्ला विचारणार नव्हतो. मला माहिती आहे मी कसा आहे. माझ्यातले चांगले गुण आणि दुर्गुण ओळखण्याइतपत मी नक्कीच सुज्ञ आहे.

आई शप्पथ! ज्या दिवशी लग्नाबद्दल सिरिअसली विचार करू लागलो त्या दिवसापसून माझी मुलिंकडे बघायची नजरच बदलली. ऑफिसमधल्या, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या, घरच्यांसोबत असणाऱ्या, ग्रुप मध्ये असणाऱ्या मुली. कसा असतो त्यांचा स्वभाव? त्यांचे हावभाव, हसण्याची पद्धत, केस मागे घेण्याची लकब, कशा उठतात, कशा बसतात, कशा चालतात, बोटांचे गाडीच्या चावीशी, पेनाशी चाललेले खोडकर चाळे, दाताखाली ओठ दाबायची स्टाईल, हाताची घडी कशी घालतात, एकमेकांना टाळ्या देणे, बोलताना मध्येच डोळे मोठे करणे.. मुलींच्या सहज हालचाली टिपून घ्यायची सवयच लागली म्हणा ना! म्हटलं थोडातरी थांग पत्ता लागेल त्यांच्या स्वभावाचा! पण एव्हढं सोप्पं आहे का ते?

नंतर नंतर लग्न झालेल्या, ठरलेल्या मित्रांशी थोडं बोलणं वाढवायला सुरू केलं. ते लोकं नक्की काय विचार करून मुलगी पसंत करायला गेले होते. कधी कधी प्रमाणाबाहेर अपेक्षा ठेवल्या जातात आणि त्यालाच चिकटून बसतात. मग त्या क्रायटेरिया मध्ये बसणारी मुलगी शोधून सापडत नाही आणि पहिली बघितली जाते, मग दुसरी मग तिसरी असं करत करत मग मुलगी बघणे हा विनोद होउन बसतो. आणि नंतर वाटतं अरे यार तेव्हाच तिला हो म्हटलं असतं तर बर्र झालं असतं, पण तो पर्यंत वेळ टळून गेलेली असते. माझ्या माहिती मध्ये दोघेजण आहेत त्यां पैकी एकाने १८ मुलींनंतर १ पसंत केली आणि दुसरा ज्याने आत्तापर्यंत ४२ मुली बघितल्या आहेत तरी अजून लग्न ठरलेलं नाही. काही जण तर अभिमानाने सांगतात ह्या गोष्टी. माझे २ मित्र असे आहेत ज्यानीं एकच मुलगी बघितली, तिच त्यानां पसंत पडली आणि तिच्याशीच लग्न केलं, यात तो जो सतत अस्वस्थ, बैचेन असणारा माझा रूममेट पण आहे! मित्र मैत्रिणिंमध्ये मॅट्रिमोनिअल साईट वरून लग्न जुळवणारे, प्रेम विवाह करणारे आहेत, लग्नापुर्वी स्वतःचं घर असावं म्हणून ३ वर्षे थांबलेलं एक जोडपं ही आहे. जरी सगळ्यानांच ठेचा लागल्या नसल्या तरी मागचा मी मात्र शहाणा बनत होतो. या सगळ्यात माझं काय होणार? या प्रश्नाचं उत्तर त्या क्षणी माझ्याकडे नव्हतं.

शिट! काय करावं? मुलीबद्दल लग्नासाठी विचार करायचा म्हणजे नक्की कुठून सुरुवात करायची? मी हा असा मोठ्या कंपनीत काम करायला मिळतंय म्हणून घरापासून इतक्या लांब आलेलो, वेगळी भाषा, पुर्णपणे वेगळं कल्चर; राहणं खाणं, मेट्रो सिटी मध्ये रहायचं म्हणजे माझा एकट्याचाच कितीतरी खर्च व्हायचा. आणि मराठी मुली म्हणजे शक्यतो महाराष्ट्रातच शिक्षण आणि सहसा घरापासून जवळ नोकरी अशातल्या. सर्व काही स्थिर स्थावर आणि सासर पण पुणे मुंबई असावं असं मनात ठेउन असणाऱ्या मुली घरापासून दोन हजार किलोमीटर दूर आल्या असत्या? येत असतीलही पण या सगळ्यावर पाणी फेरून एक्कलकोंड आयुष्य जगायला. नवरा दिवसभर ऑफिसमध्ये आणि ही घरात! सकाळी त्याला नाश्ता, डब्बा तयार करून द्यायचा; तो निघून गेला की धुणी भांडी करायची, घर साफसुफ करायचं, मग टीवी चालू करायचा त्यावर लागलेल्या मतीभ्र्ष्ट झालेल्या लोकांच्या, दर्शकांची बुद्धीभ्रष्ट करणाऱ्या मालिका, रटाळ सिनेमे, अन त्याचा कंटाळा आला की झोप काढायची. कारण अशा ठिकाणी शेजार  कसा भेटेल, असेल की नाही कुणास ठाउक? आणि नव्या ठिकाणी नोकरी करायची मानसिकता किती मुलींची असते या बाबत माझं काही स्प्ष्ट मत नाही. मग संध्याकाळी अर्धा तास नवरा घरी आला की त्याच्या सोबत भाजी वगैरे खरेदी करायला म्हणून बाहेर पडायचं, रात्री घरी यायचं स्वयंपाक पाणी, भांडी आवरायची झोपून जायचं. ही माझ्या डोळ्यासमोरची दोन उदाहरणे आहेत. त्या दोघींपैकी एक कॉंप्युटर ईजिनिअर तर दुसरी एम. कॉम आहे. एव्हढं शिकल्या पण ज्ञान कधी उपयोगात आणनार? मी त्या दोघांच्या नवऱ्यानां विचारलं  - ते माझे चांगले मित्र आहेत. यावर एकाची प्रतिक्रीया होती " मी काय तिला नोकरीसाठी नाही म्हणालेलो नाही, तिला हवी असेल तर तिनं करावी, पण जर तिलाच घरी बसावसं वाटत असेल तर मी काय करू शकतो? " मान्य. एकदम मान्य. दुसरा मित्र म्हणाला " बायको शिकली आहे ठीक आहे पण तिनं नोकरी नाही केली पाहिजे, तिनं घर संभाळावं, पुढं मागं मुल होइल त्याला मोठं करावं, त्याचा अभ्यास घेताना तिचं शिक्षण उपयोगी पडेल. माझ्या आई वडीलांकडे लक्ष द्यावं यातच सगळं आलं, आणि पैसा काय; मी आणतोयच ना कमवून! काही कमी तर पडू देत नाहिये ना? मग! ".  माझ्या ऑफिस मध्ये माझ्या क्युबिकल मेटचं पण मुली बघायचं चाललं होतं त्याला एके दिवशी सहज त्याच्या मुलिंबद्दल्च्या अपेक्षांच विचारलं, त्यानं दिलेलं उत्तर सगळ्यात वेगळं तुम्हाला विश्वास बसणार नाही असं होतं. त्याला चांगली एम. बी. बी. एस. झालेली, शहरातल्या सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात डॉक्टर असलेली मुलगी चालून आलेली, तिला तो नाही म्हणाला. का? " मुली जास्त शिकल्या की त्या डोक्यावर बसतात. आणि नोकरी करणाऱ्या, लग्न झालेल्या न झालेल्या मुली पुरुष सहकर्मींकडे आकर्षीत होतात आपला तोल हरवतात आणि हाताबाहेर जातात. " आता काय म्हणावं या विचारसरणीला? त्यानं सरसकट नोकरी करणाऱ्या सगळ्या मुलींना 'हाताबाहेर जाणाऱ्या' ठरवलं होतं. त्याला शिकलेली चुल अन मुल सांभाळणारी बायको पाहिजे होती.

एव्हढं मोठं शहर, महिन्याच्या महिना खात्यात जमा होणारा पाच आकडी लट्ठ पगार, एकटा, कुटुंबाची कोणतिही जबाबदारी खांद्यावर नसलेला मी. माझी जीवन पद्धती विशेष चैनीची, चंगळवादी, उधळपट्टी करणारी नव्हती. निर्व्यसनी. पण खायला प्यायला चांगलं, आम्ही चौघात मिळून ऑफिस जवळ, चालत १०मिनिटे लगतील असा, फुल्ल फर्निशड, टी वी, इनव्हर्टर असणारा, २ बी. एच. के. फ्लॅट घेतला होता. सकाळ संध्याकाळ स्वयंपाकासाठी, घर झाडून पुसून घेण्यासाठी, भांडी अन कपडे धुण्यासाठी कामवाल्या बाया होत्या. पंधरा तीन आठवड्यातून एकदा जंगी पार्टी व्हायची. दर दोन तीन महिन्यांतून बाहेर ४ -५ दिवसांची ट्रीप काढायची. कपडे, बुट ब्रॅंडेडच असले पाहिजेत असा काही अट्टहास नव्हता. वर्षातून ४ वेळेला घरी जाणं व्हायचं. त्यात एका बाजुने वेळ वाचवण्यासाठी विमान प्रवास ठरलेला. आणि रेलवेमध्ये वातानुकुलीत द्वितीय श्रेणीतुनच प्रवास करायचो. घरी गेल्यानंतर जबरदस्त रकमेचा चेक पप्पांच्या हातात ठेवताना काय मस्त वाटायचं म्हणून सांगू!

असं माझं आयुष्य लग्नानंतर बदललं असतं का? आणि तो बदल मी स्विकारू शकलो असतो का? कारण टिपिकल संसारी पुरुष म्हटलं की कौटुंबीक जबाबदाऱ्यांमुळे झुकलेला,  अट्ठावीस रुपये किलो मिळणारी भाजी सव्वीस रुपये किलो मिळेल म्हणून मण्डईतून फिरणारा चिंतातुर कीटक डोळ्यांसमोर येतो. मी काय करणार होतो? घरामधलं सशक्त आणि मोकळं वातावरण, निर्णय घेण्याचं पुर्ण स्वातंत्र्य आणि नोकरी, घरापासून लांब राहणं त्यामुळे पैशांच व्यवस्थापन, स्वावलंबनाची आणि बऱ्या वाईटाची जाणीव (मीठापासून पीठापर्यंत सर्व सामान, दूध, भाजी, लाईट, पाणी बील भरणे,  सिलिंडरला नंबर लावणे, वेळ प्रसंगी स्वयंपाकवाल्या बाईने दांडी मारल्यानंतर स्वहस्ते स्वयंपाक, महिन्याच्या महिना हिशोब ठेवणे, सर्वांना वेळेवर पैसे देणे या आणि इतर घर चालवण्यासाठी लागणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलाव्या लागल्या. बचत आणि गुंतवणुक व्यवस्थीत मनाप्रमाणे होत होती. त्याबाबतीत कधीच तक्रार नव्हती.) झाली होती.  झालं मनात विचार चमकून गेला..

माझी होणारी बायको विनापाश आणि नोकरी करणारीच हवी.

तुम्हाला माझी ही मागणी स्वार्थी वाटली का? कृपया तसा गैरसमज करून घेउ नका. मी तिच्या दर महिना कमवून आणणाऱ्या पगाराच्या आकड्याला उद्देशून म्हणत नाहिये. अर्थात तो पैसा आम्हाला आमचा संसार उभा करण्याच्या कामी येइलंच पण मूळ उद्देश हा नाही. यातून दोन हेतू साध्य होतात. म्हणजे नोकरी करण्याइतपत शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्वाचे 'हुशार' 'आत्मविश्वास' आणि 'स्वतंत्रपणा' हे पैलू सतेज होतात. घरातून बाहेर पडल्यामुळे तऱ्हे तऱ्हेचे लोक, त्यांचे स्वभाव, बाहेर काय परिस्थिती आहे, एकुणच सर्वसाधारणपणे म्हणायचं झालं तर जाणीवा व्रुद्धिंगत होतात. पगाराचं आर्थिक पाठबळ मिळतं. खऱ्या अर्थानं ती व्यक्ती सज्ञान झाली असं आपण म्हणू शकतो. आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत आणखी काय करायच्या अपेक्षा असणार?

लहानाचं मोठं होताना आई वडील यांचे स्वभाव, घरातलं आणि आजुबाजुचं वातावरण याचा सरळ सरळ परिणाम मनावर होतो. विचारसरणीलाही तसंच वळण लागतं. त्यामुळं ती जेव्हा मला भेटेल तेव्हा मी या मुद्द्यावर चर्चा नक्कीच करणार. थोडक्यात काय तर मुलगी सुसंकृत घरातील असावी. आणि माझी ही मागणी गैर नक्कीच नाहिये. बरोबर ना?

आत्ताशी कुठं माझ्या मुलीबद्दलच्या अपेक्षांना आकार येत चाललाय. आणि तो योग्य दिशेला पुढं सरकत असावा. नसेल तर तुम्ही मार्गदर्शन करा.

मित्र - मैत्रिणिंना अधून मधून फोन होतच असतात. बोलण्याचे अनंत विषय. बहुमतं. एकमेकांना समजून घ्यायला विषेश प्रयत्न नाही करावे लागत. समवयस्क असण्याचा हा फायदा. लग्न झालेल्या मित्र मैत्रिणींमध्ये (परत तुलनत्मक विचार, मागील पानावरून पुढे... क्षमा असावी) किंवा आजूबाजुला पाहा अशी कितीतरी जोडपी दिसतील ज्यांच्या वयामध्ये सरासरी ३ ते जास्तीत जास्त ५ कधी कधी ७ वर्षे अंतर दिसेल. त्या दोघांच्या वयांच्या सोबत वैचारीक पातळीत पण फरक असणारच ना? जरी एखाद्याचं लग्न २७व्या वर्षी ठरत असेल तर त्याची सहधर्मचारिणी २४ वर्षांची. म्हणजे नुकतंच कॉलेज संपवून आयुष्याला नव्या दिशा देण्यासाठी, नव्या वाटा चोखाळण्यासाठी उतावीळ असलेलं एक अल्लड मन! त्याच्या गळ्यात संसाराचं जोखड अडकवलं की करीअरची भरारी,  नावीन्याचे पंख आपोआपच जबाबदाऱ्यांच्या दोरखंडात निष्प्राण होउन करकचून आवळले जातात. वयानं जास्त असणारा नवरा आपोआपच अधिकाराच्या भावनेनं बायकोवर वर्चस्व मिळवण्याचा कळत नकळत प्रयत्न करतो. जाउ दे. तो फार मोठा विषय आहे. पण नाविन्याचे नऊ दिवस ओसरले की आयुष्याची चौकट बनून जाते. मला नेमकं हेच टाळायचंय.

माझ्या आणि तिच्या वयामध्ये अंतर असणार हे नक्की. कारण ते माझ्या हातात नाही. पण ते एका वर्षापेक्षा जास्त नसावं या बद्दल मात्र मी घरच्यांना स्पष्टपणे सांगणार आहे.

तिच्या पुढच्या शिक्षणाबद्दल, नोकरीबद्दल ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्यांना माझा पुर्णपणे पाठींबा असेल. आणि तिची ध्येय्य साध्य होण्यासाठी मी माझ्या बाजुने जेव्हढे होउ शकतील तितके प्रयत्न करेन.

वर सांगितलेल्या गोष्टी मी काही कुणासोबत चर्चा करून पडताळून पाहील्या नाहीत. तशी मला तरी गरज भासली नाही. पण हे सगळं एके दिवशी मी पप्पांसोबत फोन वर बोललो. त्यांचा सुरवातीला कानावर विश्वासच बसला नाही. त्यांनी आणि आई ने पुर्णपणे सपोर्ट करायची तयारी दाखवली. तशा मागण्या अवास्तव नव्हत्याच ना!

आता राहता राहिल्या अटळ गोष्टी. बाह्यरूप, रंग, उंची, हुंडा वगैरे वगैरे. याबाबतीत मी एकदम निर्धास्त आहे. मग! आई, मावश्या कधी कामाला येणार?

साल २००९, जून महिना, तारीख ३. सकाळी ७ वाजता मोबाईलची घंटी वाजली. घरचा नंबर. इतक्या सकाळी? कारण रोज रात्री जेवण झाल्यानंतर घरी फोन व्हायचा त्यानंतर दुसऱ्याच दिवशी. मी म्हटलं चुकून नंबर लागलेला दिसतोय आणि उचलला. त्या नंतरचा अर्धा तास सुन्न अवस्थेत गेला आणि शुद्धीत आल्यानंतर थरथरत्या हातांनी आणि अंधारलेल्या डोळ्यांनी मिळेल त्या गाडीचं घरी जाण्यासाठी रिझर्वेशन उपलब्ध आहे का ते शोधू लागलो..

क्रमशः