माझं लग्न ठरताना - भाग चार

माझं लग्न ठरताना - भाग एक

माझं लग्न ठरताना - भाग दोन

माझं लग्न ठरताना - भाग तीन

माझं लग्न ठरताना - भाग चार..

रात्री कधी डोळा लागला ते कळलंच नाही अन जाग मात्र मध्यरात्री सहा वाजता आली. झोपायचा प्रयत्न केला पण यश काही आले नाही. इतर दिवशी मात्र ८: ४० ला ऑफिस असल्यावर सव्वा आठला उठून वेळेच्या आत ऑफिस गाठलंय. (कसं ते विचारू नका! ) शेवटी उठलोच.  पटपट आवरावं, आदल्यादिविशी बांधून ठेवलेलं सामान उचलावं, ऑफिसला जावं, बॉसला 'अति-महत्वाचं घरगुती काम' कारण सांगून लवकर सटकावं असं ठरवलं अन तसं केलं. ऑफिसच्या गेट पर्यंत सोडायला दोन मित्र आले. त्यातल्या एकानं निघण्यापुर्वी हातमिळवणी करताना का कुणास ठाउक पण माझा हात दाबला. आमची नजरानजर झाली तेव्हा कायमची ताटातूट होत असलेल्या दोन भावांच्या चेहऱ्यावर असतील असे भाव नकळत आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर उमटले. खरंतर तो विवाहित होता. त्याला कुणालाही काहिही सांगू नको असं बजावून ठेवलं होतं. निःशब्दपणे आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि मी रेलवे स्टेशनच्या मार्गाला लागलो.

रेलवे गाडी ज्या फलाटावर थांबते तेथे येउन पोचलो. अजून पाउण तास बाकी होता. मला रेलवे स्टेशनवर किंवा विमानतळावर, बस थांब्यांवर कधीच बोअर होत नाही. तिथे आलेल्या प्रवाशांच्या, त्यांना सोडायला आलेल्या नातेवाइकांच्या, दंगा करणाऱ्या लहान मुलांच्या थोडक्यात माणसांच्या इतक्या वेगवेगळ्या तऱ्हा बघायला मिळतात ना! गरमागरम चहाचा कप हातात घेउन एखादे मासिक चाळत लोकांना बघण्यातच माझा सगळा वेळ निघून जातो. तसा मला छंदच आहे म्हणा ना. हेच उद्योग मी त्या दिवशीपण ज्या ठिकाणी माझा डबा फलाटावर लागेल त्याच्या समोरच्या बाकड्यावर बसून करत होतो. तेवढ्यात एक नुतन विवाहित जोडपं माझ्या अंगावरून खिदळत पुढे निघून गेलं. 'ती' थोडी नाजुक पण अभ्यंकर नटलेली. तिच्या मानानं 'तो' बऱ्यापैकी थोराड वाटत होता. त्यानं केलेल्या कुठल्याशा चुकार - टुकार विनोदाला तिनं ओढून ताणून चेहऱ्यावर उसनं आणलेलं हसू सहज लक्षात येत होतं. मी मुद्दामच वाकून बघत होतो कुठं जातात ते. ते दोघं फलाटाच्या शेवटच्या टोकाला जाउन आले तरी त्यांना बसायला जागा मिळाली नव्हती. मग भाउनं तिकिट काढून बघितलं, डब्ब्याच्या क्रमांक बघितला अन माझ्या बाकड्या समोरच्या मोकळ्या जागेत सामान सुमान (तुमच्या मनात सामान सुमान म्हटल्यावर जे चित्र उभं राहिलं असेल त्याला ३००% एनलार्ज करा तितकं सामान त्या दोघांकडे होतं. आणि ते सगळं तो एकटा बाळगून होता. ) ठेउन तिच्या शेजारी उभा राहिला. ती उभी असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरची बैचेनी वाढतच चाललेली होती. त्याला काहीकेल्या तिच्यासाठी बसायला जागा हुडकायची होती.  तो इकडे तिकडे बघत असताना माझ्या मनात शंकेची पाल किंचाळत होती 'हा तुझ्याकडेच येणार! ' अन खरंच तो माझ्याकडं आला. 'भैय्या, जरा ऍडजस्ट करो' असं म्हणत स्वतःच तिथे टेकला. परत उठला अन तिला तिथं ती नको नको म्हणत असताना बसवलं. बघितलं तर गाडी लागायला फक्त पंधरा मिनिटं उरली होती, बायकोच ती अन कौतुक ते कौतुकच ना. मग त्यानं तिच्यासाठी वेफर्स, खारे शेंगदाणे, कोल्ड्रिंकची बाटली आणली. पंधरा मिनिटात हे सगळं त्यानं एकट्यानं संपवलं. तिला फक्त एकदा विचारलं असेल ती नाही म्हटली अन हा गटकावून मोकळा. तेवढ्यात गाडी लागली. माझं एकच ओझं असल्याने मी पटकन चढलो. माझी साईड अप्पर बर्थ होती. लगेच सामान खाली सरकवलं आणि वर जाउन बाकी सहप्रवाश्यांची वाट बघत बसलो. अन पाहतो तर काय ही जोडगोळी माझ्याच कंपार्टमेंटमध्ये! एक मिडल अन एक लोअर बर्थ त्यांची. म्हटलं व्वा!! पुढचे सोळा तास चांगलंच मनोरंजन होणार तर. तेवढ्यात आणखी एक नवविवाहित जोडपं आमच्याच कंपार्टमेंटमध्ये चढलं (त्यांचं पण सामान पहिल्या दोघांइतकच होतं). त्यांची दुसरी मिडल अन एक लोअर बर्थ होती. अन उरलेल्या वरच्या दोन बर्थ वर असेच कोणीतरी दोघे चढले. माझ्या खालची बर्थ रिकामीच होती. प्रवास सुरू झाला. त्यानंतर रात्र होईपर्यंत पहिल्या जोडप्यातला 'तो' पुर्णवेळ झोपून होता अन 'ती' त्याचे पाय मांडीवर घेउन बसली होती. मला थोडं विचित्रच वाटलं त्यांचं हे वागणं. या उलट दुसऱ्या जोडप्यातली 'ती' बराच वेळ झोपून होती अन तो तिच्या सगळ्या आज्ञा पाळत होता. अक्षरशः तो तिला पिशवीतून कंगवा काढून देण्यापासून पाणी आणून देण्यापर्यंत सगळी कामं करत होता. खरंच दोन टोकांच्या दोन भुमिका पार पाडणारे नवरे मी बघितले. त्यांची मौजमजा बघत सकाळी रेलवे माझ्या हव्या असलेल्या ठिकाणी पोचली. गाडितून उतरलो अन घरला जाणारी बस पकडली. मागेच सांगितल्याप्रमाणे ६ तारखेला दुपारच्या जेवणाला घरी हजर झालो.

"काय अवतार केलायस तू हा?? " माझ्या वाढलेल्या केसांकडं, दाढीकडं अन काळवंडलेल्या चेहऱ्याकडं बघून आई जवळ जवळ ओरडलीच. "उद्या सकाळी जायचंय त्यांच्याकडे आपल्याला, जा पहिला अवतार सरळ करून ये! " आईला म्हटलं 'अगं जरा थांब, पाणी तरी पिउ दे! ' तेवढ्यात आमचे बंधुराज 'फोटो' नाचवत बाहेर आले. त्याच्या हातातून फोटो हिसकावुनच घेणार होतो पण ते गुढग्याला बाशिंग बांधल्यासारखं दिसलं असतं. मी जवळ जवळ दुर्लक्षच केलं. मग आईनंच त्याच्या हातातून फोटो घेउन 'ढॅं टॅ डॅ न' असा बाँडगीतातल्या संगीताचा तुकड्याचं पार्श्वसंगित म्हणत माझ्यासमोर धरला.  

"ही!! " "माझ्यासाठी!!! " असं म्हणत मी सोफ्यावर कोसळलो.  माझ्या आवाजातला नकाराचा स्वर आईला चांगलाच ओळखू आला होता. अन माझ्या हातातून फोटो काढून घेतानाच्या पद्धतीवरून आईचा हिरमोड झालाय हेही मी ताडलं. पप्पा अजून ऑफिसमधून आले नव्हते. आणि माझ्या नापसंतीची गोष्ट आईला पप्पांपर्यंत लगेच पोहोचू द्यायची नव्हती. मी हात पाय धुवून माझ्यासाठी तयार केलेली बासुंदी व्हरपली. बासुंदीचा वघळ पार ढोपरापत्तुर गेला व्हता. पोट भरल्यानंतर मी मन मोकळं करायला सुरुवात केली. खुप मोठी गोष्ट नव्हती पण फोटो बघून ती मुलगी मनात 'क्लिक' नाही झाली. तिच्याकडं बघून कुठल्याच ऍंगलनं ती डॅशिंग, स्पिरिटेड, लाईवली वाटत नव्हती. फोटो बघुनच तो काढताना आलेलं तिचं अवघडलेपण जाणवत होतं. ती घरापासून दोन हजार किलोमीटर दुर यायला तयार होइल का? मारून मुटकून तयार झालीच तर एकदम नव्या वातावरणात आत्मविश्वासानं वावरू शकेल का? की बावरल्यासारखी करेल? नाहीतर तिची सगळीच जबाबदारी मलाच पेलावी लागायची अन मागे तुमच्यासोबत शेअर केलेल्या माझ्या स्वातंत्र्या - बितंत्र्याच्या भावना सुरळीचे रुप घ्यायच्या.  मनात आलेले विचार, प्रश्न मी सगळं आईला सांगितलं. या बाबतित घरच्यांचं तिच्याशी डायरेक्ट बोलणं झालं नव्हतं. पण तिची आत्या आमच्या शेजारी राहते तिला पुर्वी सांगितल्यानंतर तिनं 'येइल की! त्याला काय झालंय' असं म्हणून प्रश्नाला कदाचीत बगल दिली असावी. जेवण करून आईशी बोलून झाल्यावर हा विषय पप्पांजवळ बोलून दाखवण्यापुर्वी आईनं मला माझी डागडुजी करायला बाहेर पिटाळलं. मी तडक बाईक काढली अन स्वतःची डागडुजी करून घेण्यासाठी सदाकाकांकडं आलो. दुकानात कोणी गिऱ्हाईक नव्हतं. काकांना सांगितलं 'हाफ सोल्जर कट आणि दाढी खंप्लेट कल्ले नको अन मिशी थोडी कोरा'. काकांनी कलाकुसरीला सुरवात केली. कंगवा कात्री डोक्यावरून फिरेल तसे मनात विचार घुमू लागले. तशी ती दिसायला मंद होती अशातला भाग नव्हता पण ती खुप स्मार्ट होती असं ही नव्हतं. शोभून तर दिसली असती पण 'सो सो' कॅटेगरी.


मी आत्ता पर्यंत सांगितलेल्या गोष्टी एका बाजुला अन 'ती' खरोखरच लग्नाला तयार आहे का हे जाणून घेणं पण तितकंच म्हत्वाचं होतं. म्हणजे तिचे आई वडील तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून देतायत का?  तिचं बाहेर अगोदर काही अफेअर होतं का? ती माझ्याप्रती शंभर टक्के एकनिष्ठ आहे ना? हे पण मी तिला विचारणार होतो.  मला तिच्या मनाची तयारी जाणून घ्यायची होती. हे सगळं मी तिच्याशी प्रत्यक्ष बोलल्यावरच कळणार होतं. त्यामुळं तुर्तास विचार करायला नको असं म्हणून शांत झालेलं डोकं सदाकाकांच्या ताब्यात दिलं. त्यांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली. चेहऱ्यासमोर अन डोक्यामागे धरलेल्या आरशात बघून मी त्याची खात्री करून घेतली. घरी आलो. थोड्यावेळाने पप्पापण आले. त्यांना ही गोष्ट मी आपणहून सांगितली. उद्या जोपर्यंत त्यांच्याकडे जात नाही तोपर्यंत मला उत्तराची वाट बघत थांबवं लागेल असं दिसलं. म्हटलं छोडो यार.. अन संध्याकाळी मित्रांसोबत भटकायला बाहेर पडलो. पण त्यातल्या कुणाला मी कानोकान ही खबर लागू दिली नव्हती. रात्री जेवताना हा विषय निघालाच. त्यातून तिच्याबद्दल थोडी माहिती कळली.

ती तिच्या आई वडीलांची लग्नानंतर चौदा वर्षांनी झालेली कुटुंबात सगळ्यात लाडकी वैष्णोदेवीला केलेल्या नवसाची पोर होती. बी. एस. सी. मध्ये कॉलेज टॉपर अन एम. एस. सी. प्रथम वर्ष युनिव्हर्सिटी टॉपर राहिलेली मुलगी कोल्हापुरात शिकायला होती अन पर्यावरणशास्त्र विषय असल्याने रंकाळा बचाओ नावाच्या एन. जी. ओ. ची कार्यकर्ती होती. आंदोलन, साफ सफाई मोहिमेत हिरिरीने भाग घ्यायची. हे ऐकल्यानंतर डोक्याला जे शॉट लागले अन माझ्या या अगोदरच्या लावलेल्या अंदाजांचा साफ चुराडा झाला.  मला माझ्या विचारसरणीतला संकुचितपणा अन आततायी निर्णय घेण्याचा, अंदाज लावण्याच्या उथळ स्वभावाचा तिरस्कार वाटू लागला. तिच्याबद्दल माझ्यामनात आदर वाढला. भले लग्न नाही झालं तरी चालेल पण एक स्वभावाला पैलू पडलेलं व्यक्तिमत्व म्हणून मला तिच्याकडून बरंच काही घेता आलं असतं. या विचारात जेवणं उरकली. सकाळी साडे दहा वाजता घरून निघायचं ठरलं. आमच्या इमारतीत दुकान असणारे पप्पांचे एक चांगले मित्र त्यांची कार घेउन ते स्वतः येणार होते. झोपण्यापुर्वी मी माझी खरेदी पाहून सर्वांना संतोष जाहला.


मध्यरात्री सहालाच डोळे खाडकन उघडले.  अंथरुणात उठून बसलो. सुरवातीला घरच्यांचा डोळ्यावर विश्वास बसेना. पण आजचा स्पेशल दिवस असल्याने त्यांनी समजून घेतले.  सात वाजेपर्यंत मी तयार! आता काय करायचं? वेळ म्हणून जात नव्हता. थोडी मनात चलबिचल होती. अस्वस्थता वाढत चालली होती. पण मी शक्यतो चेहऱ्यावरची कातडी विस्कटू देत नव्हतो.  तेवढ्यात पेपर आला. तो  आठ वाजेपर्यंत आठवेळा वाचून झाला. पण माझी अवस्था बघून आईनं तिचा चहाचा कप पुढं केला अन तो मी पिला. असं चार वेळा झालं. पाचव्या वेळेला आईनं तिचा चहा बशीत ओतून घेतला अन अर्धा कप माझ्यासमोर धरला. तो पण मी पिला. लाईट गेले होते. पप्पांची देवपूजा चालली होती. बंधुराज अंथरुणात काल रात्री जे गायब झाले होते ते अजून आतमध्येच. आई स्वयंपाकघरात. मी बाहेरच्या खोलीत. मेंदुच्या विचार करण्याच्या भागाची एंट्री आणि एक्झीट बंद झाली होती. डोळे समोरच्या भिंतीवर खिळावलेले. पाय गुंफलेले तसेच. हात गुडघ्यावर. सर्व निश्चल. नाही नाही!! पडदे हालत होते. पहाटे दहा वाजता कारवाले जाधवकाका येते झाले. "अरे उठ! बसलायस काय.. निघायचंय ना? नवरी नकोय वाटतं एका नवऱ्याला? " मी मनात म्हटलं 'नकोचय'. कसाबसा उठलो. जड हातांनी आवरलं. अकरा वाजत आले होते. सगळेजण तयार झाले.

ठिकाण - धवनगड. घरापासून साधारण ३५ किलोमीटर दूर एक तालुका. तिथं त्यांच घर आहे पण आई - वडील नोकरीच्या ठिकाणी - पनवेलला. आणि ही कोल्हापुरात शिकायला.

गाडीत बसलो. 'धड - धड धड - धडधड - धड' गाडीत बिघाड झाला होता काय? मी जरा लक्ष देउन ऐकलं. अरे!! ही तर माझ्याच हृदयाची धड - धड होती. कानशिलं गरम झाल्यासारखी वाटत होती. हात पाय थंडगार पडले होते. पोटात गोळा आला होता. मी खरंच घाबरलो होतो. मी तिच्या मनाची तयारी तपासायचं म्हणत होतो पण इथे माझंच मन अंड्याच्या टरफलासारखं चुरा होउन पडलं होतं. समजा ती मला पसंत पडली असती, सगळं मनाप्रमाणे जुळलं असतं, मी तिला हो म्हटलं असतं. पण... पण पुढे काय? तिला आपली माणसं, मित्र - मैत्रिणी, भविष्यातले प्लॅन्स, सगळं उलथं पालथं झालं असतं. नव्या जागेत, सर्वस्वी नव्या वातावरणात रुळणं भाग पडलं असतं. तिनं कधी ना कधी मला दोष दिलाच असता. एव्हाना आमची गाडी धवनगडमध्ये पोचली होती. मुख्य रस्त्यावरून उजवीकडे वळून आत थोड्या अंतरावर रस्त्यालाच अगदी लागून असलेल्या एका बैठ्या घरासमोर थांबली.

बाहेरून विशेष आकर्षक नसलं तरी त्याच्या बांधकामात बराच पैसा लागल्याचं लक्षात येत होतं. म्हणजे घर बऱ्यापैकी सधन होतं तर. घराच्या मागेच धवनगडाचा पायथा सुरू होत होता. घरातौन बाहेर पडण्यासाठीच्या पायऱ्या थेट रस्त्याच्या कडेलाच उतरत होत्या. खालच्या पायरीवर बूट काढले. घरात शिरल्या शिरल्या नाकाला जाणवला तो टिपिकल खेडेगावतल्या घरात असतो तो शेण, गोधडी, पोतं, गुरं यांचा एकत्रीत वास. व्वाह!!  बैठकीच्या खोलीत बसलो. पहिल्याप्रथम भिंतिंना टांगलेली चित्रं, कॅलेंडर, रंग उडालेल्या जागा, डोक्यचं तेल लागलेल्या जागा बघून घेतल्या. त्यावरून खोलीची आसनव्यवस्था बदलल्याचं लक्षात आलं. बैठकीच्या खोलीला लागून एक झोपायची खोली नंतर स्वयंपाकघर. बैठकीच्या खोलीतून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जीना. त्यावर गच्ची. पाणी आलं. ते पीत खोलीत उपस्थीत मनुष्यप्राण्यांवर नजर फिरवली. साताठ जण तरी असतील. सगळेजण माझ्याकडेच बघत होते. दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी असलेल्या दरवाज्यातून स्त्रीवर्ग डोकावत होता. अन सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओळखीचं अनोळखी हसू. अशक्य प्लास्टीक. ते बघून मला हसायलाच आलं. प्रत्येकाला वाटलं याने आपल्यालाच प्रतिसाद दिला. म्हणून परत हसू. आता ओळख परेड चालू झाली. जो मला जसा नमस्कार करत होता त्याला मी तसंच उत्तर देत होतो. म्हणजे कोणी हात जोडले तर मी पण हात जोडायचो, कुणी मानेनं केला तर मी पण मानेनं. मग फॉर्मल गप्पा चालू झाल्या. सगळं माहित असुनही परत पत्रिकेची उजळणी. बायो डेटा मध्ये लिहिलेल्या माहितीवर आधारीत प्रश्न विचारले गेले. त्यात गाळलेल्या जागा, ऑड मॅन आउट, संदर्भासहित स्पष्टीकरण वगैरे प्रश्न होते. नशीब सिलॅबस बाहेरचं काही विचारलं नाही. आता मध्यंतर झालं. त्यात सरबत आलं. आई स्त्रीवर्गात सामील झाली पप्पा कर्त्या पुरुषांसोबत तंबाखू मळते झाले. आता त्या खोलीत सगळ्यात दुर्लक्षिला गेलेलो असा मीच शिल्लक होतो. बंधुराजांसोबत 'दोन ठेउन देईन' या भरतवाक्यासोबत संभाषण संपवणारा मी चक्क त्याच्याशी मार्केटमध्ये नवीन आलेल्या 'हाय का भुसा' बाईकचे सस्पेन्शन कसे चांगले आहे, व्हील बेस मोठा असण्याचे फायदे या विषयात मला असलेलं गम्य दाखवू लागलो. मंडळींच्या कौतुकमिश्रीत नजरा माझ्याकडे खेचून घेण्यात मी थोडा यशस्वी झालो. तंबाखुचा एक बार झाल्यावर "आता येउद्या मुलीला बाहेर" असं पप्पांनी म्हटल्यावर माझी मघाचची धडधड 'धड्याक धुडुम ठो ठॅक थुड थुड' व्हायला लागली. फुफुसांचा आतल्याआत भाता झाला.

ती अवतरली. फोटोतली ती हिच का हा मला पडलेला पहिला प्रश्न. बैंगनी रंगाची सोनेरी काठाची साडी तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत होती. तिला माझ्यासमोरच्या खुर्चीत बसवण्यात आलं. तोवर आई माझ्या बाजुला येउन बसली होती. "हं, विचारा एकमेकांना काय विचारायचं असलं तर" कुठुनतरी आवाज आला. मी क्षणाचीही उसंत न  घेता माझं कामाचं स्वरुप, ठिकाण ईत्यादी बद्दल माहिती आहे का? असं विचारलं. ती हो म्हणाली. पण हे सगळं म्हणताना तिची नजर थेट माझ्या नजरेला भिडली होती. मग तिनं मला माझं शिक्षण, खाण्याच्या आवडी निवडी बद्दल विचारलं. तिच्या बोलण्यात एक मोकळेपणा होता. कसलंही दडपण नव्हतं. या उलट माझ्याच घश्याला कोरड पडली होती. आता कोणच कोणाशी बोलेना. मी पप्पांना नजरेनं खुणावलं. त्यांनी पण लगेच समजून "आता या दोघांना जरा एकटं सोडुयात ना.. म्हणजे त्यांना आणखी खोलवर विचारता येइल. " तिच्या वडिलांनी लगेच होकार भरून "हो हो! तुम्ही दोघं वरती गच्चीत जा गप्पा मारायला" म्हणाले. ती पुढे चालली होती मी तिच्यामागून जीना चढत होतो. तिनं विशेष मेकअपकेला नव्हता. मोजकेच पण उठावदार सोन्याचे दागिने. बांगड्या. पायात पैंजण. मध्यम बांधा. केस कमरेपासून थोडे वरती. मानेजवळ केसांना क्लिप लावलेली. बाकी मोकळे. तोवर गच्चीत आलो. दारातून बाहेर पडल्या पडल्या समोर धवनगडाचा माथा अन त्यावर फडकणारा भगवा झेंडा डोळ्यात भरत होता. पावसाच्या सरी येउन गेल्या असाव्यात. हवेत मंद गारवा. मी तिला माझ्या मनातलं सगळं एका दमात सांगून टाकलं. अन सोबत हे सगळं तुझ्या मनाविरुद्ध तर होत नाहिये ना? असं विचारयला पण विसरलो नाही. तिनं मग सानून टाकलं, हॉस्टेलवरचं लाईफ, मित्र - मैत्रीणी, पुढं शिकून एम. टेक. करायची इच्छा. एन. जी. ओ. मध्ये काम. खुप स्पष्ट, कुठल्याही दडपणाशिवाय ती माझ्याशी बोलत होती. ती मला पसंत होती!! मी तिला हेही सांगून टाकलं. ती ही नुसतं मानेनंच हो म्हणाली. मी आणखी काही बोलण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्यात आमचे बंधुराज वरती आले अन त्याच्या पाठोपाठ आई, पप्पा, तिचे आई वडिल आले. मागून चहा आला. चहा पीत वरच्या मोकळ्या हवेत गप्पा मारल्या. खाली गेलो तेव्हा कांद्या - पोह्यांचा वास त्या शेण वगैरेच्या वासावर ताण करू पाहत होता. नेमका त्या दिवशी माझा उपवास होता. माझ्याच कांद्या पोह्यांच्या कार्यक्रमात मलाच ते खायला मिळाले नाहीत. माझ्यासाठी लगेच दुकानातून बटाटा आणि साबुदाणा चिवडा आणला गेला. पोटभर खाउन वर एक कप चहा पिउन तिच्या घरून निघालो. पण निघण्यापुर्वी मी तिचा स्वतःचा मोबाईल नंबर घ्यायला मात्र विसरलो नव्हतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद होता. मी माझी पसंती गाडीतच जाहीर केली अन पप्पांनी लगेच ९ तारखेला सत्यनारायण घालायची घोषणा केली. त्या दिवशी रात्री आलेल्या झोपेला शब्दशः 'सुखाची झोप' म्हणावं लागेल.  ८ तारखेला सत्यनारायणाच्या पुजेची तयारी केली. ९ तारखेच्या सकाळी जोशीकाका आले अन 'चांगलं काम करताय' अशी पोचपावती पण दिली. घाटगेंना निरोप गेला. 'तिघेही या'. संध्याकाळी साडेचार वाजता त्यांचा फोन आला. पाच वाजता ते नवरा बायको दोघंच - तिचे आई वडील ते आले. शुची कुठाय विचारलं तर म्हणाले तिला कॉलेजवर महत्वाचं प्रेझेंटेशन असल्यामुळं ती कोल्हापुरला निघून गेली होती. माझ्या मनाचा हिरमोड झाला होता पण माझ्यासाठी शिक्षण महत्त्वाचं असल्यामुळे मी जास्त लक्ष दिलं नाही. हळू हळू प्रसादासाठी मंडळी, शेजारी पाजारी, माझे मित्र मैत्रिणी, पप्पांच्या ऑफिसमधले जमू लागले. सगळ्यांची माझ्या भावी सासू सासऱ्यांची ओळख करून देण्यात आली. समारंभ संपल्यानंतर तिचे आई वडील नघून गेले अन रात्री जेवण करून गाढ झोपी गेलो. दुसऱ्यादिवशी सामानाची बांधाबांध करायची होती. ११ ला परत जाणाऱ्या ट्रेनचे बूकिंग केले होते. ११ला सकाळी बस पकडली दुपारी रेलवे स्टेशनवर पोचलो. यावेळी माझे लक्ष कुणाकडेच नव्हते. गाडी फलाटाला लागली मी जादू झाल्यासारखा आत चढलो. घरातून निघाल्यापासून २४ तासानी ट्रेन थांबली तेव्हा तरंगत स्टेशनच्या बाहेर आलो. तडक रिक्षा पकडून रूम वर आलो. गेल्या २४ तास झालेल्या प्रवासाचा शीण कोठेच दिसत नव्हता. रूम मेट ऑफिसला निघून गेले होते. घड्याळात बघितलं तर १२ तारखेचे सकाळचे साडे नऊ वाजले होते. पंधरा मिनिटात फ्रेश होउन पळत ऑफिस गाठले. ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर बॉसनं पण हाफ डे लावला नसता. रिसेप्शनला लावलेल्या बोटांचे ठसे स्कॅन करून हजेरी नोंदवणाऱ्या यंत्रावर माझी हजेरी लावली अन मोट्ठा श्वास घेउन पायऱ्या चढायला लागलो. ऑफिसच्या दारासमोर पोचतो न पोचतो तोच मोबाईलची घंटी वाजली. बघतो तर घरचा फोन. अरे हो.. आपण व्यवस्थीत पोचलो हे सांगितलच नाही, पटकन आईला सॉरी म्हणू असं म्हणत फोन उचलला.

"तुझं शुचिस्मिता बरोबर ठरलेलं लग्न मोडलंय. आत्ताच कुणाला काही सांगू नको. " मामा फोनवर बोलत होता. पुढंच मी ऐकलं नाही. फोन माझ्या हातातून गळून पडला होता.

क्रमशः