माझं लग्न ठरताना - भाग तीन

माझं लग्न ठरताना - भाग तीन (पहिले {? } कांदे पोहे - १)

माझं लग्न ठरताना - भाग एक

माझं लग्न ठरताना - भाग दोन

तो फोन आईचा होता. घरी आलेल्या फोटो पत्रिकांपैकी फोटो + पत्रिका अशा दुहेरी कसोटीला उतरलेली 'एक मुलगी' माझ्यासाठी आई, पप्पा आणि मावशी यांनी सर्व संमतीने पसंत केली होती आणि माझ्या पसंतीची अपेक्षा - 'तुला आवडेलच! ' (दबाव) होती. आणि सकाळी सात वाजता करण्यामागे उद्देश हा होता की आठ वाजता रेलवेचा तत्काळ कोटा उपलब्ध झाल्यावर त्यामधून मी रिझर्वेशन करू शकेन. हे सगळं इतक्या तडकाफडकी झालं की मला विचार करायला वेळच मिळाला नाही. त्यामुळंच मी थोडा सुन्न झालो होतो. म्हणजे विचारांची दिशा खुंटली होती. त्या दिवसापर्यंत मी मुली बघणं (लग्नासाठी) खुप हलकेपणानं घेतलं होतं, अन शेवटी ती वेळ आली होती. माझ्या मनात त्यावेळी थोड्या संमीश्र भावना होत्या. आनंद ही होता आणि या प्रक्रियेमधल्या यांत्रीकपणाबद्दल थोडीशी चीड पण. या चीडखोरपणावर उत्साहानं मात केली. त्याच दिवशी ५ जून चे तिकीट मिळाले, ६ तारखेला दुपारच्या जेवणाला घरी हजर. सकाळी घाई गडबडीमध्ये फोन बंद करावा लागला होता. ऑफिसमध्ये आल्यावर कामातून वेळ काढून ही शुभ वार्ता देण्यासाठी घरी फोन केला. आई होतीच घरी. बोलता बोलता मग आईला विचारलं, जरा सविस्तर सांग म्हणलं मॅच कशी फिक्स केली ते? आईनं सांगायला सुरुवात केली..

शुचिस्मिता घाटगे. ( अशा नावाची मुलगी असू शकते हे तेव्हा पहिल्यांदा कळलं. ) मस्त नाव. प्रभावित होण्यासारखं. हिला शोधायला घरचे नक्की कुठे गेले होते ही शंका तेव्हढ्यात मनाला चाटून गेली. शिक्षण - बी. एस सी. + एम. एस सी. पर्यावरण शास्त्र दुसरे वर्ष चालू. मनाजोगं शिक्षण. दिसायला बरी. म्हणजे आईच्या म्हणण्यानुसार मला शोभेल अशी. हे ऐकल्यानंतर मला माझी पत उंचावलेली आहे की खालावलेली तेच कळेना. आता मुलीचा फोटो स्कॅन करून मागवणं पण प्रशस्त दिसलं नसतं. म्हटलं हरकत नाही. पण पहिल्यांदी घरच्यांचं मत काय आहे ते तर विचारून घेउ. पत्रिका अगदी व्यवस्थीत जुळली होती किंबहुना जोशीकाकांनी ( जोशीकाका म्हणजे आमचे  परंपरागत ब्राम्हण - वीस वर्षात सत्यनारायणाच्या पुजेपासून वास्तुशांतीपर्यंत सगळी कार्ये त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पार पडली आहेत. ) सांगीतले की अशा परफेक्ट जुळणाऱ्या पत्रिका त्यांना त्यांच्या करीअर (? ) मध्ये तीन - चार वेळेलाच पाहण्याचा योग (हा त्यांचाच शब्द) आला होता. त्यामुळं खरंतर घरचे जाम इंप्रेस झाले होते. आणि देणं - घेणं यात याचं त्यांच्या लेखी विषेश महत्त्व नव्हतं. मला माहिती आहे ते कधीच अवास्तव मागणी करणार नाहीत पण मुलीच्या वडिलांची किती तयारी आहे हे मात्र नक्की बघतील. माझी काय कल्पना होती की घरचे अगोदर मला सांगतील की बाबा एक स्थळ आहे, अमकी अमकी मुलगी आहे, पत्रिका जुळतीये, अमकं अमकं शिक्षण झालंय आणि मला फोटो स्कॅन करून पाठवतील अन मग मी सांगेन पुढे जायचे की नाही पण इथं नेमकं उलटं झालं होतं. मी थोडा हिरमुसलोच होतो त्यामुळं. पण घरच्यांनीच पसंत केलीये म्हटल्यावर मी तिकडे दुर्लक्ष केलं. आईचं 'मला शोभेल अशी' वाक्य दुहेरी आघात करत होतं. नक्की काय म्हणायचं होतं तिला काय माहीत. मग मी पण माझी अट आई पप्पांसमोर ठेवली की ज्यावेळेस आपण तिला बघायला जाउ तेव्हा तिच्या वडिलांशी पप्पांनी बोलून आम्हाला थोडं एकटं सोडायचं. म्हणजे मागील दोन लेखांमध्ये मी व्यक्त केलेल्या भावना तिच्यापर्यंत पोचवू शकेन जेणेकरून आम्हा दोघांमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता येईल. हे घरच्यांनी कबुल केलं.

मग खुप धम्माल वगैरे काही उडाली नाही पण स्वतःकडच्या कपड्यांच्या आणि पादत्राणांच्या संग्रहात एकही जोड असा नव्हता जो घालून मी मुलगी बघायला जाउ शकेन हे कळलं अन सगळ्यांनीच असं सांगीतलं. आणि मी ते ऐकलं कारण कपड्यांच्या रंगसंगतीची निवड अथवा भेंडीच्या ढिगाऱ्यातून ताज्या भेंड्यांची निवड अशा काही 'निवड'क गोष्टींमध्ये माझा आत्मविश्वास लाल गवत चरायला जातो. आता मला स्वतःचीच दया यायला लागली. नशीब कधी कुठल्या मुलीला प्रपोज नाही केलं. नाहीतर 'तुला चॉईस वगैरे काही आहे की नाही?' हे तिच्याकडून (अन तिला बघून मित्रांकडूनही..काहिही झालं तरी ते आपले हितचिंतकच असतात ना..) ऐकावं लागलं असतं. असो. तर वस्त्रप्रावरणं या आघाडीवर लढण्यासाठी खरेदीची मोहीम उघडावी लागली. पण या खरेदीमध्ये मी सोडून  मित्रांपैकी कोणीच इंटरेस्ट दाखवत नव्हतं. मग लक्षात आलं, कुठे बाहेर फिरायला गेल्यानंतर घरच्यांसाठी, मित्रांसाठी खरेदी करतानाची माझी चिकित्सक दृष्टी या लोकांनि पुरेपुर ओळखली असणार. 'चला, नुसतं बघून तर येउ' असं म्हणून मित्रांना घराबाहेर काढलं आणि दुकानांमध्ये घेउन गेलो. मी कुठल्याही दुकानात कसल्याही रंगाच्या शर्ट पॅंटची जोडी काढली की 'हीच घाल त्या दिवशी' असं सांगत. मी त्यांचा स्वतःच्या आयुष्यामधले काही मौलीक क्षण वाचवण्याचा डाव ओळखला आणि नुक्कड पिझ्झा प्लेसवर नेउन इंधन चारले मग कुठे त्यांचा परफॉर्मन्स वधारला, म्हणजे ते स्वतःहून काही रंगसंगती सुचवायला लागले. जीन्स - टी शर्ट पासून सुरुवात झाली पण असंस्कृत दिसतं ते झब्बा पायजमा हे अतिसंस्कृत दिसतं यातून झब्बा आणि जीन्स असाही एक पर्याय निघाला पण तो तिथे उपस्थीत नसलेल्या माझ्या आई वडिलांना पसंत पडणार नाही अशा माझ्या अंदाजामुळं खोडला गेला. शेवटी पाश्चिमात्यांचं अंधानुकरण न करता ऑफिसवेअर फ़ॉर्मल्सची निवड करावी असा दुहेरी फायद्याचा ठराव एकमुखानं एकमत झाला अन मी ट्राय करण्यासाठी कमरेचा बेल्ट ढीला केला. 'साधारण किती इंच मापाची पॅंट लागेल जरा मोजून बघता का?' असं त्या कपड्यांच्या दुकानातल्या विक्रेत्याला सांगितल्यावर तेथे उपस्थीत मालक, नोकर चाकर, इतर ग्राहक अन मित्रमंडळी यांच्या डोळ्यात जो भाव दाटला तो बघून 'ऑफिस जॉब! बैठं काम आहे ना, त्यामुळं..हॅहॅ..थोडसं होतं असं..हॅहॅ'. सांगताना माझं पावसात भिजलेलं कुत्र्याचं केविलवाणं पिलू झालं होतं (तेव्हा मला माझं नाव बदलून दीनानाथ.. बोले तो दीन + अनाथ ठेवल्यासारखं वाटलं). माझ्या कपडे खरेदीला जाताना नेहेमीच एक काळी अद्रुष्य मांजर आडवी येते, माशी शिंकते, कुत्रे रडतात. अशुभ संदेश देणाऱ्या एकजात सर्व प्राणीमात्रांना माझ्या कपडे खरेदीची बहुदा चाहुल लागत असावी. म्हणून मी वर्षातून दोनदाच कपडे घेतो. त्याला कारण म्हणजे माझा रंग. तो नक्की कसा आहे हे अजून तरी कुणाला छातीठोक पणे सांगता आलेलं नाही. मला अजून आठवतंय.. लहानपणी दिवाळीला आई पप्पांसोबत माझ्या कपडे खरेदीला जाताना एस. टी. स्टॅंड मग खालचा रस्ता - वरचा रस्ता ते खण आळी पर्यंत सगळी दुकानं पालथी घालुन सॉरी उलथी पालथी करून शेवटी एस. टी. स्टॅंड शेजारच्या पहिल्या दुकानातच पाहिलेला शर्ट चांगला होता असं त्यांचं मत बनतं आणि दोन अडीच तासांच्या पायपीटीनंतर त्या दुकानदाराला ओळखीचं हसुं दाखवत त्याने कपड्यांच्या ढिगाऱ्यातून नेमका तोच शर्ट उपसून दिल्यानंतर त्याला बक्षीस म्हणून धाकट्या भावाची कपडे खरेदीही तिथेच करायचो. थोडं विषयांतर झालं. हां, तर कुठं होतो? बरोबर कपड्याच्या दुकानात. माझ्या रंगाचा तिथेही प्रॉब्लेम आलाच. कुठलाच चांगला दिसणार नाही ते कुठलाही चांगला दिसेल अशा मतांचे माझ्या मित्रगणांमध्ये दोन गट पडले. मग मीच वैतागून एक फिकट गुलाबी रंगाचा अन पहिल्या नजरेत कळणार नाही अशा सुरेख नक्षीचा शर्ट आणि काळ्याच्या जवळ जाईल अशा गडद तपकीरी रंगाची पॅंट निवडली अन हीच मला चांगली दिसेल असं मित्रांना निक्षून सांगितल्यावर माना वर खाली - डावीकडं उजवीकडं हलल्या. पण या जोडीची किंमत बघून खिसा अन मी दोघेही चाट पडलो. पादत्राण खरेदीपर्यंत मित्रांच्यात त्राण उरले नव्हते मग कोल्ड्रिंकने सगळ्यांची अन्ननलीका धुवून काढली. पादत्राणांची खरेदी लगेच झाली. गडद तपकीरी व्रिंकल्ड लेदरचे निमुळत्या टोकांचे 'लेस'लेस बुटं घेतले. भरल्या मनाने अन रिकाम्या खिश्याने घरी आलो तेव्हा मित्रांच्या तोंडावरून समाधान ओसंडत होते. दुसऱ्या दिवशीची ट्रेन होती. सामानाची पॅकापॅक करून झाल्यानंतर चार घास हादडून अंथरुणावर पडलो तेव्हा कशी असेल 'ती'? या विचारांत कधी डोळा लागला ते कळलंच नाही.

क्रमशः