दीस

कसे म्हणू की हलके झाले भार दिसांचे ?
सुरूच मरणोत्तरही जर उपचार दिसांचे ?

उदासवाण्या रात्रींचे, बेजार दिसांचे
युगे युगे एकाकीपण; शृंगार दिसांचे

नकोस विसरू हुंदडताना, बागडताना
जिवा, किती छोटे आहे आवार दिसांचे

पदर जरा ढळता रात्रीचा हादरलो मी
अध:पतन कैसे व्हावे स्वीकार दिसांचे ?

निशांत होण्याचे लक्षण कोठून दिसावे ?
चहूकडे भरले मायाबाजार दिसांचे

"दिव्या, दिव्या दीपत्कारा"सम सहज नसे ते
उजळुन जाणे शब्दांनी अंधार दिसांचे

कशास घाई, संध्या-छाया स्पष्ट दिसू द्या
निवांत काढू तेव्हा सारासार दिसांचे