ह्यासोबत
"धोंड्याऽऽऽऽऽऽ"
गडप अंधारातनं आलेली हाळी दगडाच्या भिताडावर आदळून परत त्याच अंधारात गप्प झाली. आन येकाच घटकेच्या शांततेनंतर दचकलेली जंबेल आवाजाच्या दीशेने भूकत अंधारात झेपावली. धोंड्या जेवत्या ताटावरनं उठून पळतच बाहेर आला आन तीला सावारलं. न्हायतर आज भगवान नानाला पार फाडलाच होता तीनं!
"कोण हाय गा?... भगवान नाना? एवढ्या रातच्याला! "
"आरं... आरं लेका धोंड्या त्या कुत्रीला रातच्याला तर बांधून ठीवत जा की रं! " नानाच्या कापरं भरलेल्या आवाजावरनंच त्येंची हाबकलेली अवस्था कळत होती!
"आवं नाना लांडग्यांनी पिसूळ आणलाय गावाला... आन तुमी म्हनताय कुत्री बांधून ठीवा! रोज येक कुणाचं तरी मेंढरू उचलून नेत्यात म्हणं लांडगी! आमच्या जंबेलमुळं ह्या भागात तर अजून लांडगं फीरकलं न्हाय आजपतूर" कंदील घेउन बाहेर आलेली धोंड्याची आई नानाचा चेहरा निरखत बोलली. कंदीलाच्या उजेडाला बघून कुत्रीबी समजल्यावानी, तीनंच खोदलेल्या डबर्यात शेपूट सावरून, अंगाचं मुटकुळं करून बसती झाली. पर वस्तीवरच्या बाकीच्या कुत्र्यांचा अजूनबी राहून राहून योट चालूच होता.
"व्हय ती बी खरंच हाय म्हणा वयनी.... लांडग्यांच्या तरासावर तोडगा काढायला गावात चावडीवर धनगरं जमली हायंत आज, असं ऐकलं म्या बी. " जरा जीवात जीव आल्यावानी बोलत नाना वसरीवर टेकला. पर नजर अजूनबी जंबेलवरच खीळलेली! जंबेलनं कान झटकलं आणि पुढचं दोन पाय पसरून त्यांना चाटत नव्या माणसाला नीरखू लागली. धोंड्यानं कंदील होलकडीला अडकवला आणि त्याची वात वाढवली. मग ताटावर बसला.
"नाना, भाकर? "
"आरं न्हाय, तुझं होऊंदे. जेऊनच निघालो बघ घरनं"
कोंडाक्कानं जमीनीत पुरलेल्या माठातनं तांब्याभर पाणी काढून भगवान नानाच्या हातात दीलं.
"तुमी एवढ्या रातच्याला काय काम काढलासा म्हणं गरीबाच्या घरला? आन मुंबैसनं कवाशी आला? "
नानानं गळ्यापर्यंत भरलेल्या तांब्यातलं थोडं पाणी आधी बाहेर जमीनीवर सांडवलं. चूळ भरुन मग घटाघटा अर्धा तांब्या वरनंच पोटात वतला.
"काय इशेस नाय... असंच सहज आलतू... साळंला सुट्ट्या पडल्यात पोरास्नी त्यामुळं समदं बिर्हाडच घेऊन आलुय. मळ्यातबी थोडी कामं काढल्यात आवंदा. हीरीचा गाळ काढायचं चालू हाय. "
भगवान नाना मुंबईला नावा शीवा(न्हावा शेवा) बंदरावर हमालीचं काम करायचा. त्याने मुंबैत दोन खोल्या घेतल्या होत्या, स्वतःच्या करतबगारीवर. त्याच्या ओळखीवर त्यानं गावातल्या धा-पंधरा पोरास्नी नावा शीवात चिकटवलं होतं. त्यामुळं गावातबी चांगलीच पत होती नानाची. शेतीमुळं गावी सारखाच येउन जाउन असायचा. एवढी वर्स मुंबैत राहुनबी त्याचा जीव मातुर गावात गुतलेला होता.
"मंग ह्या पावटी तुम्ची मुंबैकरीण येक म्हैना गावात राह्यला बरी तयार झाली! " कोंडाक्कानं ना राहवून टोमणा मारलाच. पण तीलाबी बोलून गेल्यावर ल्हान तोंडी मोठा घास घेतल्यावानी वाटलं. ते तीच्या चेहर्यावर दीसत होतं.
नाना मिश्यांच्या आड अवघडल्यावाणी हसला. "राह्यील की!... ती तर काय मुंबैत जनमल्या व्हय. कवातर तीलाबी कळीलच... शेवटाला गावच्या मातीतच मिसळून जायचं हाय ती! "
"पोरं साळंत शिकत्यात त्यामुळं जमत न्हाय गा सारकं येणं. " नानानं बाहेर अंधाराकडं बघत सारवासारवी केलीच.
"तीबी हाय... आन गावांत काय ठीवलंय आता... पहिल्यावानी कायसुदीक राह्यलं नाय बगा! " जास्ती लांबड न लावता कोंडाक्क्कानं तीची पानाची चंची नानाच्या समोर धरली.
"नाना ह्या धोंड्यालाबी बगा की कोण घेतंय का तीकडं ते. मी म्हंत्या कुठवर गावाची मेंढरं राखणार हाय ह्यो. "
"मी कवाचा इचारतुय त्याला... त्यालाच गांव आन किडबीसरीचं डोंगार सोडवीनात. "
अडकीत्यानं सुपारीचं खांड कातरत नानानं धोंड्याकडं मिष्किल पाह्यलं.
"ये आये आता ग बसतीस का तू... जवा बघावं तवा सुरू करतीस येकच रड. येक डाव सांगीतलं न्हवं.. मला न्हाय जायचं कुटंबी गाव सोडून ते"
"व्हय.. बस हीतंच माझ्या राशीला मांडून.... "
"अगं सोड की कोंडावयनी... तुलातर हीतं कुणाचा आधार हाय गावात. आन तुझा पोरगा हीरा हाय... बघ नांव काढील तुझं! " खल निकालात काढत नानानं कोंडाक्काचं वाक्य मधीच तोडलं आन हातातली कातरलेली सुपारी आज्जात तोंडात टाकली.
मग थोडा वेळ सगळीच गप्प झाली. कोंडाक्कानं धोंड्याचं बासन उचलून खरकटं पाणी जंबेलच्या पुढ्यात वतलं, तशी जंबेल शेपूट हलवत जमीन हुंगायला लागली. धोंड्यानं भाकरीच्या दुरडीतनं येक भाकर उचलली आणि मुडपून जंबेलच्या म्होरं ठेवली. मग तीच्या डोक्याला कुरवाळायला लागला. ते पाहून रोजच्यावाणी कोंडाक्का कडाडली नाही पण तीची नापसंती कंदीलाच्या उजेडात स्पष्ट दीसत होती चेहर्यावर!
"तुझ्या जंबेलच्या शीकारीचं लय किस्सं ऐकून हाय रं धोंड्या... पार मुंबैपर्यंत चर्चा हाय बघ तिची. "
चालला प्रकार कवतिकाने न्याहळत नानाने आपल्या कामाच्या विषयाला हात घातला. आन त्यांच्या अपेक्शेप्रमाणे जंबेलचा विषय काढताच धोंड्याचा चेहरा खुलला.
"मग अशात काय घावली का न्हाय शीकार? "
"व्हय कायतरी असतंय की अधनं मधनं.... मातूर पैल्यावानी काय रोज घावत न्हाय गा आजकाल. "
"ससं हायीत का रं पठाराला आता? "
"लै कमी आल्यात... कवातरी एखादा चुकार मिळतूय. "
"हम्म्म्म.... आन घोरपड? "
"ती रोज कुठली आल्या घावायला. तीला हेरायला पायजेल.. दगडाचं खळंबिळं बघून. त्येवढा येळ कुनाला मिळतूय तवा. "
"लेका धोंडू.. बघ की जरा कुठं घावत्या का ते... म्हातारीच्या पाठीच्या दुखण्यासाठी पायजेल रं. "
धोंड्यावरनं गूळ लावून धोंडूवर चढवणारी लोकं काय नवी नव्हती धोंड्यासाठी. भगवान नानाच्या येण्याचं नेमकं काराण असंच कायतरी असावं हे धोंड्याला माहीतच होतं. अन् कोंडाक्कालाबी!
फरक एव्हढाच होता की धोंड्या आतनं कुठंशीतर सुखावला जायचा आपण लोकांना उपेगी पडतो या जाणीवेनं. तर कोंडाक्का कष्टी होऊन जायची आपल्या लेकाचा लोकं कामापुरता वापर करत्यात ते बघून. धोंड्याकडून काय काम नाय करून घील त्यो आळशी असं गणित झालं होतं, गावाचं.
"बघायला पायजेल गा नाना... "
"आरं पैसं देतू की मी तुला... फुकाट नगंस करू बाबा.... शंबर रुपय दीन बघ घोरपड दीलीस तर... "
"आवं नाना पैश्याचा कशाला ईषय... " धोंड्या वशाळून अडखळला.
"नाना आशी पैसं घेउन कामं केली असती तर आमी आतापतूर बंगलाच बांधला असता की वो गावात. " न राहवून कोंडाक्का मध्ये बोललीच.
"आर्र.. असं कस्सं बोलता तुमी. जेला तेला आपापल्या कामाचा मोबदला मिळालाच पायजेल की. फुकाट का म्हुन करायचं म्हनं कुठलंबी काम! " भगवान नानांच्या आतला हिशोबी मुंबैकर बोलला.
"धोंड्याला एव्हढा हीशेब कळत असता तर कशाला म्या नरडं फाडून घेतलं असतं वो! " तरी या येळंला कोंडाक्काचा आवाज बराच नरम आला होता.
"धोंड्याऽऽऽऽ.... हाय का घरात? " अंधारातनं हाळी आली.
जंबेल जवळच असल्यानं धोंड्यानं तीच्या मानेच्या पट्टयात बोट अडकवून तीला धरलं. तरीबी तीनं बारीक गुरगुर केलीच.
"धोंड्याऽऽऽ आरं कुत्रीला सांभाळ रं बाबा" जगन्या चाचपडत पाय टाकत उजेडात आला. त्याच्या पोतराजावानी वाढवलेल्या झिंज्या बघून जंबेल अजूनबी हिसकं देतच होती. जगन्यानं भगवान नानास्नी बघीतल्यावर त्यांना रामराम घातला. आन कोंडाक्काच्या आट्या पडलेल्या कपाळाकडं बघून कसानुसा हसला.
"एवढ्या अंधारचं आता त्वा काय काम काढलंयस रं जगन्या? " जवळजवळ डाफरतच कोंडाक्काने इचारले.
"धोंड्याला पाटलांनी बोलीवलंय... चावडीवर. "
"मला? "
"व्हय मिटींग चालू हाय चावडीवर... पाटील म्हनले धोंड्याला ताबडतोब घीवून ये. "
"आता गावच्या मिटींगीत धोंड्याला कशापाय आवताण म्हणं... धोंड्या पंच झाला का काय!... काय काम हाये ती सवनी सांग की. " अंदाज आलेला असूनबी कोंडाक्का खोदून इचारतच होती.
"ती मला नाय ठावं... कशापाय बोलीवलंय ती... त्यो येत नाय असं सांगू का पाटलास्नी? " जगन्या आता पुरता झिटालला. तसंबी त्याला झिटलायला जास्ती वेळ लागायचा नाय.
खाकरत भगवान नाना उठले आणि त्यांनी जगन्याच्या पाठीवर एक हलकेच थाप टाकली. २५ वर्षे हमाली केलेला हात होता नानाचा! त्या हलक्या थापेनं बी कीरकोळ अंगकाठीचा जगन्या पार बुडक्यातनं हालला..... आन उगाचच गुडघ्यातनं जीव गेल्यावानी वाटलं त्येला..
"जगन्या तू हो पुढं... धोंडू आन मी येतू मागनं सायकलीवर. मी बी गावाकडंच चाल्लोय आता. वयनी, मी हाये वो बरुबर... बघतो जाउन काय म्हंत्यात मंडळी त्ये! "
धोंड्यानं काय न बोलता खुट्टीला अडकिवलेला सदरा अंगात चढीवला, भगवा बागाईतदार रुमाल खांद्यावर टाकून नानांच्या मागे निघाला. जंबेल त्याच्या मागे येत होती तीला त्याने पाठीमागे पीटाळलं. तीघंबी मग समोरच्या अंधारात गायब झाले. जंबेलनं एक डाव कोंडाक्काकडे पाह्यलं आणि मग शेपूट दोन तांगड्यात घालून तिच्या जाग्यावर जाउन बसली.
कोंडाक्काला आता घर खायला उठलं. दुरडीत राहीलेल्या दोन भाकरी ताटात घेउन तीनं त्यावर थोडं दूध घालून काला केला. पण त्यो काय तीच्या घशाच्या खाली उतरीना. दोन घास कसंबसं पाण्यासोबत गिळून शेवटी त्यो दूधकाला तीनं जंबेलसमोर ठेवला.
*********
क्रमश: