ओळख - २

तो महिन्याभरात भारतात सुटीवर आला. त्याच्या चारदोन भेटींत नीलिमाला तो
ठीकठीक वाटला.
पण 'अंतरीची खूण' अशी काही पटल्यासारखी वाटली नाही. "चाळिशीच्या भोज्जाला शिवलीयस तू.
स्वतःला वठवून घेतलंयस. ही 'अंतरीची खूण' वगैरे भानगडी करण्याच्या वयात तू टोपॉलॉजीमध्ये
डोकं खुपसून बसली होतीस. आता थोडं शिंगं मोडून वासरांत शिरायला शीक" असे तिने
स्वतःच्या प्रतिबिंबाला आरशात बजावले. तिचे मूळचे पिंगट केस कुठेकुठे पांढरे होऊ लागले
होते हे तिला निरखून पाहताना लक्षात आले.

'हो' असे ठरवल्यानंतर नीलिमाने त्याला
नीटपणे भेटायचा, त्याच्याशी स्पष्टपणे बोलायचा प्रयत्न सुरू केला. पण त्यात अनेक
अडचणी होत्या. एक म्हणजे अमेरिकेतून इथे सुटीला येणार्‍या टिपीकल भारतीयासारखा
त्याचा दौरा ठरलेला होता. त्याचे मूळ गाव कुठे कारवारजवळ होतं तिकडे
म्हणे त्याला कसल्याशा उत्सवाला जायचं होतं. मग मुंबई-पुण्यातले नातेवाईक,
मित्रमंडळी. दुसरे म्हणजे तो पुण्यात असतानाही नीता सारखी 'निनाददादा, निनाददादा' करीत
त्याच्या मागे असायची. आणि त्यातूनही वेळ मिळालाच तर स्वतः निनादच सटकायला उत्सुक
असायचा. लग्नासाठी तो तीन महिन्यांनंतर आठवडाभर सुटी घेऊन येणार आहे एवढेच काय ते
ठरले. लग्न रजिस्टर करायचे याबद्दल ती ठाम होती. त्यामुळे ती नोटिस देण्यासाठी
तेवढा तो रजिस्ट्रारच्या ऑफिसात आला होता.

तो तिकडे परतल्यावर फोनवर आणि ईमेलवर त्याच्याशी संवादाचे प्रयत्न तिने केले, पण
काहीतरी अपूर्ण होते. त्याचे व्यक्तिमत्व
तिच्या चिमटीत येत नव्हते. I just need a chance, a chance to turn over a new page
असे एकदा तो फोनवर बोलताना बोलून गेला आणि तिने त्याबद्दल खोदायला सुरुवात केल्यावर
त्याने उडवाउडवी केली. त्याला आईवडील नव्हते. एकच भाऊ, शिरीष, तो गेली वीस वर्षे
दुबईत होता. बाकीचे नातेवाईक तिला वाटले होते तेवढे जवळचे नव्हते. ती त्याच्या
काकांना भेटायला सकाळनगरमधला त्यांचा पत्ता शोधत गेली तेव्हा त्या गृहस्थांनी
"म्हणजे मी सख्खा काका नव्हे त्याचा, त्याचे वडील माझे आतेचुलत भाऊ. आणि आमचा
फारसा संबंध नव्हताच कधी" अशीच सुरुवात केली. वाशीच्या मामांनीही असाच
मंत्र जपला.

शेवटी 'एवढं ठरलं आहे तर नाही कसं म्हणायचं?' या आणि अशा विचारांनी ती लग्नाला
उभी राहिली. लग्न म्हणजे एक रोखठोक व्यवहार असे तिचे पहिल्यापासून मत होते आणि
पपांनी
त्याला खतपाणीच घातले होते. त्यामुळे रजिस्ट्रारसमोर सह्या करताना तिला मोहरून
वगैरे जायला झाले नाही.

लग्नानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था दोन रात्रींसाठी प्राईड एक्झिक्यूटिव्हमध्ये केली
होती. हनीमूनला जायला वेळ नव्हता
म्हणून. तसे घरीही राहता आले असते. रजिस्टरच लग्न असल्याने फारसे कुणाला बोलवलेही
नव्हते. 'रिसेप्शन' नावाचा भोंगळ तमाशा करायचा नाही हे तिने स्वच्छ सांगितले होते
आणि ते त्याने मानले होते.

पहिली रात्र कधीच विसरणार नाही अशी गेली.

हॉटेलमध्ये पोचल्यावर खोलीत जाऊन दोघांनी अंघोळ केली आणि टीव्ही बघत बसले. मग
त्याने तिला 'तो' अनुभव दिला. तो अनुभव खरोखरच कसा होता याचा विचार ती करेपर्यंत तो
संपलासुद्धा. पण तिच्या नवखेपणाला त्याचा सराईतपणा जाणवला. तिच्या मनातल्या सूक्ष्म
अढीला अजून एक वेढा बसला. परत अंघोळ. "बरोबरच
अंघोळ करू" या त्याच्या प्रस्तावाला तिने ठाम नकार दिला.

मग जेवायला म्हणून ते खाली गेले तर निनादने बारच्या
दिशेने तिला वळवले."लेटस सेलेब्रेट स्वीटी" या त्याच्या आवाहनाला तिला पटकन
उत्तर सुचले नाही. आधी शारीरिक जवळिकीचा जो
प्रयत्न त्याने केला होता तसाच हा आता 'स्वीटी' म्हणून वैयक्तिक पातळीवर जवळिकीचा
प्रयत्न अशी तिच्या मनाने नोंद घेतली.

त्याने शॅम्पेन मागवली.
त्याच्याआधी तिला पपांनी एकदोन वेळेस शॅम्पेन,
व्हिस्की, बियर यांची चव चाखवली होती. पण तिला कुठलीच चव भावली नव्हती. त्यामुळे
बहुतेक शॅम्पेन त्यानेच संपवली.
एप्रिलचा महिना होता आणि बाहेर तपमान चाळिशीला टेकत होते,
पण इथे आत एकदम गारेगार होते. तरीही त्याने 'ब्लडी हॉट' चा जप करत किंगफिशर
स्ट्राँग बियर मागवली आणि ढोसायला सुरुवात केली. प्रत्येक बाटली उघडताना तो आता आपण
काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहोत असा आव आणून "माझं स्वतःचं म्हणशील तर आय डोंट रिअली केअर फॉर सर्टन काईंड ऑफ पीपल" अशी काहीतरी सुरुवात करायचा, आणि मग तो
कसा 'सेल्फ मेड' आहे, कसा श्रद्धाळू आहे (द वर्ल्ड डजंट रन ऑन रॅशनॅलिटी अलोन यू नो, अँड धिस एज ऍन आय आय टी एंजिनियर टॉकिंग) अशा विषयांच्या
जंजाळात तिला गुरफटवायचा. बियरच्या बाटल्या संपत गेल्या तसा त्याच्या बोलण्यातला
असंबद्धपणा वाढत गेला. शेवटी सहा बाटल्या संपल्यावर "shweetie hashn't eaten?
shorry shweetie..." असे म्हणत त्याने मेनूकार्ड
मागवले. त्यातले 'Chicken calabrase हे इथले खास आहे' असे पुण्यात जन्म गेलेल्या
तिला बजावून त्याची आणि स्वतःसाठी सातव्या बाटलीची ऑर्डर दिली.

तिची डिश लौकरच आली. त्याची
बाटली संपत होती. तिचे खाऊन झाल्याझाल्या Letsh go....
Don't worrry abbout my dinner, I'm on liquid diet असे बरळत तो उठला. आणि धाडकन
खाली कोसळला. तिला अगतिकतेने आयुष्यात पहिल्यांदाच रडू फुटायला आले. पण कसे कोण
जाणे, तिने स्वतःला सावरले. अशा प्रसंगांची सवय असलेले वेटर्स मदतीला आले आणि
त्याचे मोटकुळे त्यांनी
खोलीपर्यंत पोचवले.

त्याच्या सगळ्या अंगाला आंबूस वास येत होता. तिला ढवळून आले. शेवटी तिने
सोफ्यावर बसकण मारली. हळूहळू ती कलंडली. तिला तिथेच कधी झोप लागली हे कळले
नाही.

सकाळी जाग आली तेव्हा निनाद हळुवारपणे तिच्या चेहर्‍यावरून हात फिरवत होता. तिला
जाग आल्याचे जाणवताच त्याने बोलायला सुरुवात केली. "खरंच चुकलं माझं राणी.
काल समहाऊ, बियर जरा जास्तच झाली. आणि इंडियन बियरमध्ये ना, आय गेस, सल्फाईडस मिसळतात. अदरवाईज असं रेअरली होतं मला. But I screwed up your memorable event.
How can I tell you how sorry I am?" त्याच्या नाकपुड्या थरथरू लागल्या.

नीलिमाला जशी स्वतः रडायची
कधी वेळ आली नव्हती, तशीच इतर कुणी रडताना पाहण्याचीही वेळ आली नव्हती. ती परत
गोंधळून गेली. काय करावे हे न उमजल्याने तिने त्याच्या केसांवरून हात फिरवण्याचा
प्रयत्न केला. त्याचे फुटणारे रडू आश्चर्यकारकरीत्या थांबले. तिच्या हातावर त्याने
स्वतःचा हात ठेवला आणि डोळे मिटून "तू सर्टन आहेस ना, दॅटस इनफ" असे म्हणून
तो उठला.

पण तिचे मन विटले ते विटलेच. सकाळचे
खाणे झाल्यावर तिने चेक-आऊट करण्याचा हट्ट धरला आणि तडीस नेला. बिल देताना त्याची
क्रेडिट कार्डस सापडेनात याचे तिला
आश्चर्य वाटले. अखेर तिने स्वतःच्याच कार्डावर बिल अदा केले. त्याचा आदल्या
रात्रीचा मद्योत्सव केवढ्याला पडला
हे समजल्यावर तिचे डोळे पांढरे व्हायला आले. तेवढ्या रकमेत तिने तीन महिने तुळशीबाग
धुंडाळली असती.

घरी पोचल्यावर मात्र त्याने अगदी शहाण्यासारखे वागायला घेतले. अचानक परत
येण्याचे कारण सांगताना पुढे होऊन "हॉटेल ते हॉटेल, तिथे no way you can feel at
home. इथे कसं, नीतू आहे, अम्मा आहेत,
somebody that you know is yours, you know" असा टाळ्याखाऊ संवाद त्याने
यथास्थित रंगवला. अम्मा नव्हती,
पण नीता डोळ्यांत जीव आणून सगळं ऐकत होती. 'दादा कित्ती ग्रेट' हा त्यातला भाव
नीलिमाला
व्यवस्थित वाचता आला.

घरी चार दिवस राहून मग त्याची परत जायचीच वेळ झाली.

जरी तिला तीन खोल्यांचे एक स्वतंत्र युनिट होते तरी नीलिमाने त्याच्या शारीरिक
जवळिकीचा प्रयत्न ठामपणे नाकारला. 'आपण काय केले आहे? काय करून बसलो आहोत?' या
प्रश्नांची उत्तरे शोधताना तिला गरगरायला लागले.

त्याला सोडायला मुंबईला जायचे तिने टाळले. तिच्या ऑफिसात कसे तिने तातडीने जाणे
गरजेचे आहे हे तिने निरुत्साही स्वरात सांगितले. निनादने आणि त्याच्या
नीतूने
ते मानून घेतले.

तो तिकडे गेल्यावर घडलेल्या घटनांवर तिचा विचार चालू राहिला. 'आपण गरजेपेक्षा
जरा जास्तच कठोरपणे वागलो का?' हा प्रश्न तिच्या डोक्यात भुंग्यासारखा गुणगुणू
लागला. अस्वस्थपणे ती दिवस ढकलत राहिली. शेवटी तिकडे एकदा तीन महिन्यांकरता जाऊन
यावे आणि मग बघावे असा तिने विचार पक्का केला. टोरोंटो आणि न्यूयॉर्क
इथल्या दोन कॉन्फरन्सेसना तिने येत
असल्याचे कळवून टाकले.

तिकडे गेल्यावर तिला काही गोष्टी नव्याने कळल्या. त्याचे पिणे चालू होतेच, पण
खूपच प्रमाणात वाटत होते. शारीरिक जवळीकही
अगदी नकोशी वाटत नव्हती.

तिला जरा अस्वस्थ वाटू लागले ते त्याच्या व्यवसायाबद्दल. कमॉडिटी मार्केटमध्ये तो
काहीतरी करीत होता म्हणे. पण तो नक्की काय करतो हे तिला उमगले नाही. त्याचा लुई
नावाचा एक पार्टनर होता. दोघेही आपापल्या घरातूनच काम करायचे. सकाळ झाली की ऑनलाईन
यायचे आणि कसल्या कसल्या चर्चा करत रहायचे. आउटसोर्सिंग
या विषयाबद्दलही एकदा ते काहीतरी बोलत होते. तिने त्यात लक्ष घालायचा प्रयत्न
केल्यावर त्याने तुसडेपणाने तिला झटकून टाकले.

'मुलं हवीत का?' याविषयी काहीतरी बोलावे असा तिने प्रयत्न केला तेव्हा "बघू
नंतर. तू इथे कायमची येशील तेव्हा" असे उत्तर मिळाले. याही विषयावर कधी सविस्तर
बोलणे झाले नव्हते. तिला दोन वर्षे सॅबॅटिकल घेता
आली असती. आणि तेवढ्यात इथे कुठे पीडीएफ किंवा फॅकल्टी पोस्ट मिळते का याची चाचपणी
करता आली असती. तिने हे सांगितल्यावर "मग तसंच कर" एवढेच बोलणे झाले.

पहिल्या दोन आठवड्यांनंतर तीही तिच्या कॉन्फरन्सेसच्या
तयारीला लागली. उरलेले दिवस कसे गेले कळलेच नाही.

परतल्यानंतरही ती अनिश्चिततेच्या भोवर्‍यात सापडली होती. शेवटी तिने सॅबॅटिकलबद्दल
बोलणी सुरू केली, आणि नवीन आलेल्या डायरेक्टरने तिला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
तिला धक्काच बसला. तिने बराच प्रयत्न करून पाहिला, पण व्यर्थ. जायचं असलं तर सोडूनच
जावं लागेल असा तिला अल्टिमेटम मिळाला.

सहा महिन्यांनी निनाद परत एका आठवड्याकरता आला. "सोडूनच दे नोकरी. तिकडेच पाहू"
असे अधिकारवाणीने सांगूनच तो थांबला नाही, तर त्याच्यासमक्ष तिला राजीनामा
द्यायलाही त्याने भाग पाडले. "नोटीस पिरियड संपल्यासंपल्या तिकडे ये"
असे बजावून तो गेला.

काय चालले आहे हे न कळताच ती वार्‍यावरच्या पानासारखी तिकडे भिरभिरत गेली.