ओळख - ४

दीप्ती तिच्या भावाकडे अंधेरीला गेली. नीलिमाने केके
ट्रॅव्हल्सच्या मिनिबसमध्ये सीट बुक केली.
पुण्याला येईपर्यंत बराच वेळ तिला गाढ झोप लागली.

घरी आल्यावर तिने आधी परकोलेटरमध्ये
मोठ्ठा
मग भरून कडक काळी कॉफी केली आणि तिच्या खोलीबाहेरच्या गच्चीत फुलणारी पहाट अनुभवत
ती बसली. घरात शांतता होती. सुमुख शिकायला UCLAला गेला
होता. केतनला नॉयडात चांगली
नोकरी मिळाल्याने तो आणि नीता तिकडे गेले होते. अम्मा अजून फिरून यायची
होती.

कॉफी संपवून सेकंड्स लावावी असा विचार
करत असतानाच तिला अम्मा फिरून येताना दिसली.
गोरीपान,
शेलाटी अम्मा. फार तर
नीलिमाची
थोरली बहीण वाटणारी अम्मा.

आज अम्माने घरी आल्यावर थेट
नीलिमाच्या खोलीत मोर्चा वळवला. काय झाले होते तिला कोण जाणे. नीलिमालाही काय झाले कुणास
ठाऊक, तिने थेट अम्माला मिठीच मारली.
अम्माने
तिला थोपटले आणि दोघीही गच्चीत कोवळे ऊन खात बसल्या.

अनावर शिंक दाटून यावी आणि विचार करायच्या आतच ती झणकावी तसे नीलिमाने एकदम
भरभरून अम्माला सगळं सांगितलं.
सगळं सगळं. अगदी सगळं. आयुष्यात पहिल्यांदाच.

आणि आयुष्यात पहिल्यांदाच ती अम्माच्या खुर्चीच्या
पायाशी बसली आणि तिने अम्माच्या मांडीवर डोकं
टेकलं.

"अम्मा, याआधी कधी असं
बोलावंसं वाटलं नव्हतं याचं वाईट वाटतंय खूप. सॉरी म्हणून नाही भागणार. काय करू
गं?"

"चूक संपूर्ण तुझी नाहीये गं पोरी. शेवटी माझीच मुलगी तू. आपला हेकटपणा
निभावायचा आणि त्यात स्वतःचा आतल्याआत कोंडमारा करून घ्यायचा हे वाण माझ्याकडूनच
घेतलंयस तू.

"तू मला आई किंवा मम्मी न म्हणता 'अम्मा' का
म्हणतेस? मला माहेरचे असे कुणीच नातेवाईक का नाहीत? 'सदामामा' अजिबात
म्हणजे अजिबातच माझ्यासारखा का दिसत नाही? या प्रश्नांची उत्तरं तुला कधी मिळाली
नाहीत. म्हणजे तू हे प्रश्न विचारले नाहीस हे खरं असलं तरी तुझ्या मनाच्या पाटीवर
उमटलेले ते प्रश्न वाचता येत होते मला.

"पण हेकटपणा निभावायचा हे बाळकडूच मिळालं होतं जणू मला. कुठून ते माहीत नाही.
त्यामुळे त्या प्रश्नांची स्वतःहून उत्तरे देण्याची एकीकडे इच्छा होत असूनही मी ती
निर्विकारपणे दडपत गेले.

"मी अनाथ आहे. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत वाढले. बुद्धिमत्ता बरी म्हणून
स्कॉलरशिप मिळवत शिकत
राहिले. फर्ग्युसनमधून बी एस्सी करत
असताना तुझे पपा भेटले. म्हणजे
त्यांचा फर्ग्युसनशी संबंध नव्हता काही. पण एका वादविवाद स्पर्धेत ते नि
मी समोरासमोर आलो. सामना चुरशीचा झाला. शेवटी एकूणपन्नास-एकावन्न करीत
परीक्षकांनी माझ्या बाजूने कौल दिला. तुझे पपा भारी मानी.
'आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा वाकायला लावणारी ही कोण?' या कुतूहलापोटी बहुधा,
ते मला भेटायला आले. आम्ही फर्ग्युसन टेकडीवर फिरायला गेलो. तेव्हा दोघांनाही जाणवू
लागले की काहीतरी वेगळे होते आहे. मला कधी कुठला 'मित्र' असा नव्हता, त्यामुळे मला
वेगळे वाटले तर ठीक होते. पण पपांना बर्‍याच मैत्रिणी
असूनदेखील त्यांना
माझ्याशी बोलताना काहीतरी अगम्य वाटायला लागले होते.

"आम्ही परत भेटलो. भेटत राहिलो. फिरायला जायला जागा भरपूर होत्या. तेव्हा
पुण्यात रस्ते जास्त नि माणसे कमी होती.

"लग्न करायचे आम्ही ठरवले. म्हणजे तुझ्या पपांनाच काय ते ठरवायचे
होते. माझ्या बाजूने मी तर एकटीच होते. संस्थेतला सदानंददादा
नेहमी माझी काळजी घ्यायचा, माझं दुखलंखुपलं पाहायचा. तो
माझ्या बाजूने उभा राहिला.

"तुझ्या पपांचे वडील आयसीएस. ते
तेव्हा पुण्याचे डिव्हिजनल कमिशनर होते.
लग्नात 'सगळं काही रीतिरिवाजानुसार झालं
पाहिजे' या त्यांच्या हट्टामुळे माझ्याहून केवळ पाच वर्षं मोठा सदानंददादा माझं कन्यादान
करायलाही उभा राहिला.

"पहिली जखम मला तेव्हा झाली.

"मी अनाथ होते हे माहीत होतं ना त्यांना? मग माझ्या 'कन्यादाना'साठी
माझ्यापेक्षा थोडाच मोठा दिसणार्‍या आणि माझ्याशी काहीही साम्य नसणार्‍या व्यक्तीला
चारचौघांत बसवून काय साधायचं होतं त्यांना? 'अनाथ' कन्येला पदरात घेणारे ते किती
थोर याचं सगळ्यांसमोर रुखवत मांडायचं होतं? आणि ज्याच्यावर भरंवसून मी ही उडी मारली
होती त्यानं काय केलं? मुकाट्याने बापाच्या म्हणण्यावर मान डोलावली.

"पहिली वळी तिथे पडली.

"स्वैपाकघरात तुझी आजी मला
'सारस्वत' पद्धतीच्या स्वैपाकाची दीक्षा द्यायला उभी राहिली. त्यात "आमच्यात
सांबार्‍याला नारळाचं पहिलं दूधच घालतात हं, दुसरं नव्हे.
तुमच्यात......" यातला "तुमच्यात" हा न चुकता जाणवेल एवढ्या पण हळू होत जाणार्‍या
आवाजात उमटे. माझ्या कुळशीलाचा
नसलेला पत्ता चरचरीतपणे माझ्यावर डागला जाई.

"तुझ्या पपांना याबद्दल काही
सांगायची सोय नव्हती. आमचं लग्न झालं आणि त्यांच्या नुकत्याच सुरू
केलेल्या व्यवसायाने एकदम झेप घेतली. "हिचा पायगुण" असे चारचौघांत सहा वेळा म्हटले
की त्यांचे कर्तव्य फिटे. आणि रात्री आमची गाठ पडे ती मंचकावरच.

"केतन
झाला. पहिला नातू झाला याबद्दल तुझ्या आजोबांना प्रकट आनंद झाला. "वंशाचा दिवा
उजळला हो पहिल्याच वेळेस. खात्री नव्हती, पण सुटलो" हे माझ्या कानावर जाईलसे
प्रत्येक परिचिताशी बोलून झाले. अजून एक वळी.

"मुलाने मला 'आई' म्हणून हाक मारावी असे मला वाटत होते. पण मी ते व्यक्त करताच
ब्रिटिशांच्या काळापासून 'टाईम्स'चे पारायण करणारे तुझे आजोबा खवळले. ते तुझ्या
पपांचे
डॅडी.
पुरुषांना पपा आणि डॅडी हे दोन
पर्याय आलटून पालटून वापरण्याची त्यांच्या पपांपासूनची रीत. पण आईला
'ममी'
हा एकच शब्द उपलब्ध होता.

"मीही जरा हट्टाला पेटले. 'आई' न म्हणता 'ममी' म्हणवून घ्यायला मी
नकार दिला. त्यापेक्षा मुसलमान 'अम्मा' परवडले
असा टोमणा मारला.

"तो तुझ्या आजोबांनी हट्टाने झेलला. आणि त्यांच्या पितृपरायण मुलाने मान
डोलावली.

"कानकोंडल्यासारखी मी एकदा
संस्थेत गेले आणि सदानंददादासमोर
मन मोकळे केले. माझ्यापेक्षा पाचच वर्षांनी मोठा असलेल्या दादाने जगाचे पंचवीसपट
फटके झेलले होते. मी जास्ती विचार न करता सरळ चाकोरीत अडकावे हे त्याने स्वच्छपणे
सांगितले.

"वळ्यांची वळकटीच होत गेली.

"नंतर लगेचच तू झालीस. एकापाठोपाठ एक अशी दोन बाळंतपणे मला जरा जडच गेली. त्यात
तुझ्या आजी-आजोबांचे 'सहकार्य' आणि पपांची 'आस्था'.
जीव नकोसा झाला. केतन रांगत कुठे गेला हे
बघण्यासाठी गेले तर तू भुकेने भोकाड पसरत असस. आणि हे
सर्व तुझे आजी आजोबा तटस्थपणे बघत बसत.

"तुझ्या पपांना या गोष्टींकडे लक्ष
द्यायला वेळ होता कुठे? एकदा मात्र ठिणगी पडली.

"त्या दिवशी तुम्ही दोघांनी दिवसभर माझा घाम काढला होता. त्याकडे निर्विकारपणे
दुर्लक्ष करून तुझी आजी पीवायसी महिला
शाखेच्या रमी क्लबमध्ये गेली होती आणि
आजोबा चार वाजताच कामावरून परतून बाहेर गार्डनमध्ये ईझीचेअरवर पाईप फुंकत
बसले होते. संध्याकाळी पपा आले आणि आपण सगळे बंड
गार्डनला गेलो. तिथल्या हिरवळीवर रांगून केतन दमला. आणि पपांनी तुला वर
फेकून झेलत दमवले. रात्री तुम्ही दोघेही पट्कन झोपलात. मलाही फारच
थकायला झाले होते. पण थोडे जागून मी तुझ्या आजी-आजोबांबद्दल माझी परखड मते तुझ्या
पपांना ऐकवली.
आणि झोप अनावर झाल्याने मी झोपले.

"अपरात्री केव्हातरी जाग आली ती तुझ्या पपांमुळे.
त्यांनी त्यांचा पतीहक्क वसूल करून घेतला.
किंकाळी मारावीशी वाटली, पण तुम्ही दोघे तीन फुटांवर निश्चिंत झोपले होतात.
कार्यभाग उरकल्यावर ते पाठ वळवून मोकळे झाले.

"स्वतःची किळस आली. जीव द्यावासा वाटला त्याक्षणी. पण धीर नाही झाला.

"सकाळ होईपर्यंत मला झोप लागली नाही. तशीच उठले. मग मात्र माझा निश्चय झाला.
सकाळच्या खाण्याच्या वेळी, नव्हे, "ब्रेकफस्ट"च्या
टेबलावर, मी मला घटस्फोट पाहिजे आहे हे जाहीर केले. आणि त्याचे कारणही. तुम्ही
दोघेही तिथे नव्हतात. आणि तुमचे आजी-आजोबा दोघेही होते. त्यामुळेही मला धीर
आला.

"तुझ्या आजीच्या नजरेत 'हे काय भलतंच' हा भाव मोठ्ठ्या अक्षरांत
लिहिलेला होता. पण तुझ्या आजोबांना माझ्या शब्दांतला विखार जाणवला. आपण मांजराला
कोपर्‍यात कोंडलेले आहे, आता ते आपल्या नरडीचा घोट
घ्यायला कमी करणार नाही ही भीतीही त्यांच्या मनात उमटली. मला घटस्फोट मिळाला असता
की नाही, आणि मिळाला असता तर कुठल्या अटींवर यापेक्षा 'रावबहादुर'
वागळ्यांचे घराणे अशा
रीतीने चर्चेत यावे हे त्यांना असहनीय होते.

"त्याबरोबरच त्या तिघांना जाणीव झाली ती ही, की मुले वाढवणे हे वाटते तितके सोपे
नव्हे. आणि पपांना तुमचा दोघांचाही
लळा लागत चालला होता हे दिसत होते. नाहीतर 'वागळ्यांच्या घरा' मुलांना फार
जवळ करणे हे त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नसे. सकाळी 'गुड मॉर्निंग', रात्री
'गुड
नाइट'
आणि दिवसाभरात 'प्लीज' आणि
'थँक्स'. झाले. यापेक्षा जास्त म्हणजे मुलांना काय ते सांगायचे आणि मुलांनी ते
ऐकायचे.

"तुझ्या सुभाषकाकांना हे मान्य
नव्हते. उमाकाकूचीही घालमेलच होत
असे. पण काकांचा तोंड उघडायचा धीर होईना. मग गोखले इन्स्टिट्यूटपेक्षा जे एन यू किती
चांगले आहे याचा एक लुटूपुटीचा वाद खेळून ते दिल्लीला चालते झाले. टेल्कोत मॅनेजर
असलेल्या आपल्या नवर्‍याच्या मागे भुणभूण लावून मीनाआत्याने
त्याची बदली जमशेदपूरला करून घेतली.
त्याला तर बढतीही मिळाली. पण तुझे आजीआजोबा गेल्यावर मात्र तिने नवर्‍याला परत बदली
करून घेण्याचा हट्ट धरला, आणि तो सहा महिन्यांनीही पुरा होईना म्हटल्यावर मुलांना
घेऊन ती सरळ इथे परत आली. नंतर वर्षभराने नवर्‍याला कशीबशी परत बदली मिळाली.

"पण याबद्दल स्पष्ट, तोंड उघडून, बोलायचे हे एक आक्रीतच होते. आणि मी ते
केले. मला स्वत:चाच इतका संताप आलेला
होता, की माझ्या वाटेत कुणीही आले असते तरी मी माझी शक्ती एकवटून त्याचा प्रतिकार
केला असता. आणि जिंकले असते.

"ही जाणीव झाल्यावर मग मात्र सगळे वागळे मेणाचे
झाले. मला काय हवे आहे याची त्या घरात आल्यावर पहिल्यांदाच, आणि हळुवार आवाजात
चौकशी झाली. मला नीटसे असे काही डोळ्यासमोर नव्हते. पण रात्रीतला किळसवाणा प्रकार
परत कधी घडू नये याची खात्री करणे बरे एवढे कळत होते.

"तुझ्या पपांनी माझ्याशी त्यापुढे
कधीही शरीरसंबंध ठेवायचे नाहीत ही माझी पहिली मागणी मी मांडली. सगळेच चमकले. पपांनी 'विचार
करायला वेळ पाहिजे' असा मुद्दा मांडला. मी वेळ दिला. दोन तास. आणि तुमचे आवरायला मी
परतले.

"दोन तासांनीही वागळे कुटुंब 'ब्रेकफस्ट
टेबल'वरच होते. मी परतले तेव्हा "होईल रे काहीतरी, आफ्टर ऑल, युअर्स इज लव्ह मॅरेज"
एवढे तुझी आजी घाईघाईत बोलली. पपांनी माझी अट मान्य
असल्याचे सांगितले. "अजून काही आहे, की एवढेच?" असे त्यांनी हुंदका दाटून आलेल्या
स्वरात विचारले. तो हुंदका हुकमी आणलेला होता हे मला जाणवत होते, त्यामुळे तिकडे
दुर्लक्ष करून मी वेगळे घर बांधणे ही दुसरी मागणी मांडली. आणि तिसरी म्हणजे दर
महिना पंधरा हजार रुपये मला विनाप्रश्न मिळावेत.
दुसर्‍या मागणीवरूनही खळबळ माजू पाहत होती, पण कधी नव्हे ते पपांनी चट्कन निर्णय घेतला आणि
उरलेल्या दोन्ही मागण्यांना होकार दिला.

"अशा रीतीने कांचन गल्लीतल्या वागळ्यांच्या
बंगल्यातून दोन वर्षांत आपण इथे आलो.

"पुढच्या सगळ्या आयुष्यात तुझ्या पपांनी त्यांचा
शब्द मुकाट्याने पाळला. त्या रात्रीची आठवणच इतकी किळसवाणी होती की तुझ्या पपांनी शब्द
पाळला नसता तर मी जीव देणे वा जीव घेणे या दोहोंपैकी कुठल्याही पातळीला गेले असते
याची त्यांना जाणीव झाली असावी बहुधा. बाकी त्यांच्याबरोबर रहायला मला
काहीच हरकत नव्हती. माझा लढा व्यक्तीविरुद्ध नसून प्रवृत्तीविरुद्ध होता. त्या
प्रवृत्तीला अस्तित्वात यायला जर काही कारणच नसले तर माझा व्यक्तीला काहीच आक्षेप
नव्हता.

"तुम्ही दोघे कळत्या वयाचे व्हायच्या आतच हृदयविकाराच्या झटक्याने तुझे आजोबा
आणि मुंबईला एका अपघातात आजी गेली. तुमच्या आठवणीत ते फारसे नसतील.

"का कुणास ठाऊक, मला पहिल्यापासूनच मुलांची अशी आवड नव्हती. आणि तुझ्या पपांच्या
स्वभावातली खुडली गेलेली पुरुषी मग्रुरी आता वात्सल्याच्या स्वरूपात दुप्पट वेगाने
उफाळली. तुमच्या संगोपनाची सगळीच जबाबदारी त्यांनी हट्टाने पेलली. घर नीटनेटके
ठेवणे, तुम्हा तिघांना आणि मला वेळच्यावेळी ताजे, सकस अन्न मिळेल हे पाहणे एवढेच
माझे काम उरले. तुमचे दुखले खुपले काढायलाही तुमचे पपाच इरेसरीने उभे राहत.

"माझा काही आक्षेप असायचे कारण नव्हते.

"तुम्ही जसजसे स्वावलंबी होत गेलात तसतसे मी स्त्री शिक्षण संस्थेच्या कामात मला
झोकून दिले. मला घडवण्यात त्या संस्थेइतका सहभाग कुणाचाच नव्हता.

"तुम्ही मोठे होत गेलात. आपापले निर्णय स्वतःच घेत गेलात. तुझ्या पपांनीही
त्याला प्रोत्साहन दिले. मला आनंदच होता.

"मागे वळून पाहताना पहिल्यापहिल्यांदा
खंत वाटत असे. असे कसे झाले म्हणून. पण मग नंतर लक्षात आले की काय, कसे, का, कधी,
कुठे आणि कुणाकडून व्हावे याचे गणित तसेही कुणालाच सुटलेले नाही. त्यामुळे
त्याबद्दल ऊर बडवण्यात अर्थ नाही.

"आजवर नदीच्या दोन काठांसारख्या वागलेल्या आपण अचानक एकत्र आलो. परत येऊच असे
नव्हे. पण येऊ शकतो ही जाणीवही किती प्रफुल्लित करते नाही?

"चल. कॉफी घेऊ. आणि सकाळच्या खाण्याचेही बघू. तुझे आवडते चीज मश्रूम ऑम्लेट करते.
तुझ्या पपांइतके जमेल की नाही
माहीत नाही, पण जे जमेल ते खपवून घेशील ना?" अम्माने तिच्या पाठीवर थाप
मारली.

घशात हुंदका आणि डोळ्यांत आसू असतानाच जर खुदकन हसू फुटले तर कसे वाटते याचा
अनुभव घेत ती उठली.

कितीजणांशी नव्याने ओळखी
झाल्या होत्या गेल्या काही काळात. फारशा न आठवणार्‍या आजीआजोबांशी, सदानंदमामाशी,
पप्पांशी, अम्माशी.

आणि स्वतःशीही.