ओळख - ३

तिकडचे सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले. "मूल हवं का?" या प्रश्नाला "सध्या तरी
नको" असे उत्तर मिळाले. "माझे आणि तुझे वय पाहता मग 'नाही' असंच ठरवून टाकायचं का?"
या तिच्या प्रश्नाला "पाहू" असं उत्तर मिळालं.

घरी बसून बसून तिला कंटाळा येऊ लागला. तिने इकडेतिकडे जाहिराती पाहणे सुरू केले.
तिला एकदोन ठिकाणी भेटायला बोलावल्यानंतर त्याच्या वागण्यातला फरक तिला जाणवू
लागला. शारीरिक संबंधांत तो जास्त
जास्त आक्रमक, हिंसक होऊ लागला. आणि "गरज काय आहे नोकरी करण्याची" हा संवाद वारंवार
म्हटला जाऊ लागला.

सुटीला म्हणून दोन वेळेस ते भारतात येऊन गेले. त्यातच एकदा दुबईला थांबले होते.
निनाद आणि शिरीष यांच्यात दोन भावांच्यात असतो तसा सोडाच, दोन मित्रांच्यात असतो
तेवढाही संवाद नाहीये हे तिला जाणवले.

घरबसल्या जाहिराती बघणे सुरूच होते. घरूनच ऑनलाईन
ट्यूटरिंगचा उद्योग तिने
महिना दोन महिने करून पाहिला, पण तो काही तिला फारसा झेपला वा रुचला नाही.

एकदा स्टोअरमध्ये गेल्यावर अचानक तिचे क्रेडिट कार्ड चालेनासे झाले. कार्ड
त्यानेच घेऊन दिले होते. तिने बावरून त्याला फोन लावला, तर "हो, सांगायचं विसरलो.
सध्या जरा प्रॉब्लेम आहे. तू परत ये घरी मग बोलू" असे कोरडे बोलून त्याने फोन
ठेवला. तिला शरमेने मेल्याहून मेल्यासारखे झाले. अंथरूण पाहून पाय पसरण्याची सवय
असल्याने असा प्रसंग तिच्यावर कधीच ओढवला नव्हता.

घरी गेल्यावर तिला डबघाईला आलेल्या आर्थिक स्थितीची अचानक जाणीव झाली, करून
देण्यात आली. "तुझा पाषाणचा फ्लॅट ठेवून काय
करायचंय? इथे जरा तरी उपयोग होईल त्या पैशांचा. आणि पुढेमागे परत घेऊन टाकू."
तात्पुरते म्हणून तिने तिचे भारतात गुंतवलेल्यातले दोन लाख रुपये तातडीने
मागवले.

तिथून सगळा उतारच सुरू झाला. तिला 'स्टारबक्स'मध्ये
तासावर काम करायची पाळी आली. लुई कुठे गायब झाला होता कोण जाणे. निनादचे पिणेही
भरमसाट वाढले. हिंसकपणा वाढला. तिच्या तोंडून सहसा आवाज फुटत नसे. पण एकदा असह्य
होऊन तिने मारलेल्या किंकाळ्या शेजारच्या साडेसहाफुटी अरनॉल्डला ऐकू
गेल्या आणि शहरी तुसडेपणाची भिंत ओलांडून तो दार ठोठावत घरात शिरला.
डोक्यातून समप्रमाणात आमटी आणि रक्त ठिबकत असलेल्या तिला पाहून त्याने निनादला
"Take it easy pal, or things are gonna get difficult" असा इशारा दिला.

त्या दिवशी तेवढ्यावरच थांबले, पण नंतर "तू त्या अरनॉल्डला भेटायला जातेस
आणि स्टारबक्समध्ये जाते असं
सांगतेस" हा नवीनच संवाद सुरू झाला.

उंटाच्या पाठीवर काड्या वाढत चालल्या.

अखेर शेवटची काडी पडली आणि बॅग घेऊन ती परत आली.

तीन महिन्यांनी निनाद आला, सगळ्यांसमोर रडूनभेकून त्याने माफी
मागितली. पण तिचे मन विटले होते. त्याच्या
आर्जवांना तिने काहीही प्रतिसाद दिला नाही. "परत येईन, अजून विचार कर, आताचा मी हा
तेव्हाचा तो मी उरलो नाहीये" हे आणि असे संवाद म्हणून तो परतला.

तिला स्वतःच्या करियरचा मोठा प्रश्न होता. एम आर एल मधली नोकरी सोडून दिली होती.
तिथे परत जायचे म्हटले तर तो डायरेक्टर जरी बदलून गेला होता तरीही तिच्यासाठी एकही
पोस्ट ओपन नव्हती. कधी होईल माहीत नव्हते. परत पीडीएफ करायची म्हणजे तिच्याहून
पंधरा वर्षं लहान असलेल्या मुलामुलींत काम करावे लागले असते. त्यालाही तिची तयारी
होती, पण आता डायरेक्टर झालेले कारेकर सर पुढे
काही करायला उत्सुक दिसत नव्हते. तरी बरं, तिला ते वीस वर्षांपासून ओळखत होते.

तिने भास्कराचार्य प्रतिष्ठानमधे
जाऊन बसायला सुरुवात केली. गणित या विषयावर बोलणे तरी चालू राहिले. पण का कोण जाणे,
तिला गणिताची नशा पूर्वीसारखी चढत नव्हती. 'आपण आपले जीवन असे उधळून का बसलो?' हा
प्रश्न मन पोखरीत राहिला. काहीतरी चाळा हवा म्हणून ती फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या
एका 'कॅट'च्या कोचिंग
क्लासेसमध्ये गणित शिकवायला जाऊ लागली. घटस्फोटाचा विचार मनात धूसरपणे तरळू
लागला.

वर्षभर असेच गेले. निनाद अजून दोनदा येऊन गेला. पण तिला तो जास्त जास्त अनोळखी
भासत गेला. एका भेटीत त्याने शरीरसंबंधांची इच्छा दर्शवल्यावर तिच्या मनात
चीड-संताप दाटण्यापेक्षा आश्चर्यच दाटले. 'आपला संबंध काय राजा?' असं तिनं मनातच
त्याला विचारलं आणि आपल्या खोलीत जाऊन दार लावून घेतलं.

आणि मग दोन आठवड्यांपूर्वी अरनॉल्डचा फोन
आला. आठवडाभर फ्लॅटमधून काहीच चाहूल नाही म्हणून त्याने पोलिसांना कळवले. त्यांनी
येऊन दरवाजा फोडला तेव्हा डिकंपोज व्हायला लागलेला
निनादचा
देह मिळाला.

मग ती आणि दीप्ती तिकडे जाऊन त्यांनी तिथले सगळे सोपस्कार पार पाडले, आणि आता ती
परतत होती.

 

'काय आहे?' आणि 'काय होईल?' हे प्रश्नच तिला उमजत नव्हते, त्यांची उत्तरं शोधणे
दूरच राहिले.

पपांच्या लाडाने,
गणिताच्या वेडाने तिचा एकलकोंडेपणा पहिल्यापासूनच जोपासला गेला होता. कुठल्याही
बाबतीत कुणाशीतरी बोलावे असे तिला फारसे कधी वाटलेच नाही. आणि वाटलेच, तरी बराच काळ
पपा होतेच. आणि
त्यांच्याशी बोलायला गेले तर बहुतेक वेळेस ते "नीलू, मला विचारू नकोस, आत
डोकाव नि स्वतःला विचार. तुला योग्य वाटेल ते करायची तुझ्यात ताकद आहे याची मला
खात्री आहे" असे म्हणत.

अम्माशी कधी खुलून असं
बोलणं झालंच नाही. अगदी स्त्रियांच्या विशेष विषयांबद्दलही. अम्माच्या माहेरचे असे
कुणी नातेवाईक नव्हते. एकदा तिला अम्मा कर्वे स्त्री शिक्षण
संस्थेत घेऊन गेली होती तेव्हा तिथल्या एकाची तिनं "हा तुझा सदामामा" अशी ओळख करून
दिली होती. पण फुगीर गालांच्या त्या काळ्यारोम म्हातार्‍या
माणसात आणि अम्मात काहीच साम्य तिला
दिसलं नाही. आणि तो 'सदामामा' जे हेल
काढून बोलत होता ते हेल तिला अम्माच्या बोलण्यात कधीच
जाणवले नाहीत. पण त्याबद्दल अम्माशी बोलावं असंही
तिला कधी वाटलं नाही. इतर मित्र-मैत्रिणींसारखी ती 'ममी' नाहीतर 'आई' न म्हणता
'अम्मा'
का म्हणते हेही तिला कधी कळलं नाही.

 

विमानात काहीतरी घोषणा झाल्याचे तिला हलकेसे जाणवले. बसल्यावर तिनं कायमस्वरूपी
पट्टा बांधून ठेवला होता त्यामुळे तिनं तिकडे फारसं लक्ष दिलं नाही. जरा जोरात
धक्का बसला आणि तिच्या देहाला कमी होत जाणारा सुसाट वेग जाणवला. मुंबई आलीच
तर शेवटी.