ओळख - १

सतरा तास एकाच जागी बसून नीलिमाचं
अंग पार अवघडून गेलं होतं. भंवतालचा कोलाहल
कानात घुसू नये म्हणून तिने आयपॉडचे ईअरप्लग्ज कानात
खुपसले होते, पण काय ऐकावं याचा निर्णय न घेता आल्यानं ते कापूसबोळ्यांची
भूमिका पार पाडायचा प्रयत्न करीत होते. तिने गाणी ऐकायचा यत्न करून
पाहिला होता, पण प्रत्येक गाण्याने वेगळेच सूर उमटू लागले. 'धुंद मधुमती रात रे' हे
गाणे तर पारच आणि फारच असह्य झाले म्हणून तिने आयपॉड बंद करून टाकला.

तिनं शेजारच्या खुर्चीत पाहिलं. दीप्ती मान मागे करून आणि डोळे मिटून बसली होती.
अख्खा प्रवासभर ती अशीच बसली होती. दीप्तीची सीट आयलच्या बाजूला असल्याने
रेस्टरूममध्ये
जाण्यासाठी पाचसहा वेळेस नीलिमाने आणि
खिडकीजवळच्या सीटवरील दांडग्यादुंडग्या ऑस्ट्रेलियन
बाईने तिला उठवले होते. पण तेवढ्यापुरती जाग दाखवून उरलेल्या वेळेत तिने डोळे
म्हणून उघडले नव्हते.

अर्थात तिने जाग दाखवली असती, तर तिच्याशी काय बोलायचे हा नीलिमाला प्रश्नच पडला
असता. चव्वेचाळीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात तिची जाऊ असलेल्या दीप्तीला ती
अख्ख्या दोन वेळेस भेटली होती. नीलिमाच्या स्वतःच्या लग्नात एक तास, आणि निनादबरोबर एकदा भारतात
परतत असताना त्यांनी दुबईला स्टॉपओव्हर घेऊन
दीप्ती-शिरीषकडे मुक्काम केला
होता तेव्हा एक दिवस. त्यामुळे हे 'मौनं सर्वार्थसाधनम्' तिलाही
पसंत होते.

विचार करकरून आपल्या मनाचा पार भुगा झालाय असे ती गेले काही दिवस स्वतःशीच घोकत
होती. पण तरीही विचार करण्याची खोड काही जात नव्हती. 'काय होते' याबद्दलचे कडूगोड विचार,
'काय आहे' याबद्दलचे करडेकाळे विचार,
आणि 'काय होईल' याबद्दलचे विमानातून दिसणार्‍या ढगांसारखे चित्रविचित्र विचार,
यांच्या तिठ्यावर तिला चकवा लागे.

आणि मग काही खरे नसे.

बॉस्टनला मॉर्गमधे निनादचा देह ताब्यात
घेताना ती अशीच भिरंगटली होती.
जवळजवळ वीस मिनिटं तिथली ती सिग्रिड
नावाची निळ्या डोळ्यांची इवलुशी ब्लाँड तिला
"Are ya alright?" असे स्वरात काकळूत आणून विचारत होती (असे दीप्तीने नंतर सांगितले
होते).

 

'काय होते?' प्रश्न चांगलाच गंभीर होता.

नीलिमा वागळे. चौबाजूंनी
सुरक्षित केले गेलेले नेटके बालपण. मग कॉलेजात जाताना 'पाहिजे ती शाखा निवड' ही
घरून मिळालेली
मुभा. वडील COEP चे सिव्हिल एंजिनियर, पण पेशाने
आर्किटेक्ट. बारावीनंतर तिने BSc ला घेतलेला प्रवेश. त्यात पद्मजाच्या सोबतीने
लागलेली Maths ची चटक. बघता बघता पार पडलेलं BSc (Maths). पुढे अगदी नैसर्गिक
अपरिहार्यपणे MSc ला घेतलेला प्रवेश. त्या मधल्या सुटीत पद्मजानं मात्र लग्न करून
त्रिवेंद्रमला प्रयाण
केलं.

"एवढ्या घाईने कशाला केलंस लग्न?" असं नीलिमानं
विचारल्यावर "करावंच लागलं गं, वेळ निघून चालली होती ना!" असं पद्मजा गालात आवळा
ठेवल्यासारखं हसत म्हणाली, त्यावेळी नीलिमाला  चांगलाच धक्का
बसला होता. 'विवाहपूर्व संबंध' हा शब्दप्रयोग तिने त्याआधी वाचला ऐकला होता, पण
निर्विकार अलिप्तपणे. 'तसं' करणारी माणसं आपल्याला कधी कुठे भेटतील हे तिच्या कल्पनेतदेखील
कधी आले नव्हते. इथे तर तिच्याबरोबर Mathsच्या अथांग सागरात डुबक्या मारणारी
पद्मजा? लेबनित्झ थिअरम हा कसा
एखाद्या कवितेच्या किंवा निसर्गचित्राच्या तोंडात मारतो असे नीलिमाच्या सुरात सूर
मिसळून म्हणताना ती दुसरीही सुरावट छेडीत होती? How could she? गणित हे आपल्या
जीवनाचे अंतिम ध्येय आहे अशी नीलिमाची खात्री
पटत होती तेव्हा पद्मजा तिच्याकडे पाठ फिरवून चालायलाही लागली होती? नीलिमाला काहीच
कळेना.

MSc होईस्तोवर आडून आडून
लग्नाची बोलणी घरी सुरू झाली होती. सुभाषकाका तर दर
वेळी दिल्लीहून कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यावर हा विषय उकरीतच. मीनाआत्याही मग
त्यांना साथ देई. दरवेळेस तिच्या बाजूने उभी राहणारी व्यक्ती म्हणजे तिचे पपा. "लग्न
म्हणजे पोरखेळ नव्हे नीलू, नीट विचार
झाल्याशिवाय पाऊल नको घालूस पुढे". मग न चुकता आपले निळसर डोळे तिच्या अम्माकडे वळवून
ते पुढचा संवाद म्हणत. "तुझ्या अम्माचंच बघ ना. नीट विचार
न करता उडी मारलीन, आणि माझ्यासारख्या
माणसाबरोबर संसार करत राहणं नशिबी आलं!" चाफेकळीसारखी गोरीपान अम्मा मग "हूं!" अशी
फणकार्‍याने मान वळवून तिथून निघून जाई.

MSc संपल्यावर ती PhD करायला गेली त्याच्यामागे गणिताची नशा हे कारण होतेच, पण
सगळ्यांपासून दूर राहून जरा मनाला शांतता मिळेल हेही होते. त्यामुळे पुण्यातच आणि
मुंबईत संधी असूनही तिने मद्रासची मॅटसायन्स
(इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्स) ही
संस्था निवडली. वीस वर्षांपूर्वी अड्यार खूपच
शांत होते. PhD संपेपर्यंत तिच्या मागे लागलेली लग्नाची भुणभूण बरीचशी थांबली होती.
मग दोनचार ठिकाणी पीडीएफ (पोस्ट-डॉक्टरल फेलो) म्हणून
काम करून ती पुण्याला नवीनच निघालेल्या एम आर एल (मॅथमॅटिकल
रिसर्च लॅबोरेटरी) मध्ये लेक्चरर
म्हणून हजर झाली. खरे तर तिला पीडीएफच मिळायची इथेही, पण त्रिएस्तेच्या
आयसीटीपी
(इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ थिऑरेटिकल
फिजिक्स)
मध्ये सलग तीन वर्षे तिने वाचलेले पेपर्स तिच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे
पस्तिशी ओलांडायच्या आधीच तिला फॅकल्टी पोस्ट मिळाली.

तोवर 'लग्न करावं की नाही?' याबद्दल तिनं तोवर गंभीरपणे असा विचार केलाच
नव्हता. गणिताची नशाच उपलब्ध वेळेचा फडशा पाडायला पुरत होती. नाही म्हणायला मॅटसायन्समध्ये
तिला प्रशांत भेटला होता तेव्हा थोडी मनात चलबिचल झाली होती, नाही असं नाही. पण
लौकरच तिच्या मनात प्रशांतच्या धरसोडीच्या वृत्तीबद्दलच्या अविश्वासाने मूळ धरले.
आणि ते झाड मग चांगलेच फोफावले.

चाईल्ड प्रॉडिजी म्हणून वाखाणला
गेलेला प्रशांत शिकायला थेट शांतीनिकेतनला पोचला. पण
तिथे तो नक्षलवाद्यांच्या कळपात सापडला. बारावीपर्यंत शास्त्र शिकलेला हा मुलगा
तिथे मानववंशशास्त्र शिकायला गेला होता. तिथे घालवलेल्या तीन वर्षांपैकी 'बोलपूर बार्ता' या
त्यांच्या गटाच्या वृत्तपत्राचा सहसंपादक म्हणून
एक वर्ष, आणि तुरुंगात एक वर्ष असे त्याने धुंदीत घालवले. मग धुंदी उतरल्यावर
मुकाट्याने नागपूरला घरी येऊन त्याने
गणितातली पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. पण त्या तीन वर्षांत त्याच्या मनाच्या
मातीची जी मूर्ती झाली होती ती बरीचशी तशीच होती.

टोकाचा सिनिसिझम, हटकून
सर्वांपासून सदैव काहीतरी वेगळं करण्याची वृत्ती, त्याच्याबरोबर मतभेद
झालेल्या व्यक्तीला कायम मतिमंदासारखी दिलेली वागणूक, हे सर्व नीलिमाला खटकू
लागले. तेवढ्यात मॅटसायन्समध्ये
कॅन्टिनमधल्या
कंत्राटदाराने बारा वर्षांचा एक मुलगा कामावर ठेवल्याचे निमित्त झाले नि प्रशांतने बालमजूरीविरुद्ध थेट उपोषण
सुरू केले. कंत्राटदाराचे म्हणणे असे, की त्या मुलाचा बाप दारुड्या असल्याने काम
करायच्या लायकीचा नव्हता. आणि ते कुटुंब त्याच्या गावाचे असल्याने त्यांना मदत
करणे कंत्राटदाराचे कर्तव्य होते. मुलाला आई नव्हती आणि तो मुलगा पाच भावंडांत
सगळ्यात मोठा होता. पण प्रशांत ऐकायला तयार नव्हता. त्या कंत्राटदाराचा ठेका रद्द
करावा असा त्याने हेका धरला. डायरेक्टर चोप्रासर त्याला
बधले नाहीत. अखेर अलाहाबादच्या आर आर आय (रामन रिसर्च
इन्स्टिट्यूट) मध्ये एक पीडीएफ रिकामी आहे असे कळताच प्रशांत तुमपल्लीवार उपोषण
सोडून तिकडे चालते झाले. नीलिमाचा प्रश्न फार मोठा
होण्याआधीच सुटला.

पण ते सोडता तिला अजून कुणी साथीदार, जोडीदार अशा शब्दांना आवाहन करणारे भेटले
नव्हते. आणि प्रशांतच्या बाबतीत म्हणायचे झाले तर त्याचे सगळ्यांपासून वेगळे असणे
हे आणि एवढेच बहुधा तिला भावले होते. 'बालपण अतिसंरक्षित असल्याचा
परिणाम' असे तिने नंतर विश्लेषण केले होते.

एम आर एल मधली नोकरी तशी सुखावह होती. तिला तिच्या नंबर थिअरीबद्दल बोलायला
माणसे होती, गरज पडेल तेव्हा देशा-परदेशातल्या कॉन्फरन्सेसना जाण्याची
मोकळीक होती, वर्षाकाठी किमान एखादा पेपर आंतरराष्ट्रीय संशोधन मासिकांत छापला जात
होता.

गुंतवणूक म्हणून तिने पाषाणला एक
फ्लॅटही घेऊन ठेवला होता.

तिचा भाऊ केतन २००१ च्या मंदीमध्ये
अमेरिकेहून परत आला. पपा हृदयविकाराच्या
धक्क्याने नुकतेच गेले होते.

केतन
तिचा मोठा भाऊ. तो नीता आणि सुमुख बरोबर
परतला तेव्हा तिला अनेक प्रश्न पडले. अमेरिकेत जन्मलेल्या मुलाचे नाव 'सुमुख'
ठेवण्यापासूनचे ते प्रश्न होते. चौदा वर्षांच्या, अमेरिकेत जन्मलेल्या आणि चौदा
वर्षात चार वेळा भारतात आलेल्या मुलाला घेऊन कायमचे इथे परतण्याआधी केतन
आणि नीताने नक्की काय विचार केला असेल? तीन वर्षांत तो इथून बारावी झाला की परत
त्याला बी एस करण्यासाठी तिकडे
पाठवणार आहेत? की इथे एंजिनियरिंग करून मग एम
एस ला
पाठवणारेत?

पपांनी आपटे रोडला भलामोठा
बंगला बांधून ठेवला होता, त्यात केतनचेच काय,
अजून चार कुटुंबं मावली असती. अम्माला तिचे
वेगळे विश्व होते. तिने स्वतःला कर्वे शिक्षण संस्थेला जवळजवळ वाहून घेतले
होते. आणि ती नीलिमाच्या भानगडीत फारशी लक्ष घालत नसे. तसेही पहिल्यापासून पपाच नीलिमाला जवळचे.
अम्माचा
तिचा फारसा संवाद घडल्याचे तिला आठवतच नव्हते.

नीताने आल्याआल्या घराची 'घडी'
बसवायला घेतली. नीलिमाचा त्याला काही
आक्षेप होता असे नव्हे, कारण तिला घरकामाची आवड अशी कधीच नव्हती. पण तिला कुणाचं
ऐकून घ्यायचीही सवय नव्हती. नीताने आल्यावर सकाळी दूध कुठलं, किती, इथपासून ते
माळ्याला आठवड्यातून तीनदा बोलावायचं की चारदा इथपर्यंत सूत्रे हातात घेतली. नीलिमा
आपल्या कोषात जात चालली.

सुमुखने मात्र तिला बराच
लळा लावला. परतल्यावर जवळपास वर्षभर 'त्याचे उच्चार कळत नाहीत' म्हणून त्याला कोणी
मित्र-मैत्रिणी मिळाल्या नाहीत. आणि नीताने त्याला शाळा शोधली ती ज्ञानप्रबोधिनी. त्या
वातावरणात तो बिचारा फारच बुजून गेला. अशा वेळेस त्याला नीलूआत्याचा आधार
वाटला.

नीलिमाला तशी लहान मुलांची
आवड नव्हती, पण नावडही नव्हती. आणि सुमुख एवढा लहानही नव्हता.
त्याला वेताळ टेकडीवर घेऊन जाणे, शनिवार-रविवारी सिंहगडावर घेऊन जाणे, स्वतःच्या
खरेदीसाठी तुळशीबागेत त्यालाही नेणे आदि गोष्टी सुरू झाल्या.
आर्थिक सुबत्ता पहिल्यापासून भरपूर असली तरी नीलिमाला तुळशीबाग, मंडई,
लक्ष्मी रस्ता अशा ठिकाणीच खरेदी जमे. मोठ्या महागड्या दुकानांत जायला तिचे पाऊल
वळत नसे. पपा तर नेहमी म्हणत "माझे
सगळे काही घेतले पोरीने, रंग, चेहरा, डोळे, बुद्धिमत्ता (इथे अम्माकडे एक
सहेतुक कटाक्ष), पण अम्माचा चिकटपणा
तेवढा बरोब्बर उचललाय कारटीने.
कोंकणस्थी रक्त ना
शेवटी."

नीताने एव्हाना 'नीलरत्न' बंगल्याचा
संपूर्ण ताबा घेतला होता. सुमुखचे नीलिमाबरोबर फिरणे तिला,
कसे कुणास ठाऊक, पसंत पडले होते. एरवी नीता आणि नीलिमामध्ये साम्यापेक्षा
भेदच जास्त होते. नीलिमा कट्टर नास्तिक, तर नीता अतीश्रद्धाळू.
नीलिमा पक्की मांसाहारी तर नीता शुद्ध शाकाहारी. चार लोकांत मिसळण्याची नीलिमाला साफ
नावड, तर नीताला लग्न-मुंजीत मिरवण्याचा भारी सोस.

नीलिमाचं
सगळं व्यक्तिमत्व पपांवरच
बेतलेले होते. पपांचे नि नीताचे अजिबात
पटत नसे. त्यामुळे चौदा वर्षांत जेव्हा जेव्हा केतन कुटुंबासह आला
तेव्हा तेव्हा पपा एरंडेल
प्यायल्यासारखा चेहरा करून वावरत होते. आणि केतन परतल्यानंतर महिनाभर
तरी नीताचा उल्लेख "ती बाई" म्हणून करीत होते. नीलिमा पपांइतकी टोकाची भूमिका
कधी घेत नसे म्हणून ठीक होते. पण कधीतरी तिच्या मनात 'केतनने काय पाहिलं असेल
हिच्यात' असा विचार तरळून जाईच. अम्मा या सगळ्यात कधी नसे.
ती आपला आब राखून होती.

लग्नाचा विचार करायचा विचार करावा की करू नये अशा स्थितीत नीलिमा पोहोचत चालली
होती आणि नीताने तिच्या नात्यातल्या निनादचे स्थळ
सुचवले. निनाद संगवई. वय वर्षे
पंचेचाळीस. पंधरा वर्षे अमेरिकेत. शिक्षणाने एंजिनियर पण कमॉडिटी
मार्केटमध्ये गेली पाचसात वर्षे काम करत
होता. रहायला बॉस्टन.
अमेरिकन नागरिक. नीताचा लांबचा आतेभाऊ.