बेंच !

"हॅलो...अरे सध्या खूप धावपळ चालू आहे रे, नाइट शिफ्ट चालू झाली परत आठवडाभर..." अर्धवट भिजलेल्या केसांना मागे टाकत स्नेहा म्हणाली. तिच्या नजरेला नजर देणे राहुल टाळू शकत नव्हता आणि पुरते सांभाळू ही शकत नव्हता.... "ठीक आहे.. माझी सुद्धा नाइट आहे, बघू भेटू वेळ मिळाला मध्ये तर... "  त्याने प्रश्नार्थक मुद्रेने तिला विचारले.. आणि उत्तर येण्याअगोदरच तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला, ती तशीच हाताने बाय करून पायऱ्या चढायला लागली... आणि राहुल त्याच पायऱ्यांवरून खाली यायला लागला...

राहुल आणि स्नेहा, एकाच बॅच मध्ये कंपनीत जॉईन झाले होते, परंतु काही कारणास्तव तिचे प्रोजेक्ट बदलले असल्याने त्यांची शिफ्ट बदलली होती, राहुल ला ऑनसाइट चा चान्स हवा होता तर स्नेहा ला प्रमोशन.. कदाचित ह्या महत्त्वाकांक्षाच त्यांच्या मैत्रीला सुरुवात करून देत होत्या... १७ जणांच्या ग्रुप मध्ये वेव्हलेंथ जुळणारे ४ लोकं, त्यातलेच हे दोघं !

पायऱ्या उतरत तो खाली आला, कंपनीच्या बाहेर मोकळ्या पॅसेज मध्ये.. गार वारा, किंचित पाऊस आणि मातीचा मंद सुगंध कोणालाही वेड लावेल असा...तो तिथल्या बेंच वर जाऊन बसला, आज कंपनीत मेंटेनन्स ऍक्टिविटीमुळे जास्त काम नव्हतं, आणि त्यात एवढ्या दिवसांनी स्नेहा भेटली... आता तर किमान १० मिनिटे शांत गार वाऱ्याच्या सोबत राहणे अनिवार्य होते.. !

"तुला अस गार वाऱ्यात फिरायला फार आवडतं ना रे? , आजारी पडशील कधीतरी... "

तू आहेस ना मग डॉ. कडे न्यायला...

मी नाही नेणार, आधी कुपथ्य करावं कशाला ? म्हणे मी आहे, मी काय कायम असणार आहे का ?

तू गेलीस की मी कशाला फिरेन वाऱ्यामध्ये ?

का ? बायकोसोबत फिरशीलच ना ? तसंही तिकडे ऑनसाईट गेलास की कोणी फिरंगी मिळेलच तुला, आणि तिकडे वादळं पण चालू असतात म्हणे, अशीच गार हवा ....

'स्नेहा... !", आपलं बोलणं झालयं ना, मला ऑनसाईट जायचा चान्स आहे, आणि त्याआधी मला लग्न करायचं नाहीये, जबाबदारी पेलण्याची मुख्य ताकद पैसा देते... पैसा म्हणजे सर्वस्व नाहीच, पण पैसा नाही त्यामुळे काही काही आनंद उपभोगता येत नाहीत हे कुठेतरी खुपतंय..त्यावर मात करणे म्हणजे कष्ट करून पैसा कमावणे, हेच वय आहे त्यामध्येच मला स्वतःवरील जबाबदाऱ्या आणि पैसा दोन्हीवर अगदी बेदम कष्ट करून डाव लावायचा आहे... !  तुझ्याशी लग्न न करणे किंवा करणे हा खरं तर पर्याय असू शकत नाही, परंतु तू लग्नानंतर तिकडे येणार नाहीस, आणि मी परत येईपर्यंत तू थांबणार नाहियेस.. मग मी काय बोलू हे तूच सांग बरं.. !

"राहुल..." तिच्या हाकेने तो एकदम भानावर आला, ६ महिन्यांपूर्वी त्याच बेंच वर बसून मारलेल्या गप्पा वाऱ्याच्या संथ लयीत ओघवत आल्या होत्या, रिसेशन च्या काळात कंपनी जॉईन केल्याचा चटका होताच, परंतु कंपनीने काढून न टाकता फक्त महिनाभर बेंच वर ठेवले होते... त्या काळात हाच बेंच त्यांना सोबत करत होता...--- हाकेचा आवाजामुळे चटकन त्याने एक हात चेहऱ्यावर फिरवून मागे पाहिले, स्नेहा आली होती, तिच्या हातात एक पॅकेट आणि कसलीतरी पिशवी होती... राहुल बेंच वरून उठून तिच्याजवळ गेला.

" पेढे? म्हणजे काहीतरी बातमी आणलीयेस?

हो रे...  फॅमिली फ़्रेंड आहे, काल घरच्या घरीच साखरपुडा झाला, अक्चुअली "विशाल" परवा बंगलोर ला जातोय आणि मग हैदराबाद ला २ महिने, नंतर परत पुण्यात येईल...  आम्ही ६ महिन्यांनी लग्न करू अजून...

"गुड..  !... होपफुली मी लग्नाला येऊ शकेन... "

"नाही तू नाही येऊ शकणार कदाचित,  कारण आत्ताच वर बोलणी चालू होती मॅनेजर्स ची, आमच्या प्रोजेक्ट मधला अनिकेत आणि तुझ्या प्रोजेक्ट मधला कोणीतरी ऑनसाईट जात आहेत १८ महीने... आणि तुझ्या प्रोजेक्ट मधला तू सोडून कोण असणार ?"

"मी तिकडे गेल्यावर येऊ शकणार नाही असे कोणी सांगितले ? "

" हो ते ही आहेच म्हणा, असो.. ती नंतरची गोष्ट, हा पेढा घे... "

"तेवढा गोड नाहीये... "

" माझी वेळ आणि तुझी ऑनसाईट व्हिजिट एकदम जमत नाहीये ना.. नाहीतर नक्की गोड लागला असता...  चल आता मला ऑल द बेस्ट म्हण आणि पुन्हा एकदा तुझे प्रोजेक्ट स्टॅटिस्टिक्स नजरेखालून घालून घे... "

" हो... ऑल द बेस्ट, ऍंड... थँक्स फॉर एव्हरीथींग... & सॉरी... कशासाठी ते विचारू नकोस.."

"नाही विचारणार, इनफॅक्ट, सेम टु यू .. टेक केअर, कीप इन टच.. "

पँटला लागलेली धूळ आणि हाताच्या तळव्यावर उरलेली साखर झटकत तो तिच्यासोबतच परत कंपनीत जायला पावले टाकायला लागला... उद्याच्या प्रतीक्षेत... ! प्रत्येक श्वासासोबत बाहेर पडणारा मूक संवाद....थंड वारा... हिरवेगार लॉन... आणि आठवणींचा साक्षीदार तो बेंच मागे सोडून...  

रिसेशन च्या वेळी त्याच्या कंपनी सोडून जाणाऱ्या मॅनेजरने सांगितलेले वाक्य सारखे त्याच्या मनात घोळत होते...कदाचित आज त्याला त्याचा खरा अर्थ समजला असावा : --  "टाइम स्टॉप ऍट नथिंग... नॉट इव्हन ऑन बेंच.. !" !