अमेरिकेतील दहावी बारावीची वर्षे

भारतामधील शिक्षण पद्धती ही अमेरिकेतील शिक्षण पद्धतीपेक्षा अनेक बाबतीत निराळी आहे. भारतामध्ये ज्याप्रमाणे दहावी आणि बारावीची वर्षे आयुष्याला दिशा देतात तशी इथे नववीपासून बारावीपर्यंतची चार वर्षे आयुष्याला दिशा देणारी असतात. अमेरिके मधला विद्यार्थी कोण कोणत्या आघाड्यावर लढत असतो? कशी असतात ही नववी ते बारावी ची चार वर्षे? ह्याची ही तोंड ओळख.

भारतामध्ये पहिली ते चौथी प्राथमिक, मग पाचवी ते सातवी माध्यमिक, आठवी ते दहावी हायस्कूल, अकरावी बारावी ज्युनिअर कॉलेज आणि मग ३ वर्ष पुढे कॉलेज ची असतात.

अमेरिकेमध्ये पहिली ते पाचवी प्राथमिक, सहावी ते आठवी माध्यमिक, नववी ते बारावी हाय स्कूल, मग पुढे ४ वर्षे under graduate ( ज्याला आपण कॉलेज म्हणतो )असे  असते.

अमेरिके मध्ये नववी ला विषय निवडी पासून सुरुवात होते. कॉलेज मध्ये गेल्यावर कोणत्या शाखेचा अभ्यास करणार असाल त्याला अनुसरून पूरक विषय घेता यावेत म्हणून नववी पासून अनेक ऐच्छिक विषय घेण्याच्या संधी उपलब्ध असतात. असंख्य पर्याय असतात निवडायला. नववी ते बारावी असे दर वर्षी विषय निवडत निवडत पुढे जायचे असते. इंग्लिश आणि गणित मात्र घ्यावेच लागतात.

प्रत्येक शाळेमध्ये  कौन्सिलिंग  ची सोय असते. ज्या विषयात करिअर करायचे आहे त्या विषयाला संबंधित कोणते पूरक विषय घ्यायचे  याकरता पालक आणि विद्यार्थी सल्ला मागू शकतात. शिवाय दर सहा महिन्यांनी या विषयावर पालकांच्या सभा देखील भरवल्या जातात.

अधिक  हुशार मुलांना AP  आणि HONORS असे प्रत्येक विषयामधील कॉलेजच्या दर्ज्याचे अभ्यासक्रम घेता येतात. हे अभ्यास क्रम निवडलेल्या मुलांना कॉलेज ऍडमिशनला फायदा होतो. मग कॉलेज मध्ये तो विषय पुन्हा शिकायला लागत नाही ज्यामुळे पैसा आणि वेळ दोन्ही वाचते.

भारता मध्ये जसे दहावी आणि बारावी चे वर्ष हे कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळण्याच्या  दृष्टीने  महत्त्वाचे असते तसे इथे नववी पासून बारावी पर्यंत सगळी च वर्षे महत्त्वाची असतात. याचे मुख्य कारण म्हणजे नववी पासून ते बारावी पर्यंत चे सगळ्या  लहान मोठ्या परीक्षांचे मार्क हे कॉलेज च्या ऍडमिशन  करता धरले  जातात. शाळेमध्ये सतत वर्ष भर कोणत्या न कोणत्या  परीक्षा सुरूच असतात. आणि शिवाय एक वार्षिक परीक्षा असते. अनेक प्रोजेक्ट्स आणि प्रेझेंटेशन याचे पण मार्क्स महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे मुलांना सतत अभ्यासात सतर्क राहावे लागते. आणि मग या सर्व मार्कांची सरासरी काढून जो आकडा येतो तो म्हणजे  GPA. (सर्व साधारणपणे १००%= ४. ० GPA. )

कॉलेजच्या प्रवेशा करता  हा आकडा  अर्थातच अतिशय महत्त्वाचा  असतो.

ज्यांना  आपला हा GPA वाढवायचा असती त्यांना दर वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये समर स्कूल  सारखे पर्याय उपलब्ध असतात.

त्यामुळे बरीचशी  मुले सुट्टीमध्ये शाळेत जातात.समर स्कूल  मध्ये पुढच्या वर्षाचा अंदाज यावा इतपतच अभ्यास शिकवला जातो. संपूर्ण वर्षाचा अभ्यास क्रम पूर्ण करण्याकडे  भर नसतो. समर स्कूल  मध्ये  परीक्षा नसते. आणि त्याचा कालावधी फक्त ६ आठवडे इतकाच असतो.

GPA च्या च जोडीला अजून एक आकडा  इथे महत्त्वाचा  समजला जाते आणि तो  म्हणजे SAT.SAT is  Standardized Test for College Admission
SAT ची परीक्षा द्यायची असते  अकरावी मध्ये. या मध्ये इंग्लिश  WRITING,इंग्लिशREADING,गणित या ३ विषयांची परीक्षा घेतली जाते. सगळे मिळून २४०० मार्कांची परीक्षा असते.

SAT प्रमाणेच ACT अशी देखील एक परीक्षा  असते. काही कॉलेजेस ACT चा रिझल्ट पाहतात तर काही SAT चा.

SAT SUBJECT TESTS अशी  अजून एक परीक्षा  असते जी एखाद्या विषयाशी निगडित असते. जो विषय घेऊन UNDER GRAD/College करणार असता त्या विषयाची सब्जेक्ट टेस्ट  मुले देतात.

आणि दहावी मध्ये असते P-SAT. म्हणजे pre-SAT. ह्या परीक्षेचे मार्क मात्र  कशा मध्ये धरत नाहीत. ही SAT च्या सरावा करता असलेली परीक्षा आहे.

अमेरिके मध्ये कॉलेजला ऍडमिशन देताना मार्कांच्या इतकेच त्या विद्यार्थ्याचे  इतर व्यक्तिमत्व कसे आहे याला  देखील अनन्य साधारण  महत्त्व असते.

ह्या करता सगळ्यात प्रथम पहिले जाते की त्या मुलाचे खेळ किंवा कला या क्षेत्रात काही वाखाणण्या जोगे काम आहे का.

त्यामुळे इथे मुले सहावी सातवी पासून एक खेळ आणि एक कला निवडून त्या त्या गोष्टी मध्ये जास्तीत जास्त वर्ष शिक्षण घेऊन  प्राविण्य मिळवतात.

हायस्कूल मध्ये व्यक्तिमत्त्व विकसित करण्याच्या हेतूने वेगवेगळे असंख्य क्लुब्स  असतात. उदा. रोबोटिक्स,enviornment club, बुक क्लब, जर्नालिझम क्लूब. मुलांनी या अश्या (कमीत  कमी २) क्लब्स मध्ये भाग घेणे अपेक्षित असते. हे क्लुब्ज मुलेच चालवत असतात. त्या क्लूब द्वारे अनेक स्पर्धांमधून भाग घेत असतात. आणि या सगळ्या मुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व विकास होतो. लीडर शिप गुण वाढीला लागतात. समाजात एकत्रित पणे काम करण्याची सवय होते. निर्णय क्षमता वाढीला लागते.

त्या नंतर नंबर लागतो ते म्हणजे त्या विद्यार्थ्याने समाजसेवा किती केली आहे.community serice/volunteering. समाज सेवा करण्याकरता वयाची १५ वर्षे पूर्ण झालेली असावी लागतात. मुले नववी पास झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये हे volunteering तास मिळवतात. बारावीचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होई पर्यंत ह्या मुलांना ६० तास समाजसेवा पूर्ण करायची असते. पण या मध्ये सुद्धा स्पर्धा असते. त्यामुळे मुले २०० तास तरी समज सेवा करतात आणि आपला ऍडमिशन चा फॉर्म अधिकाधिक वजनदार करतात.

कोठे करता येते समाज सेवा? त्या करता इथे समाजात अनेक संधी उपलब्ध असतात. पब्लिक लायब्ररी मध्ये, किंवा म्युझियम्स, हॉस्पिटल्स मध्ये मुलांकरता खास पोझिशन्स असतात. काम हलके फुलके  असते. मुलांना समाजाचे ऋण मान्य करायची सवय हवी या करता ही अट असते. इथे कोठेही मुलांना बदल्यात पैसे मिळत  नाहीत. फक्त किती तास काम केले याची लेखी नोंद  मिळते. जो विषय घेऊन under graduate करणार असाल त्या विषयाशी संबंधित जर समाजसेवा केली तर अर्थात च त्याचा कॉलेज ऍडमिशनला  जास्त प्रभाव पडतो. उदा. जर मेडिकल ला जाणार असाल तर हॉस्पिटल मध्ये समाज सेवा केल्याने फायदा होतो.

ऍडमिशन करता पुढची गरज म्हणजे मुलांना एक एस्से ( निबंध ) लिहून द्यायचा असतो की तुम्हाला ह्या च कॉलेज मध्ये ऍडमिशन का हवी आहे आणि तुम्ही करिअर करता हाच विषय का निवडला आहे या संदर्भात. पैसे घेऊन एस्से लिहून देणारी किती तरी लोक आहेत. खरे तर हा एस्सी मुलांनी स्वतः लिहिणे अपेक्षित असते.

कॉलेज अप्लिकेशनला  विद्यार्थी जोड देतात ते म्हणजे शिक्षकांचे शिफारस पत्र. इथे वशिले बाजी कोठेच चालत नाही. शिक्षक सुद्धा खिरापत वाटल्यासारखी हि पत्रे  देत नाहीत. अगदी विशेष कामगिरी केली असेल तर च हे शिफारस पत्र मिळते आणि  शिक्षक सुद्धा अगदी मोजक्याच शब्दात लिहून हे पत्र  देतात. त्यामुळे मुले अगदी नववी पासून नीट  व्यवस्थित पणे वागून शिक्षकांच्या मर्जीला उतरण्याकरता  धडपड करत असतात.

शाळेची वेळ असते सकाळी ८ ते ३ आणि नंतर बहुतांशी  मुळे  ३ ते ५ खेळाची  प्रॅक्टिस करतात. शनिवार रविवारी community service किंवा SAT ची तयारी किंवा इतर EXTRA CARRRICULAR ACTIVITIES. ह्या  सगळ्या मुळे अमेरिके मधील मुलांना  नववी पासूनच अनेक प्रकारची व्यवधाने असतात ती बारावी संपे पर्यंत. अकरावी ची एकदा SAT परीक्षा दिली की खरे तर बारावी म्हणजे इथे आराम असतो. मुले अगदी मनसोक्त मजा करत असतात.

पण ही मजा फार काळ टिकत नाही. कारण बारावी चे वर्ष म्हणजे कॉलेज ची ऍडमिशन घ्यायचे दिवस. ऍडमिशन काही १-२ महिने आधी मिळत नाही. ती सुरुवात होते बारावीच्या डिसेंबर महिन्यापासून.