...........................................
अजून काय आणखी...?
...........................................जगायचे, जगायचे, मरून जायचे!
अजून काय आणखी करून जायचे?
मनातल्या मनात आठवायचे तुला...
मनातल्या मनात मोहरून जायचे!
तुझे तुलाच दान मी कुठे दिले, नभा?
मला न एवढ्यात ओसरून जायचे!
असायचे इथेच मी, इथे नसूनही
इथे न वावरून वावरून जायचे!
पलीकडे असेल काय हे बघायला
स्वतःस आरपार पोखरून जायचे!
... म्हणून राहिलो तुला धरून मी इथे
मला, तुझ्या पुढे, तुला धरून जायचे!
तुला-मला हवी तशी करायची मजा...
तुला-मलाच सर्व निस्तरून जायचे!तुझ्यासवे रितेपणा न जाणवे मला...
तुझ्याशिवाय मी कसे भरून जायचे?
फिरायला निघायचे उदास वाटता
पुन्हा पुन्हा तुझ्या घरावरून जायचे!
असाच वागणार मी.. तशीच आणि तू...
न बोलता असे किती ठरून जायचे!
कुठे कुठे फिरून यायचे घरी पुन्हा...
... निघून शेवटी कुठे घरून जायचे?
- प्रदीप कुलकर्णी
..................................................
रचनाकाल : २५ जुलै २०१०
..................................................