मोरपीस

दहावीचा पहिला दिवस. नवी वह्या पुस्तके घेऊन सायकल दामटत शाळेत पोचलो. आमच्या शाळेत प्रत्येक यत्तेचा आणि तुकडीचा वर्ग ठरलेला असायचा, त्यामुळे वर्ग शोधण्याचा प्रश्न नव्हताच. सायकल स्टँडला अडकवून वर्गात गेलो. रिवाजाप्रमाणे भिंतीकडच्या रांगेत शेवटच्या बेंचवर भिंतीच्या कोपऱ्यात देव्या बसलेला होता. त्याच्यापुढे रित्या आणि आडसुळ.  मुलींकडच्या रांगेत शेवटच्या बेंचवर वैभ्या आणि विक्या बसलेले आणि त्यांच्या पुढच्या बेंचवर किशोर आणि अम्या. देव्याच्या शेजारची माझी जागा. नेहमीप्रमाणे चार बेंचचं कॅसलिंग जमलेलं पाहून समाधान वाटलं.  जागेवर जाऊन बसलो तेव्हा आधीच चर्चा रंगात आलेली होती. नुकत्याच आलेल्या 'मैने प्यार किया' ची सगळ्याना चांगलीच किक बसलेली होती. पुन्हा एकदा तो पिक्चर पाह्यला पाहिजे यावर एकमत होत आलेलं असताना विक्याने ती बातमी हळूच सोडली.

"इ तुकडीतनं आपल्या वर्गात एक नवीन मुलगी येणारे. भाग्यश्री नावाची. ", विक्या म्हणाला.

"काय बोलतो, कशी आहे? आणि तुला काय माहिती?", कोणीतरी विचारलं.

"अरे लय भारी ए, तिनंच मला सांगितलं. आम्ही वैद्य सरांच्या क्लासला जातो ना, तिथं".

"तिनं तुला सांगितलं?", वैभ्याने विक्याच्या खांद्यावरचा हात त्याच्या डोक्यामागे नेऊन मांजा गुंडाळल्याची ऍक्शन करत विचारलं.

"मऽऽग, आम्ही दोघं अभ्यास पण करतो एकत्र तिच्या घरी." ज्या शाळेत मुलींशी साधं बोलणं सोडा नुसतं हसणंसुद्धा अशक्यप्राय वाटायचं तिथे विक्या स्फोटावर स्फोट करत होता. सगळ्यांचीच उत्कंठा अगदी शिगेला पोचली होती पण तेवढ्यात बाई वर्गात आल्या आणि बोलणं थांबवावं लागलं.

पहिला तास संपला तरी कोणीही नवीन आलं नाही. सगळे आतुरतेनं वाट पाहात होते, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या तासालाही काहीच झालं नाही. विक्या नुसतं फेकत होता असं प्रत्येकाने मनोमन ठरवलं असावं कारण मधल्या सुटीत कोणीच विषय काढला नाही. नाही म्हणायला वैभ्या आणि अम्या विक्याला घेऊन इ तुकडीत चक्कर टाकून आले पण त्याना ती दिसली नाही. दिवस संपेपर्यंत तो विषय सगळेजण पूर्णपणे विसरले होते आणि नेहमीच्याच टिवल्याबावल्या करत घराकडे चालू पडले.

दुसऱ्या दिवशी शाळा सुरू व्हायच्या थोडं आधी नेहमीप्रमाणे आमचा गलका चालला होता. वर्ग जवळजवळ भरलेला होता आणि बाईच तेवढ्या यायच्या रहिलेल्या होत्या. गडबड आणि आरडओरडा टिपेला पोचलेला असताना दारातून ती आली. दारातून आत येऊन मुलींच्या दोन रांगांमध्ये ती पोचेपर्यंतच्या पाच सेकंदांत वर्गात एखादा कडक मास्तर आल्यासारखी सुन्न शांतता पसरली. दोन वेण्या, गोल चेहरा, धारदार जिवणी, अपरं नाक आणि टपोरे काळे डोळे... एवढी सुंदर मुलगी आमच्या 'अ' तुकडीने गेल्या दहाहजार वर्षात कधीच पाहिली नव्हती.

"आयला पिक्चरमधल्या भाग्यश्रीसारखीच आहे रे", कोणीतरी कुजबुजलं.

त्या दिवशी विक्याचा भाव एकदम वधारला आणि वैद्य सरांच्या क्लासचाही. विक्याबरोबर तिथे जाऊन एकदातरी तिच्याशी बोलायचं असं सगळ्यानी ठरवून टाकलं आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही वैद्य सरांच्या क्लासला हजर झालो. विक्यामात्र रोज काही ना काही कारण सांगून टाळायला लागला. चांगलं दोन तीन वेळा समोरासमोर आल्यावरही ती त्याच्याशी बोलणं, हसणं तर सोडाच पण ढुंकुनही पाहत नाही हे आमच्या लक्षात आलं आणि त्याने आधी सोडलेल्या सगळ्या पुड्याच होत्या या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. ती वर्गात येणार हे विक्याला कसं कळालं हा प्रश्न आम्ही ऑप्शनला टाकला आणि त्याला भरपेट शिव्या देऊन आपल्या नशीबात सुंदर मुलींशी बोलणं नाही अशी एकमेकांची समजूत घातली. 

 असेच दिवसा मागून दिवस गेले. वर्गात हळूच चोरून तिच्याकडे पाहणे आणि तिच्या नकळत शाळा सुटल्यावर तिचा पाठलाग करून तिचे घर कुठे आहे हे पाहून येणे असे आमचे टिनपाट उद्योग करून झाले पण तिच्याशी बोलण्याची अजून कोणाचीच हिंमत होत नव्हती.

साधारण महिन्याभराने कोणीतरी कान फुंकल्यामुळे माझ्या घरून मला 'नॅशनल टॅलेंट सर्च' नामक परीक्षेबद्दल शाळेत चौकशी करण्याचे फर्मान मिळाले. दुसऱ्यादिवशी पहिल्याच तासाला मी बाईंना भरवर्गात त्याबद्दल विचारले. त्यापुर्वी शाळा फक्त ठराविक अतिहुशार मुलानाच त्या परीक्षेला बसवत असे पण मी विचारल्यामुळे मग सगळ्यांसाठीच ऑफिसमधुन फॉर्म घेऊन येण्याचे काम मलाच मिळाले. बाईंनी सांगितल्याप्रमाणे मधल्या सुटीत फॉर्म आणायला मी ऑफिसमध्ये गेलो. फॉर्म घेऊन येताना आता हे सगळ्याना वाटायचे असा विचार करताना माझ्या लक्षात आलं की यातले अर्धे मुलींमध्येही वाटावे लागतील. व्वा! मी एकदम रोमांचित वगैरेच झालो. हाती आलेली ही सुवर्णसंधी साधून आज तिच्याशी बोलायचंच असं मी मनोमन ठरवलं. वर्गाच्या दाराशी येइपर्यंत माझी छाती धपापू लागली होती आणि माझ्या हृदयाचे ठोके माझ्या कानात मला स्पष्ट ऐकू येत होते. मी वर्गात गेलो तेव्हा ती बेंचवर बसून तिच्या मैत्रीणीसोबत डबा खात होती. त्यानंतर मी ते फॉर्म्सचे दोन गठ्ठे कसे केले, एक गठ्ठा तिच्याकडे कसा दिला, कारकूनाने दिलेल्या सूचना तिला कशा सांगितल्या, काही म्हणजे काही मला आठवत नाही. मी भानावर आलो तेव्हा पाण्याच्या टाकीजवळ बसलेलो होतो आणि माझे कान भयंकर गरम आणि लाल झाल्यासारखे वाटत होते एवढंच मला आठवतंय. तो दिवस मी असाच सुन्नपणेच घालवला. दिवसभरात परत तिच्याकडे पाहण्याची माझी हिंमत झाली नाही. घरी गेल्यावर मात्र मी सगळं विसरून गेलो.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो. वर्गात गेल्यावर बेंचच्या दोन रांगांतून जाताना अभावितपणे तिच्याकडे नजर गेली. ती माझ्याकडेच पाहत होती आणि मी तिच्याकडे पाहिल्यावर तिने एक हलकंसं स्माइल दिलं. कोणीतरी मोरपीस फिरवावं तशी एक गोड शिरशिरी माझ्या सर्वांगातून लहरत गेली आणि मी तरंगू लागलो....

त्यानंतर मग तो खेळच ठरून गेला. ना तिने परत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ना मी तिच्याशी. पण ते पूर्ण वर्षभर आम्ही एकमेकांशी डोळ्यांतूनच हसत, बोलत राहिलो. त्याला पहिलं प्रेम म्हणता येईल का वगैरे विचार मी कधी केला नाही पण दरवेळी तिच्या नजरेस नजर देताना ते मोरपीस तेवढंच आनंद देत राहिलं.  

आजही माझ्या मनाच्या पुस्तकात ते मोरपीस मी जपून ठेवलं आहे. कधी कधी लहर आली की ते पान उघडतो आणि ते मोरपीस घेऊन मी गालावर फिरवत बसतो. 

(टीपः हे वर्णन काल्पनिक असून जिवंत अथवा मृत व्यक्तींशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)