नेमबाज - भाग २

"अनुभवही आहे नि या गोष्टी इतरांच्या बाबतीत पाह्यल्येत पण" शंकू सांगायला लागला, "तुला आठवतं एकदा मला तुझ्या बॉसशी बोलायचं होतं. तू दिलेल्या नंबरवर मी खूप प्रयत्न केला पण मला तो लागलाच नाही. नंतर तू एकदा माझ्या घरी आलास तेव्हा मी तुला ते सांगितलं. तर तू म्हणालास बघू कसा लागत नाही ते. तू एकदाच तो नंबर डायल केलास नि कॉण्टॅक्ट झाला. हे कसं झालं म्हणून विचारलं तर तू चेष्टेनी म्हणालास, दिवसातून छप्पन वेळा मी त्याला फोन करतो. मी इथे रिसीव्हर नुसता उचलला तरी त्याला रिंग जाईल. हॉट लाइनसारखी. दुसरं उदाहरण आमच्या मुलाच्या मित्राचं. तो कॉम्प्युटरमध्ये गड्डा आहे. एकदा आमचा प्रिंटर बंद पडला. आम्हाला जी काय माहिती होती त्या आधारावर आम्ही खूप खटपट केली. पण जमलं नाही. शेवटी त्याला बोलावलं. त्यानी आल्यावर प्रिंटरचं झाकण थोडं वर केलं नि आत हात घातला. प्रिंटर चालू झाला. आत कुठे हातानी स्पर्श तरी त्यानी केला होता की नाही याची मला शंका आहे."   

"पण यात तुझी त्राटक-थिअरी कुठे आली?" मी विचारलं.

"नीट विचार कर" शंकू म्हणाला, "त्राटक ही सर्वसाधारण संज्ञा आहे. डोळ्यानी एकटक पाहाणे इतका मर्यादित अर्थ नाही तिला. ज्यामुळे मन एकाग्र होते ते त्राटक. तू काय नि तो प्रिंटर चालू करणारा काय तुम्ही तुमची कामं सातत्यानी करत होतात. तूच म्हणालास ना की दिवसातून छप्पन वेळा बॉसला फोन करत होतो म्हणून. तर या सातत्यामुळे तुमचं तुमच्या कामांवर सहज नकळत त्राटक होत होतं आणि तुमची ती कामं विनासायास होत होती."  

मला फारसं पटत नव्हतं. शंकू ओढून ताणून माझं नि प्रिंटरचं उदाहरण त्याच्या थिअरीत बसवतोय असं वाटलं. पण माझ्याकडे दुर्लक्ष करीत शंकू म्हणाला, "तुला आणखी एक थिअरी सांगतो, "आपण त्राटक केलं की आपण आणि त्राटक केलेली गोष्ट यात आपलं क्षेत्र तयार होतं. चुंबकीय क्षेत्रासारखं. त्या क्षेत्रात आपली सत्ता असते. तिथे फक्त आपले नियम चालतात. भौतिक शास्त्राचे नाही. आणि आपली इच्छा हाच तिथला नियम असतो. "

"तुला स्वतःला याचं प्रात्यक्षिक दाखवता येईल? " मी शंकूला हरवायचं ठरवलं. मनात म्हंटलं बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. 

"अर्थात! प्रत्यक्ष तुझ्यासमोर दाखवतो. पुरावा देतो. " असं म्हणून शंकू उठला. त्यानी कॅरम आणला, सोंगट्या लावल्या नि म्हणाला, "हे बघ. मी आता एकापाठोपाठ एक सगळ्या सोगट्या घालवतो. प्रत्येक फटक्याला एक तरी सोंगटी पॉकेटमध्ये जाईल. एकही फटका फुकट जाणार नाही."  

"बघू या" मी म्हणालो. पण तो हे करू शकेल याबद्दल मला फारशी शंका वाटत नव्हती.

आणि त्यानी बोलल्याप्रमाणे केलं. तेही इतक्या फटाफट की तो जरा तरी नेम धरत होता की नाही कुणास ठाऊक.

"काय आतातरी पटलं की नाही मी काय म्हणालो ते? " त्यानी मान वर करून विचारलं.

"तुझी कुठली थिअरी पटली असं नाही. पण तुला मानलं. " मी म्हणालो.

बराच वेळ झाल्यामुळे मी निरोप घेऊन त्याच्या घरनं निघालो. त्याच्या थिअरीविषयी विचार करीत. आपल्यालाही शंकूसारखी पॉवर मिळायला हवी असं वाटलं.

दुसऱ्या दिवशी, शंकूची कॅरमवर आणखी एक टेस्ट घेऊन बारकाईनी निरीक्षण करायचं, असं ठरवून शंकूकडे गेलो. तो पांघरूण घेऊन झोपला होता.

"त्यांचं डोकं दुखतंय. बीपी वाढलंय. काल रात्रभर झोपले नाहीत. " शंकूची बायको म्हणाली.

(क्रमश:)