नेमबाज - भाग ४ (अंतिम भाग)

"तुला आणखी एक प्रयोग दाखवतो म्हणजे तुझी खात्री पटेल त्या दिवशी बाइकवाल्याला माझाच दगड लागला त्याची. तो कुत्रा पाह्यलास? त्याला मी हा दगड मारतो. बरोब्बर त्याच्या पुढच्या पायावर बसेल. पण आगदी हलकेच. कुत्र्याला इजा नाही होणार". शंकू म्हणाला.
त्यानी हात लांबवून बोट दाखवलेल्या दिशेनी पाह्यलं. गेटच्या बाहेर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कचराकुंडीजवळ एक कुत्रा होता. अंतर बऱ्यापैकी होतं. कुत्र्यापर्यंत दगड पोचायलाही बराच जोर लागला असता. शिवाय दगड तिथे पोचेपर्यंत कुत्रं त्याच जागेवर राहिलं असतं असंही नाही.
शंकूनी दगड उचलला नि सहजपणानी कुत्र्याकडे भिरकावला. दगड पोचेपर्यंत कुत्रं जागेवरनं थोडं सरकलं होतं. तरी शंकूनी सांगितल्या ठिकाणी कुत्र्याला दगड लागला. कुत्रं जरा लांब गेलं. आवाज न करता. नक्कीच दगड वळला होता.
"त्या कुत्र्याचा पाय तुटेल इतक्या जोरातही मी दगड मारू शकलो असतो. पण म्हंटलं आपल्या प्रयोगासाठी मुक्या प्राण्याला त्रास कशाला द्या? नाही का? " शंकू म्हणाला.
"बरोबर." मी म्हणालो. शंकू नेमबाजीत काहीही करू शकला असता याबद्दल मला शंका राह्यली नव्हती.
शंकूचे प्रयोग मला एकदम महत्त्वाचे वाटायला लागले. त्यातून दुर्बलांना स्वसंरक्षणासाठी मार्ग सापडला असता. या गोष्टीना प्रसिद्धी मिळायलाच हवी असं मला तीव्रतेनी वाटायला लागलं. मी शंकूला तसं सुचवलं. 
"हरकत नाही. एकदा सगळ्या ओळखीच्यांना बोलावून प्रात्यक्षिकच दाखवतो" शंकू म्हणाला. नंतर उत्तेजित स्वरात हसत हसत म्हणाला, "जाऊ दे त्या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांपर्यंत. डोकंच फिरवतो की नाही बघ साल्यांचं".

"काय म्हणत्ये सिद्धसाधकांची जोडी? " घरी आल्या आल्या बायकोनी विचारलं. तिच्या बोलण्यातली खोच जाणवली. पण काहीच लक्षात आलं नाही असं दाखवलं नि म्हणालो, "विशेष काही नाही". मनात म्हणालो, समजेल थोड्याच दिवसात. मीडीयावाले आमच्या मागेमागे करतील तेव्हा डोळे विस्फारतील.
पण तसं काही व्हायचं नव्हतं. कारण ....

दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी शंकूच्या घरून फोन आला. शंकूला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं त्याच्या मुलानी सांगितलं. काय झालं विचारलं तर बीपीचा प्रॉब्लेम आहे म्हणाला. मी आणखी काही विचारणार एवढ्यात जरा घाईत आहे म्हणून त्यानी फोन ठेवला. हे बीपी मध्येच कसं काय उपटलं मला कळेना. पेप्रातल्या त्या बातमीनंतर मी शंकूच्या तब्बेतीवर लक्ष ठेऊन होतो. पण त्याला पुन्हा बीपीचा त्रास झाला नव्हता. तासाभरानी पुन्हा त्याच्या घरी फोन केला. फोनवर वहिनी आल्या. त्यंच्याकडून कळलं की आदल्या रात्री नातवाला बरं नाही म्हणून आपल्या मुलाबरोबर शंकूही डॉक्टरकडे गेला होता. डॉक्टरानी नातवाला पाह्यल्यावर जरा माझंही ब्लडप्रेशर पाहा म्हणून शंकूनी डॉक्टरला सांगितलं. त्याचं बीपी २४० च्याहीवर गेलं होतं. शंकूला काही दिवसांपूर्वी जो त्रास झाला होता त्यानंतर कधीच त्रास झाला नव्हता. डॉक्टर समोर असतानाही त्रास नव्हता. पण डॉक्टरना ते चांगलं लक्षण नाही असं वाटलं. त्यानी शंकूला ताबडतोब ऍडमिट व्हायला सांगितलं. रात्रीतून ट्रीटमेंट सुरू केली. पण बीपी खाली यायला लागल्यावर शंकूला चक्कर यायला लागली होती. त्याला वाढलेल्या बीपीची सवय झाली होती.

भराभर तयार होऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो. आमची नजरानजर झाली. "अरे, माझं कोणी ऐकायलाच तयार नाही" एवढंच शंकू बोलला. पण त्या श्रमांनीही त्याला पुन्हा ग्लानी आली. पुढच्या तपासण्यात त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याचं आढळून आलं. त्याला आयसीयू त हलवण्यात आलं. तिथून त्याची डेड बॉडीच बाहेर आली.

शंकूच्या मृत्यूनी काही महत्त्वाचे प्रयोग त्याच्याबरोबरच काळाच्या पडद्याआड गेले. त्याच्या मृत्यूच्या दाखल्यात डॉक्टरांनी वैद्यकीय कारणांची नोंद काय केली असेल ती असेल, पण त्याच्या मृत्यूचं मूळ कारण मला माहीत होतं. 

कधीकधी मनात येतं शंकूनी डॉक्टरांना बीपी चेक करायला सांगितलं नसतं तर वाढत्या बीपीनिशीही तो जगू शकला असता नि त्याचे प्रयोग लोकांपर्यंत पोचले असते. 

त्याच्या प्रयोगांच्या वाटेला आपण जायचं नाही असं मी ठरवून टाकलं. उगाच बीपीचं रिस्क कोण घेणार?

आणखी एक खूणगाठ मनाशी बांधली. काही त्रास होत नसेल तर बीपी चेक करायला जायचं नाही.

(समाप्त)