नेमबाज - भाग १

शंकू (शंकर कुळकर्णी) माझा लहानपणापासूनचा दोस्त. आम्ही एकाच शाळेत नि एकाच कॉलेजात शिकलो. महिन्याभराच्या अंतरानी एकाच ऑफिसमध्ये सारख्याच पोस्टवर लागलो नि तेवढ्याच अंतरानी तिथून रिटायर झालो. मग मात्र आमचं रूटीन बदललं. शंकूनी त्याचा लेखन-वाचनाचा छंद जोपासला. मी आपला पोथ्या पुराणं वाचत, प्रवचनं ऐकत, एखाद वेळेला प्रवचन करीतही  माझा वेळ घालवायला लागलो. लोक रिटायरमेंटनंतर ज्यास्त सातत्यानी भेटतात. आमचं मात्र रिटायर झाल्यावर भेटणं खूपच कमी झालं. हे लक्षात आल्यामुळे की काय पण आठवड्यातून एक दिवस तरी आपण एकमेकाना घरी जाऊन भेटायचं हा दंडक आम्ही घालून घेतला. त्यातही ज्यास्त करून मीच त्याच्या घरी जायचो. 

शंकू बहुतेक सर्व वर्तमानपत्र वाचायचा. शहरात एक लायब्ररी होती. सकाळी ८ ते ११, शंकू तिथे पडलेला असायचा. कधीकधी एखादा पेपर विकतही घ्यायचा. तो पत्रलेखक होता. वर्तमानपत्रात त्याची पत्रं छापून येत. दहशतवाद, गुन्हेगारी, याबद्दल त्याची मतं जहाल जातीयवादी म्हणण्याइतकी टोकाची होती. एखादी डिवचणारी बातमी किंवा लेख असला तर पत्र टाकल्याशिवाय त्याला चैन पडत नसे.

मात्र एक दिवस त्याच्या घरी गेलो तर महाशय लिहिणं वाचणं सोडून कॅरम खेळताना दिसले. अगदी एकटेच. काय रे काय हे असं विचारलं तर हसत हसत म्हणाला, "काही नाही, नेमबाजीची प्रॅक्टीस करतोय"

"कोणाला उडवायचा विचार आहे की काय? तसं असेल तर कॅरमवर प्रॅक्टीस करून काय उपयोग? एखादा घोडा नाहीतर कट्टा घे त्यासाठी". गावठी पिस्तुलाला काय म्हणतात ते टीव्हीच्या एका सीरीयलमधून माहिती झालं होतं, ते ज्ञान मी पाजळलं.

"हॅ! " मला उडवून लावीत शंकू म्हणाला, "मला कोण लायसन्स देणार त्याचं? "

"मग काय कॅरमच्या टूर्नामेंटस मध्ये भाग घेणार आहेस? " मी विचारलं.

"तसं समज", तो सहज म्हणाला.

पुढच्या वेळेस शंकूकडे गेलो तर तो नातवाबरोबर गोट्या खेळत होता.

"ही पण नेमबाजीचीच प्रॅक्टीस का? " मी विचारलं.

"हं" एवढंच तो बोलला.

नंतर मात्र जेव्हा जेव्हा मी त्याच्या घरी गेलो तो मला नेमबाजी करताना दिसला नाही. मी एक दोनदा विचारलंही. पण "चालू आहे" या पलीकडे तो प्रॅक्टीसबद्दल बोलला नाही.

एक दिवस मी नेहमीच्या वेळेवर न जाता दुसऱ्याच वेळेस गेलो तर महाशयांची नेमबाजी चालू होती. म्हणजे आता माझ्या अपरोक्ष तो सराव करत होता तर! यावेळी तो लांब अंतरावरच्या लक्ष्यावर नेमबाजी करत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा त्याचा नेम बरोबर लागत होता. काही वेळा चुकत होता पण फारच थोडक्यात.

"अरे वा!" मी उत्स्फूर्तपणे म्हणालो, "तू खरंच नेमबाजीच्या स्पर्धेत भाग घे. "

"बघू. सध्या तरी आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कॅरम टूर्नामेंटमध्ये  भाग घेणार आहे. " शंकू म्हणाला.

त्यानी खरोखरच भाग घेतला नि तो त्या सीझनचा चँपियन ठरला. 

शंकूच्या बाबतीत घडलं होतं ते आश्चर्य वाटायला लावणारं होतं. पण उतारवयात काही माणसं नवीन गोष्टी शिकून त्यात प्राविण्य मिळवतात हेही मी ऐकून होतो. तरीपण तो नेमबाजीकडे कसा वळला याचं कुतूहल अनावर झालं नि एक दिवस मी सरळसरळ त्याला विचारलं. त्यालाही वेळ होता.

"बस सांगतो" तो म्हणाला नि थोडा वेळ माझ्याकडे न पाहाता दुसरीकडे एकटक पाहात राह्यला. मग माझ्याकडे वळून म्हणाला, "तुला आठवतं, आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हा आपल्याला गूढ गोष्टींचं फार आकर्षण होतं. त्या नादात आपण मेस्मेरिझम हिप्नॉटिझम वरची पुस्तकं वाचली होती? "

"हो हो हो आणि आपण त्यातले काही धडे गिरवायलाही सुरवात केली होती. तो नाही का टक लावून पाह्यचा प्रयोग. काय बरं म्हणतात त्याला .......? " मी डोकं खाजवू लागलो.

"त्याला त्राटक म्हणतात" शंकूनी मला आठवण करून दिली.

"बरोबर. पण त्याचा इथे काय संबंध?" मी विचारलं.

"सांगतो. त्राटक करतो म्हणजे आपण काय करतो? " शंकूनी विचारलं.

"कशावर तरी मन एकाग्र करतो" मी मला आठवलं ते बोललो.

"बरोबर. नेमबाजीत काय लागतं? " शंकू

"मनाची एकाग्रता" मी सहज बोलून गेलो. 

"कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तर एकाग्रता पाहिजे नाही का?" शंकूनी विचारलं.

"अर्थात" शंकू माझ्याकडून पाहिजे ती उत्तरं काढून घेतोय असं मला वाटलं. पण दुसरं काही बोलण्यासारखं नव्हतंच मुळी.

"आता यापुढे मी काय सांगीन ते तुला एखाद वेळेस पटणार नाही" शंकूनी प्रस्तावना केली नि पुढे म्हणाला, "एकदा एखाद्या गोष्टीवर तुमचं मन एकाग्र झालं की तुम्ही आणि ती गोष्ट यात काहीच अंतर नाही असं तुम्हाला वाटायला लागतं. "

"म्हणजे ते अंतर नाहीसं होतं असं तुला म्हणायचंय?" मी विचारलं.

"इतरांच्या दृष्टीनी नाही पण तुमच्या दृष्टीनी हो" शंकू ठामपणे म्हणाला.

"बरं मग? " शंकू काय सांगायचा प्रयत्न करतोय ते माझ्या लक्षात येईना.

"अशा वेळी तुम्ही किती श्रम करता त्याला महत्त्व राहात नाही. खरंतर तुम्हाला जवळजवळ काहीच श्रम करावे लागत नाहीत ती गोष्ट साध्य करायला" शंकू म्हणाला.

"तुला स्वतःचा असा अनुभव आहे? " मी विचारलं.

"अनुभवही आहे नि या गोष्टी इतरांच्या बाबतीत पाह्यल्येत पण. ........

(क्रमशः)