नेमबाज - भाग ३

कालच्या प्रयोगामुळे की काय? माझ्या मनात विचार चमकून गेला. पण त्याच्या बायकोसमोर बोललो नाही. नंतर शंकूची भेट झाली तेव्हा त्याला मी माझं निदान ऐकवलं.
"तू म्हणतोस ते खरं असावं", शंकू म्हणाला, "पण हा सरावाचा प्रश्न आहे. एकदा हात बसला की बीपी न वाढवताही मी प्रयोग करू शकेन".
नंतरच्या काही दिवसात त्यानी नेमबाजीचे आणखी प्रयोग दाखवले. मी ते बारकाईनी पाह्यले. त्याच्या थिअरीवर माझा विश्वास बसू लागला. त्याच्या नकळत त्याच्या बायकोकडे आडून आडून त्याच्या तब्बेतीची चौकशी करत होतो. पण त्याला बीपीचा त्रास झाल्याचं कानावर आलं नाही.

एक दिवस शंकूनी पेपरातली एक बातमी मला दाखवली. 'भरधाव जाणाऱ्या बाइकवरून एकानी रस्त्यावरून चाललेल्या एका जोडप्यातल्या बाईच्या गळ्यातली चेन खेचली. तिनी आरडाओरडा केला तेव्हा प्रसंगावधान राखून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनी जाणाऱ्या एकानी बाइकवाल्याला जोरानी दगड मारला. डोक्यातून रक्त यायला लागल्यामुळे बाइकवाल्याला बाइक थांबवणं भाग पडलं. लोक जमा झाले. त्यांनी तिघांची धुलाई केली नि बाईला तिची चेन मिळवून दिली. बाइकवाल्याला दगड मारणारा तिथे थांबला नव्हता. ' 
"काय वाटतं तुला?" शंकूनी विचारलं.
"रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तू होतास त्यावेळी? " मी उलट विचारलं.
"नाही. मी त्या जोडप्याच्याच मागे लांब अंतरावर होतो. पण दगड मीच मारला", शंकू म्हणाला.
"मग असं का छापलाय? " मी विचारलं.
"तो बाइकवाला डाव्या बाजूला वळला होता. पण त्याला दगड लागला तो डोक्याच्या उजव्या बाजूला. म्हणून लोकाना वाटलं दगड दुसऱ्या बाजूनी आला. लोक बोलत होते तसं पेपरवाल्यानी छापलं". शंकू म्हणाला.
सगळा सीन माझ्या डोळ्यासमोर आला. त्यात शंकूनी हवेत सरळ भिरकावलेला दगड डाव्या बाजूला वळून बाइकवाल्याच्या डोक्यात बसल्याचं दिसत होतं. भौतिक नियम झुगारून. शंकू अगोदर म्हणाला ते आठवलं, ते आपलं क्षेत्र असतं. तिथे आपले नियम चालतात.
"विश्वास बसत नाही ना? " शंकूनी विचारलं.
"तुझी थिअरी खरी मानली तर अविश्वासाचा प्रश्नच उद्भवत नाही. " मी शरणागती पत्करली. 

शंकूच्या नव्या अवताराविषयी इतर कोणालाही काही माहिती नव्हती. अगदी घरात सुद्धा. शंकूचीच तशी इच्छा होती. त्याच्याही घरात त्याची फारशी कोणी दखल घेतली नव्हती. पण एकदा गंमत म्हणून मी त्याबद्दल माझ्या बायकोला सांगितलं. ऐकताना ती गाल्यातल्या गालात हसत होती.
"बुवाबाजी सुरू करण्याचा विचार आहे की काय तुमचा नि तुमच्या मित्राचा. ते सिद्ध तुम्ही साधक" ती चेष्टेनी म्हणाली नि माझ्यासमोरून निघून गेली. नंतर इतर कोणाला सांगायची हिंमतच केली नाही.

मग एक दिवस आम्ही आजी-आजोबा पार्कमध्ये बसलो असताना शंकूकडे मुद्दाम तो बातमीचा विषय काढला.
"तुला आणखी एक प्रयोग दाखवतो म्हणजे तुझी खात्री पटेल की त्या दिवशी बाइकवाल्याला माझाच दगड लागला होता त्याची. तो कुत्रा पाह्यलास? ....... "           

 (क्रमशः)