टार्ट आउ शोकोलाट अर्थात चॉकलेट टोर्ट

  • २२५ ग्राम बटर
  • २५० ग्राम डार्कचॉकलेट( बिटर चॉकलेट)
  • ६ अंडी
  • २०० ग्राम साखर
  • १ चहाचा चमचा वॅनिला अर्क
  • पाव चहाचा चमचा वाइनष्टाइन (क्रिम ऑफ टार्टार) ते उपलब्ध नसेल तर पाऊण चमचा लिंबाचा रस.
  • सजावटीसाठी- व्हाइट चॉकलेट
२ तास
१२ तुकडे

    

अंडी फ्रिजमधील असतील तर पांढरे व पिवळे वेगळे करणे सोपे जाते. त्यामुळे टोर्ट करायच्या आधी किमान ४/५ तास तरी अंडी फ्रिजमध्ये ठेवलेली चांगली! ही अंडी फोडून पांढरे व पिवळे वेगळे करा आणि झाकून बाजूला ठेवा.
बटर मेल्ट करा, त्यात चॉकलेट घालून तेही मेल्ट करा. मायक्रोवेव असेल तर मेल्टिंग त्यात करता येईलच पण नसेल तर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा आणि दुसऱ्या एका स्टीलच्या भांड्यात बटर आणि चॉकलेट घ्या व चिमट्यात पकडून हे पातेले त्या उकळत्या पाण्यावर धरा. वाफ हातावर येणार नाही याची काळजी घ्या. बटर+ चॉकलेटचे मेल्टेड मिश्रण तयार होईल. अंड्यातील पांढरे बिट करा. इतके बिट करा की रंगहीन द्रवावस्था जाऊन पांढरा फोम तयार होईल. (आयश्ने) वाइनष्टाइन म्हणजेच क्रिम ऑफ टार्टार घालून अजून बिट करा, पिक्स तयार होऊ लागतील. आता साखरेमधील अर्धी साखर घालून अजून बिट करा. हार्ड पिक्स येतील.
दुसऱ्या वाडग्यात अंड्यातील पिवळे बिट करा, बलक मोडून घ्या आणि उरलेली अर्धी साखर त्यात घालून परत बिट करा. पिवळा रंग क्रिमकलरकडे झुकेल. वॅनिला अर्क घाला, मेल्टेड चॉकलेट व बटरचे मिश्रण घाला आणि परत बिट करा.
ह्या केककरता अंड्यातील पिवळे व पांढरे दोन्ही भरपूर बिट करायची गरज आहे, जितके जास्त बिट कराल तितके चांगले. हँडमिक्सी असेल तर उत्तमच नाहीतर व्हिस्कर घ्या.
ह्या मिश्रणात अंड्यातल्या पांढऱ्याचे बिट केलेले मिश्रण हळूहळू घाला आणि चमच्याने एकत्र करा. आता बिटिंग करू नका.
ज्या मोल्ड मध्ये टोर्ट करायचे आहे त्याला बटर लावून घ्या. खरे तर त्या मोल्डला बेकिंग पेपर लावून त्याला बटर लावले तर फार उत्तम.
अवन १८० अंश से वर प्री हिट करून घ्या. ५० ते ६० मिनिटे बेक करा.
नेहमीप्रमाणेच केक झाला की नाही ते केकच्या पोटात सुरी खुपसून पाहा, मिश्रण न चिकटता सुरी बाहेर आली म्हणजे केक झाला.
नंतर जाळीवर काढून रुमटेंपरेचरला आणा.

ह्या टोर्टला कधीकधी क्रॅक्स जातात आणि कधीकधी मध्ये कमी आणि कडेने जास्त फुगतो.
टोर्ट गार झाला की कापा म्हणजे तुकडे व्यवस्थित करता येतात आणि वाफ धरत नाही.
व्हाइट चॉकलेट किसा आणि ह्या टोर्ट वर खोबरे भुरभुरतो तसे भुरभुरा.
आता आणि काय बघता? हाणा.....

फ्रेंचाची खासियत असलेलं हे चॉकलेट टोर्ट युरोप आणि अमेरिकेतही भरपूरच लोकप्रिय झाले आहे. बाहेरून हार्ड पण आतून लुसलुशीत असलेले हे टोर्ट चवीला काहीसे ब्राउनीसारखे लागते.
हे टोर्ट बनवताना मैदा अजिबात घालायचा नाही, मैद्याशिवाय केक, टोर्ट च्या अनेक रेसिप्या आहेत आणि त्यातलीच ही एक यम्मी.... रेसिपी.

एक फ्रेंच मैत्रिण