परमेश्वर साहेबांची कचेरी

आज वटपौर्णिमा.
अनेक स्त्रिया वडाच्या झाडाला (अथवा आदल्या दिवशी भाजीवालीकडून महागात घेतलेल्या वडाच्या फांदीला) दोरे गुंडाळून देवबाप्पाला साकडे घालणार 'देवा जन्मोजन्मी हाच पती लाभू दे'. काही नवरे देवबाप्पाला साकडे घालणार, 'देवा,आहे ही या जन्माला चांगली आहे पण पुढच्या जन्मी बदल म्हणून वेगळी दे.' अशाच स्वरुपाची प्रार्थना काही बायका करणार. कधी नवरा आणि बायको दोघे एकमेकांना सात जन्म मागणार.. पण नवऱ्याची चाहती/बायकोचा चाहता 'देवा, या जन्मी हा/ही दुसऱ्याचा/ची झाला/ली पण पुढच्या जन्मी मलाच लाभू दे'..आता देवबाप्पा कोणाचं ऐकणार?कि आळीपाळीने एकदा याचं एकदा त्याचं ऐकणार?  


मन असंच भरकटत जातं..वाटतं, आपलं एक आयुष्य जगता जगताच कधी कधी नाकी नऊ येतात. कधी कळवळून म्हणतो, 'देवा नारायणा सोडव रे बाबा'.. परमेश्वर विश्वाचा कारखाना कसा चालवत असेल? आणि मग डोळ्यापुढे येते देवाची कचेरी...


शेल्फात फायली खच्चून भरल्या आहेत आणि दर १ तासाला एक नविन शेल्फ मागवले जात आहे. चित्रगुप्त डोळे आणि कान टक्क उघडे ठेऊन समोर ठेवलेले अनेक दूरचित्रवाणीसंच आळीपाळीने पाहतो आहे. त्याच्या हातात शेजारी शेजारी लाल आणि हिरव्या निफा असलेली लेखणी आहे आणि तो टेबलावर रचलेली चिटोरी उचलून त्यावर भराभर माणसाचे नाव आणि लाल/हिरव्या लेखणीने त्याचे दुष/सत्कृत्य लिहून चिटोरी फेकतो आहे. त्याच्या आजूबाजूला बसलेले १० मदतनीस चिटोरी उचलून पटापट नावे पुकारत आहेत आणि उभे गंधर्व पटापट नावांच्या फायली शोधून पान उघडून त्यांच्या हातात देत आहेत. मदतनीस फायलीत पक्क्या नोंदी करत आहेत. तितक्यात उर्वशी पैंजण वाजवत चित्रगुप्ताच्या टेबलाशी येते. म्हणते, 'साहेबांनी १९५० जन्म, भारत देश, नाव xxx ची फाईल घेऊन बोलावलं आहे.' चित्रगुप्त थकून उठतो आणि फायली शोधायला लागतो. आजचा दिवस ईतिहासातल्या काही दिवसांसारखाच खूप कामाचा..२६ डिसेंबर २००४. पहाटे पहाटे त्सुनामीच्या कामावर पाठवलेला यम अद्याप परतलाच नव्हता. (''आता हा परतल्यावर रजा आणि पगारवाढ मागणार.'' चित्रगुप्ताने दूरदृष्टीने अंदाज केला.)त्याने खिडकीतून बाहेर पाहिले तर देवाच्या कचेरीच्या दारात हि ऽऽ मोठी रांग. 'तरी हिरोशिमाच्या वेळेपेक्षा जरा कमी वर्कलोड आहे.' आशावादी विचार करुन चित्रगुप्ताने साहेबांच्या खोलीवर टकटक केले.


परमेश्वर साहेब पण आज खूपच थकले होते. आजचे मृत्यू भरुन काढण्यासाठी आता जन्मांचं प्रमाण वाढणार..परत नव्या फायली. मृत्यू पावलेल्यांच्या पुनर्जन्माचा निर्णय घ्यायचा होता. त्यासाठी परत ती अजस्त्र ८४ लक्ष योनींची यादी पहावी लागणार होती.. एकंदरीत आशिया आणि आफ्रिका खंडात जन्म आणि मृत्यूची कामं हल्ली जास्त निघत होती.   मागेच यम येऊन कैफियत मांडून गेला होता, 'साहेब इतक्या वर्षाचा माझा अनुभव, पण महायुध्दांनंतर एकदाही मला युरोप आणि यु.एस. ऑनसाइटची संधी मिळाली नाहीये. तिथे माझ्या हाताखालच्यांनाच पाठवता नेहमी.' म्हणून यंदाच त्याला अमेरिकेत पाठवला होता २००१ साली. काल मेनका पण म्हणत होती, 'हल्ली कामात राम नाही राहिला साहेब. कलियुग आल्यापासून तपश्चर्या भंग करणं नाही, कि रुपं घेऊन पृथ्वीवर जाणं नाही. इथे बसून स्टेनोची कामं करुन आणि नाचून कंटाळा आला. चांगलं वर्क प्रोफाईल नाही मिळालं तर मी राजीनामा देऊन सिनेमात जाऊन चार पैसे आणि लोकप्रियता तरी मिळवेन म्हणतेय.' 


परमेश्वर साहेबांनी सुस्कारा सोडला आणि म्हणाले, 'या लोकांना कितीही सोयी दिल्या तरी समाधान होत नाही. तिथे नरकात दूतांना किती कमी पगार मिळतो. कामाच्या जागी कायम आग.नरकातलं वातावरण सुधारुन नरकाचं नरकपण नष्ट होईल म्हणून सैतान साहेब पण ए‌. सी. कचेरीत बसत नाहीत.. या लोकांना एकदा तिथे पाठवलं पाहिजे..


पृथ्वीवरुन आलेल्या पोस्ट्गंधर्वाने टेबलावर नवसांचे गठ्ठे आणून ठेवले. प्रत्येक गठ्ठ्यावर देवळाचे नाव होते. आता परमेश्वर साहेबांचे दिवसातले सर्वात कठीण काम होतेः सर्व विनंत्या ऐकणे, अर्जदाराची पापपुण्य चोपडी चाळणे , विनंती मंजूर/नामंजूर ते ठरवणे आणि खाजगी वहीत उद्याच्या कामांची नोंद करणे. त्यात पण परस्परविरुध्द विनंत्यांची संख्या जास्त. काही ठिकाणी जीवनाला वैतागलेले वृद्ध 'देवा मला ने' म्हणत होते, तर त्यांचीच मुलं 'देवा त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळू दे.' अशी कळवळून प्रार्थना करत होते. कुठे 'देवा थोडी पैशाची अडचण सोडव' म्हणणाऱ्याच्या घरी सटवीच्या ललाटलेखाच्या अनुसार चोरी घडवून आणायची होती.. किती जणांना खूष ठेवणार? आणि सर्वांना एकदम खूष कसे ठेवणार? हे पृथ्वीवरचे लोक पण चांगले झाले कि 'माझ्या कष्टांना फळ मिळाले' म्हणणार, वाईट झाले कि 'देवाच्या दरबारी न्याय नाही' म्हणणार.. परमेश्वरसाहेबांनी खुर्चीतल्या खुर्चीत तण्णावून आलस दिला आणि म्हणाले ,'देवा पांडुरंगा, सोडव रे बाबा!!' आणि जीभ चावून परत काम करते झाले..
(लेख निखळ करमणूक म्हणून आहे. देवाबद्दल असे लिहून कोणाच्याही धार्मिक भावना इ. दुखावण्याचा हेतू नाही.)