परमेश्वर साहेबांचा दिवस

परमेश्वर साहेबांची कचेरी या लेखावरुन प्रेरणा घेऊन एका रसिक व उत्साही मनोगतीने लिहीलेला हा  दुसरा भाग. खरं म्हटलं तर यातल्या बऱ्याच गोष्टी भाग १ मधेच लिहायला मला जास्त आवडल्या असत्या, पण 'फेरफार करा' ची परवानगी नाही व लेख मोठा होऊन डोळ्यांना व संगणकाच्या सरककळीला (स्क्रॉलबार बरं का!) कष्ट होऊ नयेत म्हणून हा लेखप्रपंच!!  


परमेश्वर साहेब खुर्चीवर बसून एका हाताने कल्पवृक्षाचे फळाचे बकाणे भरत होते, दुसऱ्या हाताने 'उद्या पूर्ण करायच्या भक्तांच्या मागण्या' च्या लांबलचक यादीत भराभर नोंदी करत होते. समोर ठेवलेल्या संगणकाच्या पडद्यावर वेगवेगळ्या देशात लावलेले छायाचित्रक बघत होते.. 'कामं संपतच नाहीयेत.' परमेश्वर साहेब वैतागून पुटपुटले. त्यांनी वर हाताशी टांगलेली घंटा वाजवून शिपाईगंधर्वाला बोलावले. 'हे बघ, मी थोडा वेळ आराम करतो आहे. चित्रगुप्ताला सांग जरा लक्ष ठेवायला. त्याला म्हणावं त्याच्या जागी एक कारकूनगंधर्व बसवून इथेच ये.' साहेबांनी शिपाईगंधर्व गेल्यावर पाय ताणले आणि सिंहासनासमोरच्या मेजावर ठेवले आणि मान सिंहासनाच्या पाठीला टेकून जरा विसावणार तोच....


'साहेब चित्रगुप्त साहेब जागेवर नाहीत. आज पृथ्वीवर भारतात निवडणूका असल्याने पापपुण्याचं काम जास्त पडलं. चित्रगुप्त साहेब धन्वंतरीकडे गेले आहेत डोळे तपासून घ्यायला. आणि ३-४ दिवसाची रजा घेणार आहेत असं कारकून गंधर्व म्हणत होते.' परमेश्वर साहेब खुर्चीत स्प्रिंग असल्याप्रमाणे तीन ताड उडाले. 'काय? ३-४ दिवसांची सुट्टी? आणि मी तोपर्यंत सर्व लोकांना असंच थेट स्वर्गात घेऊ का सर्वांना न बघता नरकात पाठवू?भक्त मंडळाने अविश्वासाचा ठराव आणला तर कारखाना बंद करुन मला आणि तुम्हाला सगळ्यांना रामानंद सागरच्या मालिकेत कामं करावी लागतील.' परमेश्वर साहेब किंचाळले. देवा रे.. आता विसरा आराम नाहीतर द्या कारखान्याला पूर्ण विराम..परमेश्वर साहेब परत ताठ बसले.


परमेश्वर साहेबांचे कामात लक्ष लागेना.... भक्तांच्या जोरदार मागण्या असणारा आषाढ तोंडावर आला होता त्यापाठोपाठ येणारा श्रावण- मग गणपतीला भाद्रपदात काही दिवसांसाठी वर्ल्डवाइड ऑनसाईट टूर वर पाठवायचे -मग देवीचा उत्सव हा सणांचा काळ आला की इथे परमेश्वर साहेबांना जास्त वेळ थांबून काम करावे लागणार होते. ऑनसाईट जाणाऱ्या प्रत्येक खात्याचे काम बाकी मंडळी वाटून घेणार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना.. 

लांबून नारद येतांना दिसताच त्यांनी हातातल्या फाईलीत गर्क असल्याचा बहाणा केला. त्याची आजकाल भुणभुण सूरू झालेली होती. सारख्या वर खाली चकरा मारून मारून पाय व 'नारायण-नारायण' चा जप करून करून तोंड दुखायला लागल्याची तक्रार तो करत होता.


'मला महिनाभराची रजा हवी' आल्या आल्या सुरू झाला -
'अरे आज माझा जप नाही ?'
'कंटाळलोय तीच रेकॉर्ड वाजवून वाजवून. काही नविन चकती लावायची म्हटले की आपण म्हणता "असें कसें चालेल ? नारदाने नारायण नारायणच म्हटले पाहिजे. अरे हो, काल परमेश्वरी वहीनी भेटल्या होत्या. बरोबर तुमच्या सासूबाई होत्या. दोघींचं बरंच तावातावाने बोलणं चालू होतं. मी आल्यावर गप्प झाल्या. बहुतेक तुमच्याबद्दल बोलत असतील. मी विचारलं नाही बुवा."


फायलीत डोंकं खुपसून बसलेल्या परमेश्वर साहेबांनी डोकं वर करुन कौतुकाने नारदाकडे पाहिलं. कामाला कितीही वैतागला तरी आपलं भांडणं लावायचं काम नारद नेहमीच चोखपणे करत असे. 'आज कारखान्याला अशाच कष्टाळू लोकांची गरज आहे.' विचारात चष्म्याच्या वरून नारदाकडे बघत बघत त्यांनी मान डोलावली....

नारदाचे पुराण पुढे चालू झाले...'मी वैतागलोय सारखी भांडणे लावून- माझ्या अर्जाचे काय झाले ?'
नारद जाम पेटूनच आलेला दिसत होता.
'बघतो काय करता येते ते' परमेश्वर साहेब चष्म्याची काडी तोंडात घालून तोंडातल्या तोंडात पुटपुटले....
"कसला अर्ज हो मुनीवर" सुमधूर आवाज किणकिणला अन दोघांचे लक्ष गेले ते सरस्वती मॅडम वर.  
'शाळा सुरू झालेल्या दिसत आहेत' नारद उवाच
'हो आणी निकालही यायला सुरूवात झाली ना, कांम वाढतय म्हटलं साहेबांना मदतीसाठी कुणी द्या म्हणून विचारते - पण तुम्ही कुठला अर्ज केलात ?'
'मला एक टोळी बनवायची आहे'
'कसली?' सरस्वतीने भुवया उंचावल्या.
'माझ्या सारखी अजून ८/१० पात्रं तयार करा म्हणतोय मी कधीचा - नाहितर काम बदलून द्या असा अर्ज केला आहे'
नारदाला पटवायची रोजची युक्ती आज कामी येणार नाही हे आतापर्यंत परमेश्वर साहेबांच्या चांगलेच लक्षात आलेले होते. ते विचार करित असतांनाच सरस्वतीने त्यांची सुटका केली.
'गजानन साहेबांना सांगा एक अहवाल बनवून द्यायला- त्यांची मास्टरी आहे अश्या कामांत'
'हो मी लगेच तो पुढे बोर्डाच्या मिटींग मध्ये घेतो' परमेश्वर साहेबांना सुटकेची चिन्हे दिसू लागली.
'त्यात कसला अहवाल द्यायचा ?' नारद कावत म्हणाला.
'अहो नविन पात्रं बनवायची तर त्यांना कामे काय द्यायची,रिजन कसे कसे द्यायचे,प्रवास भत्ता, सगळे विचार करावे लागतील ना ?' परमेश्वर साहेबांचे डोकं सुसाट धावायला लागले. 
'बरयं मग तुम्ही मला लवकरात लवकर अहवाल आणून द्या व मगच सुट्टीचे बघू' परमेश्वर साहेबांनी अंगावर आलेलं काम तात्पुरतं ढकललं.  
मान डोलवीत व तोंडाने 'नारायण नारायण' चा जप करत जाणाया नारदाकडे पाहून 'आता गजाननाला पटवावे लागेल - ह्याचा अहवाल भाद्रपदानंतरच ह्याच्या हातात दे म्हणून' असा मनोमन विचार करित परमेश्वर साहेबांनी परत फाईलीत डोकं खुपसलं. 
'अहो मी उभी आहे इथे'
'अरे सॉरी-सॉरी बस ना'
'नाही बसायला नाही आले मी, कुणाकुणाला परिक्षेत पास/नापास करायचे ती यादी मी दिली आहे एकदा नजरेखालून घाला व सह्या करून पुढे पाठवा.'
'तू पाहिले आहेत ना दोनदा? मग जाउ द्या पुढे ते तसेच...कुठवर मी प्रत्येक बाबतीत लक्ष घालणार ?'
बरं म्हणत सरस्वती जायला वळते तोच साहेबांचा भ्रमणदूरध्वनी वाजला म्हणून ती रेंगाळली. साहेबांनी संगणकाच्या पडद्याकडे बघत डोळे मिटले.... साहेब फोन घेत नाहीत म्हणजे आपल्या जाण्याची वाट पहात आहेत हे तीच्या लक्षात आल्यावर ती गेली व साहेबांनी फोन कानाला लावला  हॅलो बोलायच्या आतच पलिकडचा आवाज बोलला 'केव्हाचा फोन वाजतोय, काय करित होतात ?'
कावऱ्या बावऱ्या झालेल्या साहेबांनी आसपास कुणी नसल्याची खात्री करून बोलायला सुरूवात केली-
'काही नाही गं, जरा नारदाला पटवत होतो. हं बोल -'
'बोल काय ? अजून इथेच? मला वाटलं तुम्ही वाटेवर तरी असाल. किती वाजता येताय घरी ?'
'आलोच. हे बघ, आता मला नक्की सांगता नाही येत कितीला येईन ते. असं कर, तू फोन ठेव, मी १ तासाने तुला फोन करुन नक्की सांगतो कितीला यायला जमेल ते.'
'ही काय पद्धत झाली वेळ सांगायची- आठ पर्यंत मुकाट्याने घरी या आणि जेवायला थांबतोय आम्ही सगळे तेव्हा आता निघाच नाहीतर मी जेवण शिल्लक ठेवणार नाहीये. ही काय रोजची नाटकं?'
परमेश्वर साहेब :'हो गं बाई, निघतो १० मिनीटात.'
'मांडीसंगणक आणि कामाच्या फायली घरी आणू नका'
'बरं'
'घरातलं अमृत संपलं आहे. येताना ५ लिटरचा कॅन आणा आणि १ किलो चांगली कल्पवृक्षाची फळं. बघून आणा. मागच्यावेळ सारखी निबर नको.'
'हं'
'येता येता आधी धन्वंतरीकडे चक्कर टाकून माझं औषध घेऊन या. तिकडे आधी जा नाहीतर ते बंद होईल.'
'होय बाईसाहेब.'
'हे काय नुसते हो,बरं, हं चाललंय?मी काय गोष्ट सांगते आहे का?'
'हं' : परमेश्वर साहेब 'नाही म्हणजे हो, मी करतोच ते सगळं येतांना'
इतका मोठा विश्वाचा कारखाना चालवायचे, पण परमेश्वरी बाईंच्या सरबत्तीपुढे साहेब नेहमीच गारद व्हायचे.


तसे साहेब अष्टावधानी होते व त्यांचे बारीक लक्ष सगळीकडे होते पण कामाचा व्याप वाढल्याने कचेरीतले काम त्यांना घरी न्यांवे लागयचे. घरी सतत भ्रमणदूरध्वनीही खणखणत असायचा.रात्रपाळीवाल्यांना सूचना भ्रमणदूरध्वनीवरूनच चालायच्या पण त्यामुळे परमेश्वरी बाई वैतागायच्या. 'कानाला सतत ते यंत्र व डोळ्यापुढे ती फाईल ह्या शिवाय आहे काय तुमच्या आयुष्यात ?' अशी तीची नेहमीची तक्रार आज तिला करायला द्यायची नाही ह्या विचारात असतांनाच वरूण महाराज आले.... 'अरे देवा- ह्याचे काम राहिलेच !' हा विचार साहेबांच्या मनात पटकन आला.... कुठे किती पाऊस द्यायचा हे साहेब ठरवणार व त्याने पाडायचा हा रिवाज होता.आधीच यंदा उशीर झालेला व त्यात हे महाशय लेखी ठिकाण आणि पावसाचे मिलीमीटर याचा व्यवस्थित तक्ता दिल्याशिवाय ऐकायचे नाहीत हे साहेबांना माहित होते व नेमके तेच तयार नव्हते. 'तु उद्या सकाळी ये' 'बरं' म्हणून वरूण महाराज गेले खरे पण जाता जाता सर्व समुद्र आणि त्यातले पाणी आणि शक्य कमाल पावसाचे मिलीमीटर यांची यादी देऊन गेले म्हणजे आजही घरी काम न्यावे लागणार तर..


'इतका विश्वाचा कारखाना उभा केला तेव्हा एक पर्यायी परमेश्वर साहेब का नाही बनवला?'विचार करत साहेबांनी मांडीसंगणकाची ची पिशवी व फायली उचलून चित्रगुप्ताला 'मी जातो रे' म्हणत चालायला सुरूवात केली.