माझा बस प्रवास

आज अनेक असा बाका प्रसंग माझ्यावर उद्भवला...

गाडी सर्व्हिसिंगला दिली होती, सायकल मित्र-मंडळींपैकी एक जण घेऊन गेला तो अजूनपर्यंत आणून देतो म्हणतोय... आणि रिक्षावाल्यांनी आज अचानक एक दिवस बंद पुकारला आहे... अरे काय हे... आम्ही गाड्या सर्विसिंगला दिल्यावरच बरे ह्यांना संप/बंद सुचतात... (* बिप.. * बिप..)!

तर, आज मला बस प्रवास करावा लागणार हे समजल्यावर आधी मी ग्लासभर पाणी प्यायलो... (मानसिक) धाप ओसरल्यावर मग विचार करू लागलो की बस ने जायचे कसे ? डायरेक्ट जायला बस नाही.. त्यामुळे काही ना काही गडबड करावी लागणार... ! बस बदलणे वगैरे प्रकार अतीव चिडचिड आणणारा असतो... ( इथे एक बस पकडून पकतो... त्यात अजून एक ... अरे देवा !! )

सुटसुटीत कपडे घालून बस स्टॉप वर आलो.. कारण एक'च की कितीही इस्त्रीचा किंवा रिंकल फ्री शर्ट पँट घातली तरी बस-प्रवासात त्याचा निकाल लागतो.. !   बस स्टॉप वर अनेक रंगाची आणि ढंगाची माणसे उभी होती.. मी देखील त्यातलाच एक झालो...

कचाकच ब्रेक मारत ती बस आली, नेहमीप्रमाणे बस थांब्यापासून सुमारे १०० मिटर पुढेच जाऊन ब्रेक लागले... !! आता ह्या ड्रायव्हरला ब्रेक आधी दाबायचा कंटाळा येतो का डेपोमधून टाईट केलेले ब्रेक बस थांब्यापर्यंत येईपर्यंत लुझ होतात हे मला न सुटणारे कोडे आहे... पळत जाऊन आत चढावे लागले.. कंडक्टर ने बेल मारली आणि ती अप्सरा निघाली... (नटरंग ची जाहिरात होती बाहेर बस वर)

कंडक्टर चे मला शाळेपासून वाकडे होते.....मोठा उर्मट माणूस असतो हा..... ह्या पेशाबाबत एक जुना विनोद कायम सांगितला जातो की माझा नवरा/भाऊ/मित्र खूप श्रीमंत आहे रोज पैशाची बॅग घेऊन फिरत असतो.. किंवा देव प्रसन्न झाल्यावर मुलगा म्हणतो मला एक मोठी गाडी आणि पैशानं भरलेली बॅग दे आणि मग देव त्याला कंडक्टर बनवतो.. इ. इ. असो,

कंडक्टर चे ते कळकट कपडे, अर्धवट उघडी दोन बटणे.. (अशोक सराफ चा तेवढाच एक गुण बरा हे लोक घेतात), अत्यंत त्रासिक चेहरा, कायम चालू असलेली "सुट्टे पैसे द्या" ही रेकॉर्ड आणि पुढे चला.. पुढे चला.. दामटण्याचा आग्रह... !! गर्दी असो वा नसो... हे यांत्रिकतेने चालूच असते की काय असा प्रश्न पडतो.. !!

माझे तिकिट ७ रुपये होते... १० रुपये दिल्यावर.. "२ सुट्टे द्या"... म्हणत तो थांबला देखील नाही...सरळ पुढे निघून गेला.. अरे ?? ह्याला काय अर्थ आहे ? बरं माणसं पण खूप नव्हती, १०-१५ लोक असावेत... तो पुढे पुढे जात पहिल्या सिट वर निवांत झाला आणि मी त्याच्या मागोमाग दुसऱ्या सिट वर टेकलो.. अहो सुट्टे नाहीत... असे म्हणताच सरळ त्याने ३ रुपयांचे एक्स्ट्रा तिकिट दिले.. माझे टाळकेच फिरले...
मी म्हणालो.. "ते दहा रुपये परत द्या... मी उतरतो.. !! डेपोतून आत्ता निघालाय तुम्ही सुट्टे ३ रुपये नाहीत ? काय नोकरी आहे की चेष्टा ? तो चांभार सुद्धा रोज १०० रुपये सुट्टे घेतल्याशिवाय दुकान उघडत नाही...मूर्खांचा बाजार आहे सगळा.. !"
कंडक्टरः - हे बघा सुट्टे नाही तर उतरा... उगीच शिव्या देऊ नका...
मीः उतरतोच आहे मी... गाढवांसोबत प्रवासाची इच्छा नाही माझी....!! (त्याचे नाव लिहून घेतले आणि दहा रुपये परत घेऊन मी उतरलो.. आता उद्या डेपो मध्ये जाऊन राडा(शाब्दिक) घालायचा विचार आहे..! )

एक फायदा झाला ह्या तडफडीत मी नळस्टॉप पर्यंत आलो.. (२ स्टॉप पुढे) आता इथून कोणतीही बस पटकन मिळते.. (जंक्षन आहे ना)
पण हा आनंद फार काळ टिकला नाही... एसं.एन.डि.टि. ची गर्दी पाहून पुन्हा सुटसुटीत कपड्यांना धन्यवाद म्हणून मी गर्दीत सामील झालो... तिथे जाण्यापूर्वी पान टपरीवरून एक मसाला पान घेतले म्हणजे ४ रुपये आपोआप सुट्टे मिळाले... अर्थात दुसऱ्या बस चा कंडक्टर देखील असेच वागेल हे अपेक्षित नव्हते पण... ह्याचं तिकिटावर हाच खेळ(म्हणजे बीना-तिकिटाचा...) मला परवडणार नाही.... फक्त माझा वेळ वाचावा म्हणून आणि मगाशी झालेल्या बाचाबाचीने गेलेली तोंडाची चव परत आणायला ते पान खाल्ले आणि वाट पाहू लागलो.. !!

नवीन बस आली ती चिकार भरलेली होती.. कसाबसा आत घुसलो.. माझा त्यातल्या त्यात जवळचा स्टॉप येईस्तोवर कंडक्टर ला जागा आणि उसंत दोन्ही मिळत नव्हती... मग मीच कसाबसा त्याच्यापर्यंत पोचलो... सुट्टे पैसे त्याच्या हाती ठेवले आणि तिकिट घेतले.. हा कंडक्टर जरा बरा वाटला... कदाचित नवीन रुजू झाला असेल किंवा अजून कॉंट्रँक्ट बेसिस वर असेल.  ! म्हणून की काय... तिकिट दिल्यावर मी त्याला थँक्यू पण म्हणालो... !! पण पुढच्याच क्षणी मी उतरताना २ टारगट मुले पुढच्या दरवाज्याने आत चढत होती त्यांच्यावर हा कंडक्टर असा काही खेकसला... की मुले तर घाबरून उतरलीच पण मी सुद्धा खाली जाताजाता एक पायरी वर चढलो..  ! एक समजले... कंडक्टर कोणताही कसाही असो.. . त्याची वर्दी आणि आजूबाजुची गर्दी ह्यामध्ये काहीतरी विशेष बाब आहे जी त्यांना भयंकर तुसडे, अलिप्त आणि वैतागलेले भाव आणि हावभाव करण्यास भाग पाडते... पुण्यात २ व्हिलर आणि ४ व्हिलर का वाढले ह्याचे कारण, भंगार ट्रान्स्पोर्ट सर्विस आणि हे असले बैल लोक !! (सॉरी बैलाचा अपमान आहे... ) हे असले चक्रम लोक !!

मी उतरलो... माझा प्रवास संपला, तरी बाकी रोजच्या रोज बस ने जाणाऱ्या हजारो लोकांच्या त्रासाची कल्पना मला आली होती... उद्या माझ्याकडे गाडी असेलच... पण मी एक मनाशी नक्की ठरवले... की ह्यापुढे बस स्टॉप वर थांबून कोणीही जरी लिफ्ट मागितली.. तरी जमेल तेव्हा त्याला लिफ्ट द्यायची... !! किमान एका माणसाला ह्या त्रासातून तेवढ्यापुरते मुक्त केल्याचे पुण्य तरी लाभेल...

--
आशुतोष दीक्षित.