स्वप्नातलं भविष्य......(. भाग १ )

सकाळचे अकरा वाजत होते. उघड्या दरवाजावर जोरजोरात कुणीतरी थाप मारीत होते. रेखा, नैनाला लहानशा बाऊल मधून चहात बुडवलेला पाव खायला घाळीत होती. दारावरच्या थापा चालूच होत्या. म्हणून तिने पार्टिशनच्या बाहेर आपले डोके तिरके करून पाहिले. तर काय ? घरमालक शितोळे दरवाजा वाजवीत होते. डोक्यावर पांढरी टोपी , अंगात जुन्या पद्धतीचा सदरा आणि धोतर असा त्यांचा पेहराव होता. रेखा, हातातला बाऊल बाजूला ठेवून पदराला हात पुशीत , शक्यतोवर आवाजात मार्दव आणीत म्हणाली, " काय झालं काका ? " असं विचारल्यावर शितोळ्यांचा पारा अधिकच चढला. आधीच लाल गोरा असलेला म्हातारा, रागाने पिवळा होत म्हणाला, "काय झालं ?.... मसणात गेला तुझा काका. अगं , काही शरम वगैरे काही आहे की नाही ? सहा महिने झाले. भाड्याची एक कपर्दिकही दिली नाहीस आणि विचारतेस काय झालं.?.... आं ?..... तुला काय वाटलं.? हा शितोळे जगाच्या अंतापर्यंत वाट पाहील? आं ?...... का गं ? बोल ना. "रेखाने मान खाली घातली. काकांची बडबड चालूच होती. पाव खाऊन झालेली दोन वर्षांची नैना अंगातल्या बुजरट फ्रॉकला हात पुशीत आई जवळ येऊन उभी राहिली.

"आत्ताच्या आत्ता मला मला भाड्याचे तीनशे रुपये तरी पाहिजेत.. आहेत का ? नाही तर , हो बाहेर , त्या पोरीला घेऊन . केवळ भावे अण्णाकडे पाहून मी इतके दिवस गप्प बसलो. तुला, काय वाटलं? मी काय विधवा आश्रम उघडलाय ?. नवरा गेला म्हणून मी काही बोललो नाही. , चल , चल बाहेर हो त्या पोरीला घेऊन. " शितोळे परत परत तेच तेच बडबडत होते. बाई माणूस म्हणून त्यांना तिला शिव्याही देता येत नव्हत्या. त्यांचा राग तिला समजत होता. अविनाश असतांना म्हातारा अगदी चहा वगैरे घेऊन जायचा. पण तेव्हा कधी भाडं थकलं नव्हतं. माणसं एकदम कशी सगळं विसरतात ? तिच्या मनात आलं. घाबरून नैना आईला बिलगली. रेखा म्हणाली, " काका, दोन दिवसात अण्णा येतील . मी त्यांना सांगून करते पैशाची व्यवस्था. " कपाळावर आलेला घाम पुशीत ती अजिजीने म्हणाली. पण शितोळे कसला ऐकतोय ? त्याला चेव आला. " ते काही नाही. त्या पोरीला घे आणि बाहेर हो. ... हो बाहेर. चाळीत माझा कायदा चालतो. काय समजलीस ."दाराबाहेर बघ्यांची गर्दी जमली. पण कोणी मध्ये पडलं नाही. चाळ रस्त्यावरच होती. रेखाने पाहिलं आज काही खरं नाही. म्हणून तिने वळून कपाटातले कपडे काढण्यास सुरुवात केली. तशी म्हातारा तिरसटासारखा पुढे होत ओरडला, " ए, सामानाला अजिबात हात लावायचा नाही. भाड्याच्या बदल्यात मी ते ठेवून घेणार आहे. चल , नीघ इथून . "त्यांनी रेखाला हातानी धरूनच बाहेर काढायचे बाकी होते. हातातले कपडे दीनवाणेपणाने खाली टाकून नैनाचा हात धरून घरातून रस्त्यावर आली. शितोळेने ताबडतोब खोलीला कुलूप घातले. न जाणो ती परत आत आली तर ? खिशात किल्ली टाकून तो निघून गेला. चाळ बैठीच होती. शेजारच्या अण्णांच्या दाराला कुलूप होतं.

रस्त्यावर बसलेले दोन्ही महारोगी पण पाहात होते. त्यातला एकजण दुसऱ्याला म्हणाला, " च्या मायला काय थेरडा आहे. बाई माणसाला घरातून भायेर काडतोय. बघवत न्हाई गड्या. कुठं जाईल ती ? " दुसरा म्हणाला, " आपण काय करणार बाबा. आपणच भीक मागतोय. काय करणार तिच्या साठी . " पाणावलेल्या डोळ्यांनी ते हताशपणे बसून राहिले. मग त्यातल्या एकाने मिळालेली भीक मोजली. म्हणाला," जेमतेम आठ रुपये जमलेत, कर्मदरिद्री आपण . आठ रुपयात काय होतय ?. नाहितर त्या म्हाताऱ्याच्या तोंडावर पैशे फेकले असते" गेल्या सात आठ महिन्यांपासून ते दोघे त्याच रस्त्याच्या कडेला राहायचे. अविनाशच्या जाण्यापासून, रेखाच्या आयुष्यातल्या सगळ्याच घटनांचे ते साक्षिदार होते.

बाहेर ऊन रणरणत होते. र्रेखा नैनाला घेऊन बाहेर आली. डोक्यावरचं छप्पर तर सहा महिन्यांपूर्वीच उडालं होतं. अविनाश गेला आणि सर्वच दिशा अंधारल्या. जे काही थोडंफार सेव्हिंग होतं ते देणी भागवण्यात आणि खाण्या पिण्यात गेले होते. मध्ये अधे काही ठिकाणी कामं करून जे काही मिळत होतं. ते रोजच्या खर्चाला लागत होतं. हातात काहीच उरत नव्हतं. अविनाश एका लहानशा कारखान्यात पॅकर म्हणून कामाला होता. जेमतेम त्यांचा महिना जायचा. तीन वर्षांपूर्वी लग्न झालं. वर्षाच्या आत नैना झाली. दोघेही खूष होते. पण मुलीचं कोड कौतुक करायला पैसा कुठे होता . त्यातही ते समाधानी होते. अविनाशही जास्त पैसे देणारी नोकरी शोधण्याच्या मागे होता. पण चांगल्या नोकऱ्या अशा वाटेवर थोड्याच पडल्या होत्या.. पण दैवाला आपला जोर दाखवायला अशीच माणसं लागतात

(क्र म शः )