स्वप्नातलं भविष्य........ (भाग ४)

आपल्याला मामांनी पकडल्यासारखे तिला वाटू लागले. मग त्यांच्या तोंडून शब्द आले , " रेखा , अगं वेळ जात नाही म्हणून घराची झडती घ्यायला निघालीस की काय ? " तिला तो आवाज खोलीच्या ऐवजी गुहेच्या तोंडाक्डून आल्या सारखा वाटला. मामा आत आले, आणि खोलीचा दुसरा दरवाजा बंद करून त्यांनी तिचा हात घट्ट धरून तिला खोली बाहेर आणले. मग ते थोड्या जरवेनं म्हणाले, " जा, तोंड धुऊन घे आणि चहा टाक. " तिने हात सोडवून घेत त्यांच्या चेहऱ्या कडे पाहिले. त्यांचे डोळे कसल्यातरी विक्षिप्त लालसेने लकाकल्यासारखे दिसले. ती धावतच विहिरीवर तोंड धुवायला गेली. तिला अगदी चोरट्यासारके झाले. ती रात्र मामाही काही बोलले नाही आणी तीही. त्यांची नजर चुकवीत तिने सर्व कामे यंत्रवत केली. तिची नजर अजूनही त्या खोलीकडे जात होती. तरीही त्यांनी त्या खोलीला कुलुप लावले नव्हते. तो भिंतितला जिना नक्की कुठे जात होता, काय माहीत ? पहिल्या खोलीत जी खिडकी पाहीली तोही जिनाच होता की काय ? उरलेल्या दोन्ही खोल्यांमध्ये असेच जिने असावेत. या सर्व खोल्या आतील जिन्यानी एकमेकींना जोडल्या होत्या कि काय ? म्हणजे कुलुपं केवळ एक देखावा होता. नंतरचे एक दोन दिवस पुन्हा सगळे सुरळीत चालू झाले.

एक दिवस रात्री तिला अचानक कोणाच्या तरी पाय घाशीत चालण्याच्या आवाजाने जाग आली. तिने घाबरून आजूबाजूला पाहिलं. आता महिनाभर ती इथे होती. पण असा आवाज ती प्रथमच ऐकत होती. मग तिने उठून मामांच्या खोलीत डोकवून पाहिले. त्यांच्या घोरण्याचा तेवढा आवाज येत होता. ती पाणी पिऊन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण ते कठीण होतं. थोड्या वेळाने तोच आवाज वरच्या तक्तपोशीतून येत होता. म्हणजे नक्कीच वरच्या खोली तून येत होता. तिथे मामा तर नव्हते. मग ..... कोण होतं ? वरच्या सर्व खोल्यांना तर कुलपं होती. भलताच भास होतोय असा विचार करून तिने झोपण्याचा प्रयत्न केला. पहाटे केव्हातरी तिला झोप लागली. ती रोजच्यापेक्षा जरा उशिराच उठली. तिने सकाळची सगळीच कामं मरगळलेल्या मनस्थितीत केली. ती दिवाणखान्यात डोकावली. मामा कागदपत्र पाहात होते. मध्येच ते आत आले आणि म्हणाले, " रेखा ,माझा भाचा , सुहास थोड्याच दिवसात येतोय. कधी ते काही कळवलं नाही . तो पोस्टात फोन करून सांगेल. जरा आवराआवर करून ठेव. काही किराणा आणायचा असेल तर सांग. "तिने हो म्हंटलं. ती त्यांच्यापुढे जायला घाबरत होती. मागच्या प्रसंगा बद्दल काही बोलले तर ? पण ते काही बोलले नाही. तिने नैनाकडे पाहिलं. तिला शाळेत घालायला हवं. आपणही काम शोधावं. घरी बसून आपण करणार तरी काय ? ग्रामिण बँकेत तिचं खातं होतं. पण ते बंद झालं होतं. मग ती नैनाच्या शाळेबद्दल आणि आपल्या कामाबद्दल मामांशी बोलली. त्यावर मामा म्हणाले, " नैनाला शाळेत घालायला हवं हे खरं , पण तू काही काम करावस असं मला वाटत नाही. तुला इथे काय कमी आहे ? आपल्याला पुरतील एवढे पैसे मिळतायत. " थोडक्यात तिने आपल्यावर अवलंबून राहावं. नेमकं तिला तेच नको होतं. लवकरच तिने पाटी पेन्सील विकत आणली आणि नैनाला शिकवू लागली. दिवस जात होते. नैना शिकत होती. रेखालाही समाधान वाटत होतं.

एका रात्री तिला बरेच वर्षांनंतर तिचं परिचित पण भयंकर स्वप्न पडलं. स्वप्नात ती लहान होती. पिवळ्या रंगाचा शेंदरी डिझाईन असलेला फ्रॉक तिने अंगात घातला होता. केसांच्या दोन वेण्या तिच्या खांद्यांवर लटकत होत्या. त्यातलीएक वेणी पांढऱ्या केसांची आणि दुसरी काळ्या केसांची होती. वय सात आठ वर्षांचं असावं . स्वप्नात वय काय आणि रूप काय , काहीच अर्थ नव्हता. ती अशीच वैराण ठिकाणी फिरत होती. ती तिथे कशी आली माहित नाही. एक मोठं माळरान होतं. त्यावर अधेवट हिरवं , अर्धवट सुकलेलं असं काँग्रेस गवताचं रान माजलेलं होतं. तिथे बऱ्याच ठिकाणी लहान मोठी फुटकी थडगी होती. आणि त्यातून वड पिंपळ उगवलेले दिसत होते. तिला त्या बद्दल काहीच भावना झाल्या नाहीत. ती त्या माळरानावर अशीच चालत सुटली. स्वप्नात अंधुक उजेड होता. चालता चालता एका थडग्या सारख्या चौथऱ्याला पाय लागून ती धडपडली. उठताना मात्र तिने आवाज ऐकला. काहीतरी घसकटून बाहेर यायचा प्रयत्न करीत होतं. ठेचाळलेल्या थडग्याचा दगड थोडासा वर उचलला गेला होता. त्यातून दोन सुकलेले बांगड्या घातलेले हात तिला दिसले होते. ती स्त्री होती हे नक्की. ती विस्मयाने वाकून त्या थडग्या कडे पाहू लागली. दगड चांगलाच जड होता. फटीतून दिसणारे हात चांगलाच जोर लावित होते. आतून आवाज आला , " ए , कार्टे , .... बघतेस काय ?... ‌सरकव की दगड. " रेखाचा श्वास वरखाली झाला . तोंड उघडं पडलं. घसा सुकला आणि धपकन तिच्या छातीवर दगड कोसळल्यासारखं वाटून ती झोपेतून उठली . रेखा दिवाणखाना आणि स्वैपाक घर यांना जोडणाऱ्या खोलीत झोपत असे. दिवाणखान्याचा एक दरवाजा त्तिच्या खोलीत उघडत असे. तिने आजूबाजूला पाहिलं. ती बिछान्यावर आहे हे कळायला काही मिनिटं लागली. बाजूला कोणाचं थडगं तर नाही म्हणून तिने चोरून पाहिलं. पण तिथे नैना झोपली होती. मग अचानक तिला घाम सुटला. ती भानावर आली. जवळच ठेवलेल्या लोटीतून तिने घटाघट पाणी प्यायलं.

मग तिला आठवलं की हे स्वप्न सात आठ वर्षाची असल्यापासून ते अगदी चौदा वर्षांची होई पर्यंत तिला अस्वस्थ करीत असे. वर्ष सहा महिन्यातून एकदा तरी त्याची हजेरी असे. आत्या जवळ झोपली होती तरी ती अशी च घाबरून उठली होती. सगळं समजल्यावर आत्याने तिला नदी पलीकडे बसणाऱ्या कुठल्याशा मांत्रिकाकडे नेलं होतं. तेही तिला भयानकच वाटलं. नदीला पाणी फार नसायचं. त्यातून आत्याचा हात धरून चालत ती पली कडच्या किनाऱ्यावर गेली होती. तो बहुतेक शनिवार असावा. तिन्हीसांजेची वेळ होती. एका मोठया खडकावर जटा पिंजारून एक माणूस बसला होता. त्याचा वरचा भाग सगळा उघडा होता. त्याच्या गळ्यात कवड्यांच्या आणि हाडांच्या भरगच्च माळा होत्या. त्याचा चेहरा काळसर लालसर होता. कित्येक दिवसात त्याच्या अंगाला पाण्याचा स्पर्श झाला नसावा मोठ मोठे गारगोटीसारखे स्थिर डोळे कुठल्याशा नशेने लालसर झालेले होते. लालबुंद कुंकवाने त्याचे कपाळ बरबटले होते. ओठ आणि दात काळसर निळसर होते. तो हसला की एखादा पशू हसल्यासारखा वाटत होता. त्याच्या समोर शेकोटीवजा आग पेटलेली होती. आजूबाजूला चित्र विचित्र आकाराची भांडी आणि काही मानवी हाडं पडली होती. आत्याने त्याला नमस्कार केला व तिलाही करायला लावला होता. तिला तो मांत्रिक मुळीच आवडला नव्हता.ती अंग चोरून थोडी लांबच उभी होती. त्या दिवशी तिने हिरवट रंगाचा परकर पोलका घातला होता. आत्याने त्याला स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यासरशी त्याने कोणत्यातरी अगम्य भाषेत पुटपुटत कसले तरी दाणे आणि पूड समोरच्या आगीत फेकले होते. मग खूप मोठा जाळ झाला. ती तर घाबरूनच गेली. आत्या म्हणाली, " बाबा देखो ना, ये मेरी बेबी बडी तकलीफ मे है. आप कुछ करोगे तो उसको जीवनदान मिलेगा. ". बसलेल्या मांत्रिकाने आगीत तसाच हात घातला. एक दोन पेटती लाकडे बाजूला करून त्याने कसलीशी तार काढली. आणि करंगळी एवढी बाजूलाच पडलेली लाकडाची काळी बाहुली घेऊन तिच्या गळ्याला तार करकचून आवळली. मग एक लोखंडी ताईत घेऊन तो त्या तारेत घट्ट बांधला. मग तिन्ही वस्तू हातात धरून मोठ्याने , "ढं . ढं .. जिष्णोई, बिष्णोई.. ठं.. ठं चंडिका माई ओम फट.. फट ‌स्वाहा" म्हणून त्या तिन्ही वस्तू जरावेळ आग्नीत धरल्या आणि आत्याला रेखाचा परकर वर करायला सांगितला. मग त्याने त्या तिन्ही वस्तू एका पुरचुंडित बांधून तिच्या भोवती तीन वेळा उतरवीत तिच्या कमरेला घट्ट बांधल्या होत्या. आणि विचित्र आवाज काढीत हासून म्हणाला, " ये ताईत कभी नही निकालना बेटी. जब निकालोगी तभीसे मुसीबतमे पड जायेगी. " आत्याने त्याला थोडे पैसे आणलेला शिधा दिला. मग दोघी नमस्कार करून नदीतून चालत घरी आल्या. एक गोष्ट मात्र खरी होती, कमरेला बांधलेली पुरचुंडी जोपर्यंत तिथे होती तोपर्यंत मात्र तिला हे स्वप्न कधी पडले नाही.

लग्न झाल्यावर मात्र , कशावरही विश्वास न ठेवणाऱ्या अविनाशने तिला ते काढून फेकायला लावले होते. पण त्यामुळे म्हणा किंवा मांत्रिकाचे बोलणे अंतर्मनात गेल्यामुळे म्हणा हे स्वप्न आता तिला परत पडलं होतं. आता तो मांत्रिक भेटणं पण कठीण होतं. नंतरची रात्र तिने जागून काढली.......

सकाळ झाली. ती आळसातच उठली. तिचा आज मूड खराब होता. रात्रीच्या स्वप्नाने आलेली बेचैनी जायला तयार नव्हती. मग तिला एकदम "क्लिक झालं. आपण उघड्या खोलीच्या आतिल दरवाजातून पाहिलेले दृश्य असेचहोते. फक्त थडगी दिसली नव्हती. तो विचार करून ती शहारली. एकदा जाऊन पाहिलं पाहिजे. पण खरच थडग्यातली बाई दिसली तर ? तर ? ....... या विचाराने तिला हपापा लागला. तिचा ऊरात अचानक जडपणा आला. कशीतरी ति त्या भावनेतून बाहेर आली. मामांशीही ती आज फार बोलत नव्हती. सकाळचे साडेदहा बाजत होते. मामा अंघोळीला विहिरीवर गेला होता. दिवाणखाना वगैरे लावित होती. तेवढ्यात एक माणूस दरवाजाशी डोकावला. उन्हातल्या सावलीमुळे तिला ते जाणवलं. येणारा साधासा गावकरी होता. त्याच्या कमरेला गुडघ्यापर्यंत पोचणारं मळकट धोतर होतं. वरचा भाग उघडाच होता. खांद्यावर एक कांबळीसारखी चादर आणि डोक्याला धोतरासारखच कळकट रंगाचं मुंडासं होतं. हातात काठी होती. वय चाळीस एक असलं तरी परिस्थितीने त्याची चांगलीच दमछाक केली होती. तो थोडा वाकला होता. पायात वाहणा नव्हत्या. त्याने थोडे अधिक वाकून तिला नमस्कार केला आणि पायरी जवळच तो हातातली काठी उभी धरून उकिडवा बसला. ओ काहीच बोलला नाही. त्याला मामांना भेटायचं होतं. आत जाऊन रेखाने पाणी आणलं. पाण्याचा पेला त्याला देत म्हणाली, " घ्या काका, पाणी घ्या. " त्याने तो पेला तोंडाला लावून परत तिच्यापुढे डोकं टेकलं. तेवढयात आतल्या दारात मामा आले.

गुंडाळलेल्या ओलसर टॉवेलला जानवं करकचून पुसत ते पाहात राहिले. पाणी दिलेलं आवडलं नसावं. ती आत उभी राहून त्यांचं पुढचं बोलणं ऐकू लागली. ती गेलेली पाहून मामा म्हणाले, " काय रे खडपा , भडव्या, सकाळी सकाळी तुझं काय काम आहे रे ? पैशे आणलेस कां ? ... आं ? उगा वेळ घेऊ नको माझा. .. ̱गुमान जा बघू. " खडपा डोळ्यात पाणी आणून म्हणाला, " मामा , पोराला लई ताप हाय बगा. " तुच्छतेने मामा म्हणाले, " अरं मग तालुक्याला डाक्टर कडं जाण्याचं सोडून इथं कशाला आलास ?

खडपा अजिजीनं म्हणाला, " म्या ल्हान मानूस . डागदराकडं काय जानार ? आमचं डागदर तुमीच बगा. काल रात्रीपासून प्वोर निसता तापलाय बगा. मामा , मागं येक भांडं तुमच्याकडं ठेवलं व्हतं बगा. त्यातूनच औषध घीन म्हनतोय त्यो . लई खिजलाय बगा. आता काय करनार ? पोरवय हाय. वाईच त्ये भांडं त्येवडं येका दिसाला द्येता का ? पुन्यादा माघारी आनीन बगा. पोराची आन. ..... असं म्हणून कळवळून त्याने समोरच्या पायरीवर लोटांगण घातलं.

मामांना आठवलं. हातापाया पडून खडपानी पैशे घेतले होते . काळं पडलेलं का होईना पण भांडं चांदीचं होतं. भडव्यानी कुठून चोरून आणलं होतं की काय कोण जाणे. दोनशे रुपये तरी आले असते. पंचधातूच आहे असं म्हणून आपण पन्नास रुपय हातावर टेकवले होते. या आडूमाडू लोकांना काय कळणार, चांदी आहे का पंचधातू ? आता ते भांडं परत द्यायचं ? आत्तापर्यंत त्याने तीस रुपये दिले होते पण ते व्याजापोटीचे होते. विचार करून मामा म्हणाले, " असं बघ खडपा, गहाणवटीचा जिन्नस दिला तर पैशे बुडाले का नाही माझे ? , ... आं ? काय म्हणतोय मी ? "

हात जोडून खडपा म्हणाला, " आता तुमीच मायबाप आमचे. काय बी करा , अन माझ्या पोराचा जीव त्येवडा वाचवा. म्हंजी जालं बगा. " आधीच बेरकी असलेले डोळे अधिकच बेरकी करीत हलक्या आवाजात मामा म्हणाले, " खडपा, भांड तर गड्या तुला तसं नाही मिळायचं. पण एक बात आहे. "

खडपाचे डोळे आशेने चमकले. म्हणाला, " सांगा की मामा. " जानव्याच्या किल्लीने कान कोरीत मामा म्हणाले, " गंगी आता मोठी झाली असल नाही ? ...... त्याची प्रतिक्रिया अजमावित मामा पुढे म्हणाले, " नाही म्हणजे,रातच्याला गंगीला आणून सोड अन भांड घेऊन जा. दोन चार दिस राहील माझ्या कडं. ... भांडं आणून दे आणि गंगीला घेऊन जा. काय ?.... " आत उभ्या असलेल्या रेखाला गंगी एवढच ऐकू आलं.

खडपाची आग मस्तकात गेली. पण ती दाबून म्हणाला, " मामा तुमच्या ल्येकीवानी पोर, अन तिलाच मागतायसा ? "

मामा म्हणाले, " बघ बाबा, मी पडलो सावकार माणूस. आता तुझी सोय पाहायची मग तू माझी सोय नको पाहायला ? जा राधेला विचारून ये. ते बघ भांडं तुझ्या समोरच आहे. "

राधा , खडपाची बायको. गंगी आणि मंजा (मंजुनाथ) ही त्यांची दोन मुलं. खडपा हादरला. काहीही बोलला नाही. काठी आपटीत अधिकच म्हातारा होत तो गेटाबाहेर पडला. उन्हाला रणरणायला नुसता ऊत आला होता. कसातरी भेलकांडत तो घराशी पोचला. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. बारा वाजत आले. त्याला पाहून राधा बाहेर धावतच आली . म्हणाली, " आन्लं का भांडं. ?.... आं ? अवं काय इचारलं म्या ? पोर हातपाय वाकडं करतय बगा. " नवऱ्याचा चेहरा पाहूनच तिला काम न झाल्याचं समजलं. त्याची मजबुरी पाहून हळुवार आवाजात ती म्हणाली, " काय म्हनले मामा ? न्हाई द्येत का ?... काय वो ? "

खडपा पडेल आवाजत म्हणाला, " तसं न्हाई, देतील पन .... पन............ " राधा खेकसली. " अवो पन पन काय करतासा ? काय म्हनला त्यो माजोरडा ?....... खडपा तिच्या चेहऱ्याचा अंदाज घेत हलक्या आवाजात म्हणाला, " रातच्याला गंगी पायजेल, मंग मिललं भांडं..... " . मार पडणार याची खात्री असलेला शाळकरी पोराचा घाबरट भाव त्याच्या तोंडावर होता.

राधेनं मग शिव्यांच्या फैरी झाडल्या. " मेल्याचं मढं लावलं गाढवाला. आरं मुडद्या. " तिनं त्या तिरिमिरीत गवताच्या गंजीवर पडलेला विळा उचलला. तिला अडवीत खडपा म्हणाला, " अगं , अस्म काय करतीस ? ऐक माजं . आपन आपन गरीब मानसं. काय वंगाळ झालं तर पोलीस आपल्याला पकडतील. "

त्याला बाजूला ढकलीत ती त्वेषानं म्हणाली, " तुमी ऱ्हाऊ द्या. तुमच्यानी काय बी न्हाई व्हायचं. म्याच करतो आता काय ते. निस्त ऐकून घ्येतलत. कानफटीत न्हाई मारली का मामाच्या ?, हलकट मेला, मढं बशिवलं मेल्याचं. ". दात ओठ खात पदत खोचून ती निघाली.. ... खडपा तिला आवरायला धावला. तेवढ्यात आतून गंगी ओरडली. " आये, मंजा वघ कसं करतोय ? "

मंजाचं नाव ऐकल्यावर विळा टाकून ती आत धावली. मंजाला आकडी येत होती. जेमतेम पेजेवर त्यांचा दिवस गेला. धान्य असूनही शिजवायचं राधाला सुचलं नाही.

कशी तरी दुपार सरली. संध्याकाळच्या सुमारास मंजाच्या तोंडाला फेस आला आणि त्याने डोळे फिरवले मंजा त्यांना सोडून गेला होता. त्याचे थंडगार अंग पाहून ते सगळेच मग गळा काढून रडू लागले.

(क्र म शः )