खर्चाची रोजनिशी

बरीच मंडळी रोजनिशी लिहितात. रोजचा खर्च लिहून ठेवणे, हा काही लोकांचा छंद असतो. पण कधीकधी या छंदापायी मनस्तापही होऊ शकतो.

मी एकदा माझ्या वडिलांची रोजनिशी (खर्चाची) बघून स्वतः प्रयोग करायचे ठरवले. त्यावेळी महिन्याला मोजकेच १५०० रुपये मला मिळायचे. रोजच्या जेवणाचे पैसे, बसचे तिकीट, रेल्वेचा पास, बाकी चिल्लर खर्च, असं सगळं लिहायचं ठरवलं.

पहिला खर्च झाला तो रोजनिशी विकत आणायचा.  मग हळूहळू बाकी खर्च लिहून झाले. महिन्याअखेरिस माझ्याकडे १२ रुपये जास्त उरले होते.  

पण आता मी विचार करू लागलो की १२ रुपये आले कुठून ? ३-४ दिवस त्या विचारांमुळे दाढी करणे विसरलो. झोपही अपुरी होत होती. खाण्यावर लक्ष लागत नव्हते, अन त्यातच मलेरिया झाला. मग काय ? डॉक्टर, औषधं ....

तो खर्च लिहायचाच राहिला. अन आठवतही नव्हता. आता काय करायचे ? घरमालक दयाळू होते, त्यांनी सगळे ऐकून घेतले आणि शांतपणे म्हणाले, " गुजराथीत एक म्हण आहे, जेणू काम तेणू करे, बिजा करे तो गोता खाय".

मी चांगलाच गोता खाल्ला होता. तेव्हापासून कान पकडले अन रोजनिशी कायमची बंद केली.