छाया माझ्या मावळतीची सांगत आहे
"लांब जरी मी तुजला आता सोडत आहे"
मावळतीला मुजरा करणे रीत नसावी
परमेश्वरही पूर्व दिशेला पावत आहे
खांद्यावर माझ्या गठोडे वॅफल्याचे
त्यातच दुखऱ्या आठवणींना शोधत आहे
हिरवा मी बहरात असेतो झाड सजवले
पिकली पाने झाडच खाली फेकत आहे
ताज्या ताज्या सर्व फुलांचा दरवळ गेला
निर्माल्याचे जीवन जगणे शाश्वत आहे
एका जाणे एका उरणे अटळ जरी हे
एकांताची चाहूल मजला काचत आहे
घुसळण करता आयुष्याची झाल्या जखमा
दु:ख पचवणे लटके हसणे आदत आहे
गोंधळ का मी मांडत आहे व्रध्दत्वाचा?
संकट हरिणी तूच जगाची जाणत आहे
ओले डोळे सांज सकाळी का "निशिकांता"?
वाढुन आले ताट जसे ती दावत आहे
निशिकांत देशपांडे मो.न. 98907 99023
E Mail. दुवा क्र. १
प्रतिसादाची प्रतिक्षा