अतिशय आवडणारे एक आणि एकच स्तोत्र

स्तोत्रांची आवड मला कधी लागली ते कळलंदेखील नाही. म्हणतात ना खरी मैत्री कधी कशी झाली ते आठवणं खूप कठीण असतं तद्वतच ज्या गोष्टीच्या आपण प्रेमात पडतो तिच्याशी पहीली ओळख कशी होते हे आठवत नसावं. पण संस्कृत, मराठी स्तोत्राच्या नादमधुरतेने, गेयतेने तसेच सात्त्विक शब्दसंपत्तीने मनावर अनिवार मोहीनी घातली. स्तोत्रांमधील प्रकार कळू लागले. अष्टक, कवच, सहस्त्रनाम, द्वादशनाम, शतनाम, सूक्त , स्तुती, मानसपूजा हे प्रकार ओळखता येऊ लागले. प्रत्येकामधील खुबी कळू लागली तसतसे स्तोत्रांबद्दलचे आकर्षण शुक्ल पक्षातील चंद्रकलेप्रमाणे वाढतच गेले.

आज मला अनेक स्तोत्रे माहीत आहेत. मी असा दावा नाही करत की पाठ आहेत पण माहीत आहेत. याचे कारण जाल. पण जर मला एक आणि एकच स्तोत्र निवडायला सांगाल तर मला ते कठीण जाईल. कारण इतकी मौल्यवान रत्ने आहेत, इतकी सुभाषिक संपत्ती आहे की एकच स्तोत्र निवडणे खूप अवघड आहे. पण मी आपल्याला हेच कठीण काम देणार आहे.

या धाग्यावर आपण एक आणि एकच स्तोत्र येथे उधृत करायचे जे की आपल्याला अतिशय आवडते, भावते. आणि जमल्यास कारण द्यायचे.  

सुरुवात अर्थात माझ्यापासून करू यात. मला पार्वतीचे हे स्तोत्र अतिशय आवडते कारण त्यातील नादमधुर, सौंदर्यपूर्ण शब्द आणि प्राकृत भाषा. शिवाय पार्वती ही माझी इष्ट देवता आहे.

स्तोत्राचे नाव आहे - "धर्मराजाचे दुर्गास्तवन" -

श्री गणेशाय नमः|
नगरी प्रवेशले पंडुनंदन| तो देखिले दुर्गास्थान|धर्मराजा करी स्तवन|जगदंबेचे तेधवा||१||
जय जय दुर्गे भुवनेश्वरी|यशोदागर्भसंभवकुमारी|इंदिरारमणसहोदरी|नारायणी चंडीके अंबीके||२||
जय जय जगदंबे भवानी|मूळप्रकृती प्रणवरुपिणी|ब्रह्मानंदपददायिनी|चिद्विलासिनी जगदंबे||३||
जय जय धराधरकुमारी|सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी|हेरंबजननी अंतरी|प्रवेशी तू अमुचिया||४||
भक्तहृदयारविंद्रभ्रमरी| तुझिया कृपावलोकने निर्धारी|अतिमूढ तो निगमार्थ करी|काव्यरचना अद्भुत||५||
तुझिया आपंगते करून|जन्मांधासी येती नयन|पांगुळ धावे पवनाहून|करी गमन त्वरेने||६||
जन्माधाराभ्य जो मुका|होय वाचस्पतीसम बोलका|तू स्वानंदसरोवरमराळिका|होसी भाविका सुप्रसन्न||७||
ब्रम्हानंदे आदी जननी|तव कृपेची नौका करुनी|दुस्तर भवसिंधू लंघोनी|निवृत्ती तटा नेईजे||८||
जय जय आदी कुमारीके|जय जय मूळपीठनायिके|सकल सौभाग्यदायिके|जगदंबिके मूळप्रकृती||९||
जय जय भर्गप्रियभवानी|भवनाशके भक्तवरदायिनी|समुद्रकारके हिमनगनंदिनी|त्रिपुरसुंदरी महामाये||१०||
जय आनंदकासारमराळिके|पद्मनयन दुरितकानन पावके|त्रिविध ताप भवमोचके|सर्व व्यापके मृडानी||११||
शिवमानस कनक लतिके|जय चातुर्य चंपक कलिके|शुंभनिशुंभ दैत्यांतके|निजजनपालके अपर्णे||१२||
तव मुखकमल शोभा देखोनी|इंदुबिंब गेले गळोनी|ब्रम्हादिके बाळे तान्ही|स्वानंदसदनी नीजवीसी||१३||
जीव शीव दोन्ही बालके|अंबे तुवा नीर्मीली कौतुके|जीव तुझे स्वरुप नोळखे|म्हणोनी पडला आवर्ती||१४||
शीव तुझे स्मरणी सावचित्त|म्हणोनी अंबे तो नित्यमुक्त|स्वनंदपद हातासी येत|कृपे तुझ्या जननीये||१५||
मेळवुनी पंचभूतांचा मेळ|तुवा रचिला ब्रह्माडगोळ|इच्छा परतता तत्काळ|क्षणात निर्मूळ करीसी तू||१६||
अनंतबालसूर्य श्रेणी|तव प्रभेमाजी गेल्या विरोनी|सकल सौभाग्य शुभकल्याणी|रमा रमणे वरप्रदे||१७||
शंबरारी रिपुवल्लभे|त्रैलोक्यनगरारंभस्तंभे|आदिमाये आदिप्रभे|सकळारंभे मूळप्रकृती||१८||
जय जय करुणामृतसरीते|निजभक्तपालके गुणभरीते|अनंत ब्रह्मांडपालके कृपावंते|आदिमाये अपर्णे||१९||
सच्चिदानंद प्रणवरुपिणी|चराचरजीव सकलव्यापिणी|सर्गस्थित्यंतकारिणी|भवमोचनी महामाये||२०||
ऐकोनी धर्मराजाचे स्तवन|दुर्गादेवी झाली प्रसन्न|म्हणे तव शत्रू संहारून|रीज्यी स्थापीन धर्मा तू ते||२१||
तुम्ही वास करावा येथे|प्रकटो नेदी जनाते|शत्रू क्षय पावती तुमचे हाते|सुख अद्भुत तुम्हा होय||२२||
तुवा जे केले स्तोत्रपठण|हे जो करील पठण श्रवण||त्यासी सर्वदा रक्षीन|अंतर्बाह्य निजांगे||२३||