तुला आर्जवे मूक करतात डोळे
तुझी म्रूर्त हृदयात जपतात डोळे..!
उगा लाजते तू सखे चांदराती
कुठे चांदण्यांना ह्या असतात डोळे..?
तुलाही हवासा नवा चंद्र आहे
मलाही जरासे गं कळतात डोळे..!
करा म्यान साऱ्या अधिऱ्या कट्यारी
इथे जीव घेण्यास उठतात डोळे..!
कधी शब्द नि:शब्द होतात तेव्हा
किती अर्थ गर्भार वदतात डोळे..!
जरी भेटशी तू फिरूनी नव्याने
जुने सर्व संदर्भ स्मरतात डोळे..!
किती योजनांचा दुरावा सखे हा
तुझी वाट पाहून भिजतात डोळे..!
असे पापण्यांच्या मी घेतो मिठीत
जरी आसवांनी हे जळतात डोळे..!