मास्तर (दोन)

पु. लं. च्या आठवणी लिहिताना सुनीताबाईंनी म्हटलं होतं की हा माणूस कोणत्याही प्रसंगी विनोद करू शकतो! आणि एक किस्सा सांगितला होता.

एकदा वरांदा घाटात सुनीताबाई गाडी चालवत होत्या आणि मागे पु. लं.  वसंतराव देशपांड्यां बरोबर गप्पा मारत बसले होते. संध्याकाळ केव्हाच होऊन गेली होती आणि अंधारात गाडी चढणीवर असताना एकदम काही तरी समोर चमकलं म्हणून त्यांनी ब्रेक लावला आणि त्या शहारल्या; समोर एक धिप्पाड गवा गाडीकडे बघत उभा होता! त्यांनी लिहिलंय समोर साक्षात मृत्यू आणि वरांदा घाटाची चढण म्हणजे मागे जाण्याची सोय नाही  आणि तशात तो गवा गाडीच्या दिशेनं यायला लागला. वसंतरावांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं आणि ते म्हणाले, ‘पी. एल... ही इज मार्चिंग टोवर्डस अस! ’

यावर पु. ल. नि काय म्हणावं? ‘अग सुनीता बघ, रेड्याला कळू नाही म्हणून वसंता इंग्रजीत बोलतोय!

---------------------------------------------------------------------------------------------------------

मास्तरांना एका स्कूटरवाल्यानं उडवलं आणि त्यांच्या मित्रानं त्यांना ससूनला ऍडमिट केल्याचा मला फोन आला. ससूनला मी या काय कोणत्याच जन्मात गेलो नसतो पण मास्तर म्हटल्यावर कसाबसा धीर करून एका मित्राला घेऊन मी तिथे पोहोचलो. जनरल वॉर्डमध्ये कॉट्स इतक्या जवळजवळ लावल्या होत्या की एक माणूस दोन कॉट्समध्ये जेमतेम उभा राहू शकेल. वातावरण म्हणजे असं की मला स्मशानाची भीती वाटत नाही पण तिथे मला उभ्या उभ्या चक्कर यायला लागली. मास्तरांच्या हिप बोनचा बॉलच क्रॅक झाला होता आणि पाय समोरच्या बाजूला एका रॉडला टांगून ठेवला होता. त्यांच्या शेजारी त्याच अवस्थेत दुसरा एक पेशंट होता आणि कहर म्हणजे तो त्या परिस्थितीत, खुद्द हॉस्पिटलामध्ये बिनधास्त सिगरेट फुंकत होता!

बायको तीन लहान मुलांचा संसार मास्तरांवर टाकून ऐन उमेदीत साध्या न्युमोनियानं गेलेली, हातावर पोट असणारा हा माणूस, कुणाचा म्हणून आधार नाही. मी त्यांच्याकडे बघितलं, मास्तरचा चेहरा मात्र नेहमी सारखा प्रसन्न, मला शब्द फुटेना. काही तरी बोलायचं म्हणून मी म्हणालो ‘मास्तर तुमचा जोडीदार बघा सिगरेट ओढतोय’.

यावर मास्तरांनी काय म्हणावं? ‘बरं झालं डॉक्टरचा राउंड नाहीए’.

मूड कंटिन्यू करायला मी म्हणालो, ‘समजा आता डॉक्टर आले तर काय होईल? ’

मास्तर म्हणाले, ‘डॉक्टर त्याला म्हणतील बाहेर जाऊन सिगरेट ओढून ये! ’

---------------------------------------------------------------------------------------------------------

मास्तर  म्हणाले 'पोलिस येऊन गेले, मी त्यांना म्हणालो, आपली काही कुणाविषयी तक्रार नाही,  त्यांना ते म्हणत होते तिथे सही करून दिली'.

मला बुद्धाची तथाता काय आहे माहिती होतं, प्रसंग काय वाटेल तो असो मंजूर करायचा, तुमच्यावर प्रसंगाचा परिणाम शून्य होतो. मी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघितलं, मी आणखी दहा जन्म जरी साधना केली तरी किमान नियतीला तरी दोष दिलाच असता! मला वर्तमानात भविष्य दिसायलाच लागलं असतं. आपली काहीही चूक नसताना, प्रसंगाशी सामना करायची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती नसताना, रोजच्या जगण्याचे प्रश्न असताना विनाकारण नवा छळ?

---------------------------------------------------------------------------------------------------------

मला नियतीचा डाव कधीही कळला नाही, सत्याचा इतका उघड बोध असताना देखील नियतीला मला हे विचारता येत नाही की तुला किमान तारतम्य तरी नाही का? ओशों सारखा दुनिया झुलवणारा सिद्ध सुद्धा जेव्हा फासे उलटे पडायला लागले तेव्हा म्हणाला होता, ‘प्रकृती अंधी है! ’, तिथे आपल्या सारख्यांची काय कथा? मला वाटतं उगाच नाही ज्ञानी पुरुषांनी नियतीला स्त्रिधर्मी शब्द निवडला, एखाद्या मूर्ख स्त्रीसारखी नियती तिला जो रिझवू शकतो त्याच्यावरच वार करते! ऑर्थोपेडिक सर्जरीजमध्ये कधी घडू नाही ती गोष्ट मास्तरच्या बाबतीत घडली, मास्तरच्या संपूर्ण व्यवस्थित झालेल्या सर्जरीत इन्फेक्शन झालं आणि ते ही ससूनमध्ये! आता परत सगळं ओपन करायचं आणि अँटिबायोटिक्स देत इन्फेक्शन जाण्याची फक्त वाट बघायची की मग परत सर्जरी, किती वेळ लागेल काहीही सांगता येत नाही.

माझ्या क्लायंटचं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे मी त्याच्याशी बोललो आणि मास्तरांच्या मुलाला त्यांना ताबडतोप ससून मधून तिकडे हालवायला सांगितलं. मास्तरच निव्वळ नशीब की ससूनच्या पॅनेलवरचा एक स्किनस्पेशॅलिस्ट आमच्या क्लबला यायचा आणि त्याची ओळख लावून मी तिथून 'अगेंस्ट मेडिकल ऍडवाइस' डिस्चार्ज मिळवला. ससून मधून बाहेर पडणं सुद्धा जिकिरीच काम होतं.  मी संध्याकाळी हॉस्पिटलला फोन केला तेव्हा कळलं की ससून मधून त्या हॉस्पिटलमध्ये जायला अँब्युलन्सचे देखील पैसे त्याच्यांकडे नव्हते, पाय तुटलेल्या अवस्थेत मास्तर रिक्शानं हॉस्पिटलमध्ये आले होते.

मी डॉक्टरला सांगितलं, ‘आश्विन ट्रीट हिम ऍज इफ आय एम ऑन द बेड’

तो म्हणाला, ‘संजय, तू आहेस म्हणून सांगतो, फार काँप्लिकेशन्स आहेत किती वेळ लागेल, किती खर्च होईल आणि यश येईल की नाही काहीच सांगता येत नाही.

मी म्हणालो, ‘काय करतात अशा वेळी? ’

तो म्हणाला, ‘वी अँप्युट द लेग! ’

मी क्षणभर विचार केला आणि म्हणालो, ‘आश्विन आय स्टँड बाय हिम, गिव्ह हिम द बेस्ट पॉसिबल ट्रीटमंट, यू हॅव ऍन ओपन अकाउंट सो फार मनी इज कन्सर्न्ड.  

आश्विन माझ्याकडे बघत राहिला, ‘कोण आहेत हे? ’

मी म्हणालो, ‘मला शब्दात सांगता येणार नाही’

----------------------------------------------------------------------------------------------------------

मास्तरच्या घरनं वेळेवर डबा येणं शक्य नव्हतं, जवळच्या कँटिनला जाऊन मालकाला मी माझा फोन नंबर दिला आणि मास्तरचा रूम नंबर देऊन सांगितलं त्यांना वेळच्या वेळी खायला घालण्याची जवाबदारी तुमची, त्या रूमचा सगळा खर्च माझ्या नावावर लिहून ठेवा.

मानवी मनाबद्दल मला एक कुतूहल कायम आहे सहा-सहा वेळा फोन करून त्यांचा बँड मालक काय की त्यांनी तयार केलेला लावणीसाम्राज्ञी बरोबर अमेरिकाला जाऊन आलेला शिष्य काय की नातेवाईक काय सगळ्यांना परिस्थितीचा अचूक अंदाज आला होता, एकजण हॉस्पिटलला फिरकला नाही, नुसत्या फोन वरून मास्तरच्या मुलीकडे जिव्हाळ्याच्या चौकश्या!  मी मास्तरला म्हणालो 'मास्तर काय हो हे?

मास्तर म्हणाले  'लोक कामात असतील',  मी त्यांच्याकडे बघतच राहिलो, शब्दातला एकही स्वर हालला नव्हता,  सम चुकण्याची तर बातच सोडा!

संजय