मास्तर (तीन)

मास्तरांना पायावर उभं राहायला तीन सर्जरीज कराव्या लागल्या पण थोडं बरं वाटलं की मास्तर मी उशाशी ठेवलेला की-बोर्ड काढायचे आणि तिथल्या नर्सेस आणि बॉइजना त्यांची आवडती गाणी वाजवून दाखवायचे. मास्तर जिथे जातात तिथला मूड बदलवू शकतात, मग ती मैफिल असो की घर की हॉस्पिटल! मास्तर पहिल्यांदा वॉकर घेऊन रिक्शात बसले तेव्हा मला वाटलं बहुदा नियतीनं माझ्याशीच डाव खेळून बघितला असावा, एका पायात कायमचा दोष राहून सुद्धा मास्तर जसेच्या तसे होते!

ते मला पुन्हा शिकवायला यायला लागले तेव्हा माझ्या आईला काळजी वाटायची की हा माणूस एका जागी तीन-चार तास अशा अवघडलेल्या अवस्थेत बसू कसा शकतो, ती मला म्हणायची ‘अरे त्यांच्याकडे बघ, त्यांना त्रास होत असेल. ’ मी मास्तरांना विचारलं की मास्तर म्हणायचे ‘मी सगळी रग काढून टाकली आहे, काही होत नाही हो, तुम्ही वाजवा’.

माझं स्वरज्ञान शून्यापेक्षाही कमी होतं, मला फक्त लिरिक्स पाठ असायची आणि गाण्याचा नेमका मूड कळायचा. मास्तर एकेकाळी स्वतः ऑर्केस्ट्रात गायचे पण त्यांना लिरिक्स यथातथाच माहिती होती. सगळ्यात धमाल म्हणजे मला कोणती की ‘सा’ आहे कोणती ‘रे’ कोणती ‘कोमल रे’ वगैरे, आधी इकडचे तिकडचे क्लास केल्यामुळे, नक्की माहिती होती, पण मास्तर सरळसरळ कोणत्याही शुद्ध स्वराला कोमल म्हणायचे! त्यांच्या दृष्टीनं स्केल महत्त्वाचं आणि कमालीचं बिनचूक होतं, स्वराला कोमल म्हटलं काय की शुद्ध त्यानं काही फरक पडत नव्हता!

अशी ही आमची गुरू-शिष्य परंपरा त्यांच्या ऍक्सिडेंटपूर्वी आणि नंतर अनेक वर्ष चालू राहून सुद्धा मला एक गाणं धड वाजवत येईना.

एक दिवस मी त्यांना म्हटलं मास्तर रेकॉर्डचं स्केल काहीही असू द्या तुम्ही मला सगळी गाणी फक्त एका स्केलमध्ये शिकवा, मास्तर म्हणाले चला कोणतंही स्केल घ्या.

मी मग एक महान काम केलं सगळ्या दिग्गज संगीतकारांची  मला आवडणारी एकसोएक गाणी काँप्युटरवर अत्यंत सुरेखपणे अल्फबेटीकली अरेंज केली, म्हणजे कोणतंही गाणं मनात आलं की एका क्षणात ते लावता आलं पाहिजे! यात नकळतपणे माझ्याकडून मेलडी मुख्य ठेवून सगळे संगीतकार एका लेवलला आणले गेले, म्हणजे भले मला पिक्चर कोणता आणि संगीतकार कोण हे माहीत नसेल पण प्रत्येक गाजलेलं आणि की-बोर्डवर सुरेख वाजू शकेल असं गाणं माझ्याकडे होतं! हे कलेक्शन इतकं अफलातून झालं की ज्या मित्रांना मी त्याची सीडी करून दिली त्यांनी ती गाडीत लावल्यावर म्हणाले की आता गाडी विकू तेव्हाच सीडी काढू!

हा सगळा सोहळा संपन्न झाल्यावर एक दिवस मी मास्तरांना म्हणालो, 'मास्तर माझ्या सारख्या फक्त मूड आणि लिरिक्स कळू शकणाऱ्या माणसाला जर सगळ्यात ग्रेट संगीतकार कोण विचारलं तर मी म्हणीन ‘ओ. पी. नय्यर’!'

ते म्हणाले ‘का? ’

मी  म्हटलं, ' ओ. पी. नि स्वतः कबूल केलंय की त्याला संगीताचं कोणतंही शास्त्रीय ज्ञान नाही आणि तरीही त्याचं कोणतंही गाणं लागलं की तुमचं लक्ष वेधलंच म्हणून समजा आणि तुमचा मूड बदलायलाच हवा'.

मास्तर म्हटले ‘कोणतं गाणं घेता? ’

मी म्हटलं ‘जरा होल्ले होल्ले चल्लो मोरे साजना, हम भी पिछे है तुम्हारे’ घेऊया का?

 मास्तर म्हटले ‘त्यात काय अवघड आहे? घ्या’, आणि त्यांनी लगेच गाण्याचा पहिला पिक-अप वाजवला!

मी त्यांना म्हटलं ‘अहो थांबा, थांबा हे तुम्ही काय वाजवलंत?

ते म्हणाले ‘ते आता तुमच्या स्केलमध्ये आहे, तुम्ही काय हवं ते लिहून घ्या’.

 मी माझ्या आयुष्यातलं पहिलं नोटेशन लिहिलं ‘रेंसां, निधप, म’रे गम’प! ’

मग जे काय गाण्याच्या शब्दा-शब्दाचं नोटेशन मी काढलं त्यानं माझं मलाच धन्य वाटायला लागलं! एकदा ट्रिक कळल्यावर इंटल्यूडचं नोटेशन सहीसही काढणं सोपं होतं. मग मास्तरची शिकवणी संपल्यावर मी रियाज करायला लागलो आणि माझं गाणं पार मुखडा आणि अंतरा करत एकदम सही वाजायला लागलं! म्हणजे मला पार 'देखली हुजूर मैंने आपकी वफा, बातों ही-बातों- मे हो' गये खफा' असं अगदी म्हटल्या सारखं वाजवता यायला लागलं!

मी मग इंटरल्यूडशी सलगी करायला सुरुवात केली पण ते काही झेपेना. पुढच्या वेळी मास्तर आले तेव्हा म्हणाले ‘नुसतं नोटेशन वाजून उपयोगी नाही त्याचं वजन असतं’ आणि त्यांनी मला ते वजनात वाजवून दाखवलं. मी मग नुसत्या इंटरल्यूडचा रियाज चालू केला आणि मला ही त्यातले आघात जमायला लागले.

आणखी थोड्या रियाजा नंतर त्या गाण्यात पहिल्या इंटरल्यूडला आघात आहेत आणि दुसरं इंटरल्यूड पूर्णपणे वेगळं आहे आणि स्वरातून स्वर सलग वाजवत नेला आहे हे पण समजलं आणि की-बोर्ड मधून उमटवता देखील यायला लागलं. माझं गाणं मग पार पहिल्या पिक-अप पासून ते पार मुखडा, इंटरल्यूड, अंतरा करत शेवट पर्यंत सहीसही वाजायला लागलं!

मग एक दिवस मी मास्तरांना फोन केला ‘मास्तर जरा होल्ले होल्ले चल्लो कुठल्या स्केलला आहे? ’

ते म्हणाले ‘पांढरी दोन’. 

माझ्या की-बोर्डला स्केलचेंजर आहे त्यानी मी तो पांढरी दोनला सेट केला, काँप्युटरवर गाणं सुरू केलं आणि स्ट्रेट गाण्याबरोबर वाजवायला सुरुवात केली, मला आश्चर्य वाटलं, मी खुद्द आशा भोसलेला सहीसही साथ करत होतो अगदी इंटरल्यूड म्युझिक सहित!

संजय