आपलं असं नाही बुवा!

खरेदी म्हटलं की कसं माझ्या मनात मोर आणि अंगावर मोरपीस वगैरे फिरल्यासारखं होतं आणि नवऱ्याच्या अंगावर साळींदराएवढे काटे येतात. मग अचानक नसलेली थंडी वाढली आहे, वारं जोरात वाहतंय किंवा पाऊस येईल असं वाटायला लागतं नाहीतर मग हमखास नको त्या वेळी दुखणारा "डोकं" हा अवयव दुखायला लागतो. खरेदीला सोबत न येण्याची सगळी कारणं सांगून झाल्यावरही आपल्या निश्चयापासून ढळेल ती बायको कसली? "चल रे... मॉलमध्ये गेलं कि सगळे काही आपोआप ठीक होते" असं पक्कं आश्वासन देऊन त्याला मी माझ्यामागे पाय ओढत यायला लावते.

आमच्याकडे हे असंच असतं. मी कशी त्याच्याबरोबर खरेदीला जाताना एकदम खुश असते. त्याची पद्धत म्हणजे डोंगराएवढ्या दुकानात शिरायचं, बरोब्बर हवं त्या वस्तूंच्या मांडणीपुढे जाऊन उभं राहायचं आणि पाहिजे तेच म्हणजे जे घ्यायला आलोय तेच घेऊन पाचव्या मिनिटाला दुकानाबाहेर पडायचं.
पण आपलं असं नाही बुवा! दुकानदाराने एवढ्या कष्टाने मांडलेल्या सगळ्या गोष्टींना निदान एकदातरी नजरेखालून घालायलाच पाहिजे असा नियम असल्यासारखे अगदी पहिल्या ओळीपासून एकेक गोष्टी बघत जायचं, किंमती बघायच्या, त्यात अजून काही variety असतील तर त्याही बघायच्या, आवडलेली वस्तू कमीत कमी ४-५ वेळा तरी उलटीसुलटी करून पाहायची. हे सगळं करत असताना अचानक दुसरीकडे काही चांगलं दिसलं की तिकडे जायचं आणि परत तोच खेळ सुरू करायचा! एवढं सगळं करेपर्यंत नवरा गुणगुणायला लागलेला असतो 'घ्यायचं असेल तरच बघ नाहीतर इथेच सगळा वेळ जाईल' त्यालाही सवयीने आता माहित झालंय कि मला एका दुकानात खरेदी करायला कधीच आवडत नाही किंवा जिथे एखादी वस्तू आवडेल तिथे घेईनच असे काही नाही. जरा अजून २-४ दुकाने हिंडल्यावर मनात कसल्याकसल्या तुलना वगैरे केल्यावर मग परत पहिल्या दुकानात यायचं असतं. तोपर्यंत नवऱ्याच्या गुणगुणीचं भुणभूणीत रुपांतर झालेलं असतं. त्याच्या थकलेल्या जीवाला थोडी विश्रांती द्यायच्या हेतूने एक कोल्र्डींक/ चहाचा ब्रेक होतो.

मला एक कळत नाही, नवऱ्याला खरेदी या विषयाचा कंटाळा, तिटकारा कसा काय असू शकतो? वाण्याच्या दुकानात जाऊन एक किलो गुळ, नाहीतर अर्धा किलो दाणे घेऊन यावे तितक्याच अलिप्ततेने तो 'मला एकच जिन्स घ्यायची आहे' असे म्हणून खरेदीचा अपमान करतो आणि खरोखर जाऊन फक्त एकच जिन्स घेऊन येतो. एकतर त्याचं माप वर्षानुवर्ष बदलत नाही, रंग आधीपासूनच डोक्यात ठरवलेला असतो मग काय अवघड आहे? पण आपलं असं नाही बुवा! दरवेळी जिन्स घेताना एक आधीचा आणि एक पुढचा साइज ट्राय करून मगच घेते. परफेक्शन हो! आणि नुसती जिन्स घेऊन कसे येणार? जोडीला १-२ टॉप्स, मॅचिंग जोडे, वेगवेगळ्या ऍक्सेसरिज पाहिजेत का नको?

आजकाल या सोशल साईटस वर तो 'पॅशन' रकान्यात कार, बाईक्स, गॅजेटस असलं काहीबाही लिहितो पण मी मात्र खरेदी... खरेदी आणि खरेदी... असंच लिहिते... आपलं असं नाही बुवा!

मला आठवतंय जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा वडिलांनी नवऱ्याला ही बातमी कशी दिली असेल? 'तुळशीबागेत जायला अजून एक मेंबर आलाय! ' :) नवऱ्याचं तोंड कसं झाले असेल हे बघायला मी तिथे नव्हते हे त्याचे नशीब!

तर असं आहे! पण आता वाढत्या वयानुसार आणि अनुभवानुसार तो मला म्हणतो 'तुला जितका वेळ शॉपिंग करायची आहे करून ये. मी मुलीला सांभाळतो. हवं तर माझे कार्ड घेऊन जा पण 'कंसात' एकटी जा! आणि मग आनंदाने माझी पावलं दुकानाच्या दिशेने चालू लागतात.