कामाचे ठिकाणी नेट-सर्फिंग

कचेरीमधून, कामातून सवड काढून किंबहुना कंपल्सिव्हली आपण नेट-सर्फींग करत असतो. आपली सकाळ उजाडते तीच मेल पाहण्याच्या उत्सुकतेने. मग जी मॅरेथॉन सुरू होते ती मराठी संस्थळे, चेहरापुस्तकाची फेरी, विविध वृत्तपत्रे , मित्राला/मैत्रिणीला वाढदिवसाचे ग्रीटींग वगैरे पाठविणे आदी सोपस्कार होऊन शेवटी आपण कामाला लागतो. काम करताना देखील जरा मध्ये विरंगुळा म्हणून जालावरच फेरी मारतो. या सर्व गोष्टींमध्ये नाही म्हटलं तरी आपण आपला कामाचा मौल्यवान वेळ वायाच घालवत असतो. कारण कंपनी काही आपल्याला नेट-सर्फींगचे (= टिवल्या बावल्या करण्याचे)  पैसे देत नसते.

पण दुसरी एक बाजू विचारात घेतली तर हे नेट-सर्फींग खरच निरुपयोगी आहेत की ही एक गरज आहे? कारण तसं पहाल तर माणूस हा काही यंत्र नाही की जो डोळ्याला झापड लावल्यासारखा ९ ते ५ फक्त काम करत राहील. त्याला थोडीफार करमणूक लागणारच. ज्याला रिक्रिएशनल गरज म्हणू यात.

मग ही थोडीशी म्हणजे किती करमणूक/विरंगुळा आपल्याला पुरेसा वाटतो? नेट-सर्फिंगची आपण काही विशिष्ठ वेळ ठरवून घेता का? मुख्य म्हणजे या गोष्टीची आपल्याला टोचणी लागते का? विशेषतः कामाचे वेळी कोणी नेट-सर्फींग करत असताना पकडल्यास(=पाहील्यास), गुन्हेगार असल्यासारखे वाटते का? असल्यास का, नसल्यास का नाही?