३४. मृत्यू

मिळेल तेथे पाणी प्यालो,
जुळेल तेथे खूण जुळवली
तरीही होतो तसाच उरलो

बा. सी. मर्ढेकर

आपण काहीही केलं तरी तसेच उरतो, आपण अक्षय आहोत हे अध्यात्माचं सारसूत्रं आहे आणि ते फक्त माणसालाच समजू शकतं अशी वस्तुस्थिती आहे.

माणसाला ते न समजण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची सगळ्या वरची पकड! जे दिसेल ते, हाती लागेल ते तो पकडून ठेवायचा प्रयत्न करतो आणि मग ती पकड प्रथम मनावर आणि मग शरीरावर काम करते. या पकडण्याच्या मनोवृत्तीचा शरीरावर परिणाम म्हणजे एक एक अवयव आकसत जातो, शरीरात टॉक्सिन्स जमा होतात आणि मग पूर्ण शरीर एक वेदना होतं,... मृत्यूची सगळी मजाच त्यामुळे निघून जाते.

अस्तित्वात एकूण पाच निसर्ग निर्मित आनंद आहेत, म्हणजे ते मिळवण्यासाठी तुम्हाला काहीही शिकायला लागत नाही. एक, भोजन; दोन, विहार; तीन, विश्रांती; चार, प्रणय आणि पाच, उत्सर्ग. हे पाचही आनंद एकमेकांवर अवलंबून आहेत म्हणजे उत्सर्ग आणि भोजन एकमेकांशी निगडित आहेत, विहार आणि विश्रांती एकमेकांवर अवलंबून आहेत, प्रणय या चारही आनंदांचा परिपाक आहे आणि प्रणयाची तर सगळी मजाच देण्यात आहे.

माणसाची पकडून ठेवण्याची वृत्ती त्याला उत्सर्गाच्या आनंदापासून वंचित करते. हे सगळीकडे दिसतं, गाण्यात स्वर लावण्यापेक्षाही स्वर सोडण्याला महत्त्व आहे, पैशाचा सगळा उपयोग साठवण्यात नसून खर्च करण्यात आहे, शरीराचा उपयोग ते टिकवण्यात नसून वापरण्यात आहे, पण माणसाची पकडून ठेवण्याची सवय त्याला सोडून देण्याच्या आनंदापासून वंचित ठेवते.

तुम्ही कधी तरी हा प्रयोग करून बघा. समजा तुम्हाला तीन मजले चढून जायचे आहेत तर उत्छ्वासावर लक्ष ठेवा, श्वासावरची पकड सोडून द्या, जाणीवपूर्वक फक्त उत्छ्वास करत राहा तुम्हाला मोठा मजेशीर अनुभव येईल, तीन मजले चढून सुद्धा तुम्हाला दम लागणार नाही, उलट शारीरिक श्रमाची मजा येईल. ही उत्सर्गाची, पकड ढिली करण्याची मजा आहे!

मृत्यूविषयी माणसाला वाटणारी भीती आणि त्याचं जीवनातलं अत्यंत निषिद्ध स्थान हे माणसाच्या पकडीचं सर्वोच्च परिमाण आहे. शरीराला मृत्यू आहे हे कळण्याची क्षमता फक्त माणसात आहे, मृत्यू अनिवार्य आहे हे पण त्याला माहिती आहे तरीही तो मृत्यू नाकारतो हे आश्चर्य आहे!

माणसाच्या मृत्यू नाकारण्यामागे एक फार महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे आपल्याला समरसून जगायला मिळालेलं नाही असं त्याला नेहमी वाटत राहतं. याचं मूळ कारण फार मजेशीर आहे, जीवनात एकदा स्थैर्य आल्यावर माणूस जगण्यावरची पकड अशी काही घट्ट करतो की तो एकच दिवस पुन्हा पुन्हा जगत राहतो! याचं मानसिक कारण असं आहे की जीवन हा काही सत्तरऎंशी वर्षांचा सलग प्रवास नाही तर तो ‘एक दिवस अनेक वेळा’ असा फिनॉमिना आहे. म्हणजे जगायला, भोगायला, काही करायला तुम्हाला रोज आणि नेहमी एकच दिवस आहे! तुम्हाला आयुष्याचा रंग बदलायचा असेल तर तुम्हाला आज आणि अगदी सरळ सरळ सांगायचं तर आता काही तरी करायला हवं. मला जर गाणं शिकायचं असेल तर आज क्लास लावायला हवा, आता त्याची चौकशी करायला हवी आणि रोज गाण्याचा पाठपुरावा करायला हवा तर एक दिवस मला गाणं येईल. जोपर्यंत माझा आज रंगीत होत नाही तो पर्यंत माझं आयुष्य रंगीत होणार नाही कारण आयुष्य हे दिवसांचा गुणाकार आहे, वर्षांची बेरीज नाही. आज जर मी समरसून जगण्यासाठी काही केलं तरच माझा उद्या जेव्हा आज होईल तेव्हा तो बदलेल असेल, नाही तर माझा उद्या नेहमी आजचीच पुनरावृत्ती असेल.

मृत्यू हा सरते शेवटी घडणारा प्रसंग नाही तो एका अफलातून जगलेल्या आयुष्याचा परमोच्च बिंदू आहे, जर आयुष्यालाच रंग नसेल तर मृत्यूही बेरंग होईल. मृत्यू हा शेवटचा उत्सर्ग आहे, प्रणयाची मजा ही केंद्रीभूत उत्सर्गामुळे आहे तर मृत्यू हा संपूर्ण शरीराचा उत्सर्ग आहे, यू इजेक्ट द होल बॉडी, दॅट इज डेथ! मृत्यू एका क्षणात तुम्हाला शरीरापासून वेगळं करतो, शरीर लयाला जातं तुम्ही जसेच्या तसे राहता.  एका मृत्यूत हजारो प्रणयांची मजा आहे. जीवनावरची पकड ढिली करा तुम्हाला मृत्यूची सार्थकता कळेल!

संजय