घोळक्या मध्ये असूनी एकलेपण सोसले
गलबला होता तरीही भाग्य नाही जागले
वागतो माझ्या मनाला योग्य जे वाटे तसे
नोंद मी ठेवू कशाला? कोण कैसे वागले
सोसला मोठेपणा मी मान मुजरे ते किती !
काम झाले त्या क्षणाला दूर सारे पांगले
जन्मलो, मेलो कशाला? काय सांगू कारणे
कारणाविन मी जगी, या भावनेने ग्रासले
गारदी आले, परतले मारले नाही मला
भोगण्या अब्दा असे का मज जगाया सोडले ?
द्या मला फाशी उद्याला वेदना सोसेन मी
प्रीत धागे काचण्याचे दु:ख मोठे भोगले
जाहला मृत्यू जसा, मज पारसी दिक्षा दिली
जाळले, पुरले न मजला प्रेत सूर्या वाढले
जिंकलो मी शेवटी पण अश्वमेधा सारखे
मी न केले हो प्रदर्शन मीच मजला झाकले
हरवणे दु:खात आता सोड तू "निशिकांत" रे
ऊंच झोके घे बघाया विश्व हे तेजाळले
निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा