बोलकढी

धक्के बसतच असतात आयुष्यात. या ना त्या कारणाने. शारीरिक, मानसिक,
सांस्कृतिक, सामाजिक - कसेही! कॅलिफोर्नियातल्या दुकानात चितळ्यांची
बाकरवडी 'क्रिस्पी स्पायसी स्प्रिंग रोल्स' म्हणून आणि बेडेकरांची थालीपीठ
भाजणी 'ठेपले का आटा' म्हणून ठेवलेली दिसली तेव्हा बसलेला सांस्कृतिक
धक्का; मिसळ, साबुदाणा वडा, थालीपीठ यांचा जोडीला दादरच्या प्रकाशमध्ये
डोसा किंवा तत्सम दाक्षिणात्य पदार्थ मेन्यूकार्डावर दिसले तेव्हा, साक्षात
सिंहगडाच्या पायथ्याशी चाललेल्या नंग्यानाचाची बातमी वाचली तेव्हा,
रायगडावरच्या दारूपार्टीची पेपरात छापून आलेली छायाचित्रे पाहिली तेव्हा
बसलेला सामाजिक धक्का इत्यादी इत्यादी इत्यादी. त्यामुळे धक्क्यांची तशी
नवलाई उरलेली नाही. मराठी माणसाला आणि मराठी मानसाला तर नाहीच नाही! असले
कित्येक धक्के पचवल्याचं हा मराठी माणूस छाती पुढे करून, असलेल्या-नसलेल्या
मिशांना पीळ देत, दंड थोपटून सांगत आला आहे. त्यामुळे असल्या छोट्यामोठ्या
धक्क्यांचं काय ते कौतुक, नाही का? असले धक्के देण्याच्या निमित्ताने
चितळे बाजीराव रोडवरच्या दुकानातून थेट कॅलिफोर्नियात येऊन पोहोचले, हे काय
कमी आहे? त्यांच्या त्या पुण्यातल्या दुकानात जाऊन पाव किलो 'क्रिस्पी
स्पायसी स्प्रिंग रोल्स' मागितले असते, तर कदाचित मला आर्थिक दंडच झाला
असता; झालंच तर खाकी बुशशर्टातल्या, डोक्यावर पांढरी गांधीटोपी मिरवत
दुकानातली गिर्‍हाइकं हाकणार्‍या कुणी माझ्या सात पिढ्या दुकानाच्या आसपास
दिसू नयेत, अशी सोयही करून टाकली असती. पण जागतिकीकरणाच्या वार्‍यावर आरूढ
होऊन चितळ्यांनी, बेडेकरांनी, रामबंधूंनी जी 'जंप मारली' त्याचं एक मराठी
माणूस म्हणून मला कौतुक वाटलंच पाहिजे राव! मग थालीपीठ नि ठेपल्यातला,
बाकरवडी नि स्प्रिंग रोल्स मधला आणि त्यायोगे एकंदरच मराठी भाषा, संस्कृती,
मराठी मानसं आणि मराठी माणसं आणि बाकी सगळे यांच्यातला फरक दुर्लक्षित
करता यायलाच हवा. मराठी आहेच मुळी सोशिक!!

'जंप मारण्या'वरून आठवलं. आजकाल मराठीत काहीही मारता येऊ लागलं आहे.
शाळाकॉलेजातली पोरंपोरीही एकमेकांना 'फोन मारून', कोणत्या सरांच्या किंवा
बाईंच्या तासाला 'कल्टी मारायची', ते झाल्यावर कुठे भेटून 'चहा-सिगरेट
मारायची', कोणता पिच्चर 'टाकायचा' आणि या सगळ्या बेतात आडकाठी आणायचा कोणी
प्रयत्न केलाच तर त्याची कुठे कशी 'मारायची' हे सगळं आधीच ठरवून
विद्यालयांमध्ये जात असतात. अर्थात यात वावगं काहीच नाही. मराठी आहेच मुळी
सोशिक!! आणि नुसतीच सोशिक नाही, तर लवचिक आणि सर्वसमावेशक!! आणि ती तशी
नसती, तर आता आहे त्या अढळपदाला येऊन पोचली असती का?

पोचण्यावरून आठवलं. मराठी पिच्चर आणि नाटकं कुठे येऊन पोचलीयेत राव!
संगीत नाटकांच्या टेस्ट म्याचेसवरून आम्ही थेट दीड-दोन अंकी नाटकांच्या
ट्वेन्टी-ट्वेन्टीवर येऊन पोचलोत, आहात कुठे??!! आणि आमचे आजकालचे पिच्चर
क्कस्सले झगामगा झालेत बघितलेत का? अशोक-लक्ष्या-सचिनच्या वेळचे लो बजेट
पिच्चर जाऊन जमाना झाला आता! आता तर आमच्या पिच्चरमध्ये पण आयटम साँग असतं -
ते सुद्धा हिंदी आणि इंग्रजीत!! कानावर 'चमचम करता है यह नशीला बदन' पडतं;
पण डोळ्यांना मादक, 'मस्तीभरी' सोनाली बेंद्रे दिसते ना! सध्या
ऑस्ट्रेलियात असते. नवरा पंजाबी आहे, पण आपल्याला काय त्याचं?! सोनाली
मराठी आहे ना मूळची? तिच्या मूळच्या मराठी असण्याचा आपल्याला भारी अभिमान
असायला हवा!

मराठीपणाचा अभिमान वाटण्यावरून आठवलं. सुनील गावस्करपासून ते अजित
आगरकरपर्यंत (झालंच तर रमेश पोवारपर्यंत), शांतारामबापूंपासून ते महेश
मांजरेकरपर्यंत, दुर्गाबाई खोट्यांपासून ते सोनाली 'अप्सरा' कुळकर्णीपर्यंत
सग्गळ्या मराठी माणसांचा आम्हांला 'बाय डिफॉल्ट' अभिमान वाटत आला आहे;
नव्हे, तो तसा वाटलाच पाहिजे. तेच मराठीपणाचं व्यवच्छेदक का काय म्हणतात ते
लक्षण आहे. तो तसा वाटला नाही, तर लेंगा-बनियनवर भिंतीला तुंबड्या लावून
चहा ढोसत महाराष्ट्र टाईम्स वाचायचीही आमची लायकी नाही.

महाराष्ट्र टाईम्सवरून आठवलं. 'नॉट ओन्ली मिस्टर राऊत' पण केतकर,
टिकेकर, कुवळेकर - एकुणातच सग्गळे क्कस्सले धंदेवाले - आय मिन व्यावसायिक
झालेत ना?! झगामगा फोटो, म्हिंग्लिश बातम्या, असंख्य जाहिराती. त्यांच्या
सायटी पाहिल्यात का राव!! महाराष्ट्र टाईम्स तर वृत्तपत्र कमी आणि
काव्यपत्र जास्त झाल्यासारखा असतोय आज काल. परवा भारत वि. दक्षिण आफ्रिका
कसोटी सामन्याच्या वृत्ताचं शीर्षक काय होतं माहितीये? 'कॅलिसच्या मदतीला
आमला जमला; भारत दमला' (!!! ) सकाळसकाळचा 'सकाळ' पण मागे नाही बरं का!
समाजातल्या तळागाळातल्या हौशी लेखकुंना मराठी साहित्याचे पाईक आणि मानदंड
बनवण्यात सकाळाच्या मुक्तपिठाने
जो खारीचा वाटा उचललाय, त्याचा एक मराठी माणूस म्हणून तरी मला जाज्ज्वल्य
अभिमान वाटलाच पाहिजे. किंबहुना अशाच सदरांमुळे तरुणाईला आणि मराठीतील
नवागतांना मराठी साहित्यात रुची निर्माण होईल, असा दृढ विश्वास
'सकाळ'प्रमाणेच मलासुद्धा वाटत आला आहे.

मराठी साहित्यावरून आठवलं. आजकालचं मराठी साहित्य हे केवळ
वह्यापुस्तकांमध्येच अडकून न पडता संगणकावर आणि त्याच्या माध्यमातून
जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोचलंय म्हणे. खूप मराठी सायटी पण निघाल्यात
म्हणे. मराठीत त्यांना संकेतस्थळं का कायतरी म्हणतात. कविता, गद्य, चर्चा,
पाककृती, क्रिकेट, विज्ञान, भाषाशास्त्र - जगातला एकही विषय आता बाकी नाही,
ज्यावर मराठीत आणि मराठी सायटींवर लिहिलं गेलं नाही. इन्टरनेटने जगाला जवळ
आणलं आणि या सायटींनी जगभरातल्या मराठी माणासांना आणि मराठी मानसांना.
साहेबाचा साम्राज्यसूर्य जसा जगातल्या कोणत्याच भूमीवर कधीच मावळायचा नाही,
तसंच अगणित मराठी माणसं असंख्य मराठी सायटींवरून कधीच मावळत नाही. अर्थात,
जिकडे मराठी माणूस आला, तिकडे हेवेदावे आले, खटके उडणे आले, हमरीतुमरी
आली, 'बा'चा'बा'ची आली; पण ते असो. तेच तर मराठीपणाचं आणखी एक व्यवच्छेदक
लक्षण नाही का?! अनेकजण उपद्रवी असले तरी मराठीच आहेत ना?! मग मोठ्या, उदार
अंतःकरणाने वगैरे त्यांना माफ करायचे. मराठी आहेच मुळी सोशिक!! आणि नुसतीच
सोशिक नाही, तर लवचिक आणि सर्वसमावेशक!! आणि ती तशी नसती, तर आता आहे त्या
अढळपदाला येऊन पोचली असती का?

आजकाल काहीजण उगाचच तिच्या र्‍हासाच्या नावाने गळे काढत असतात. मग
जागतिक मराठी दिन वगैरे साजरे करून त्यांना दाखवून द्यावे लागते मराठी काय
आहे, मराठी कुठे आहे ते. आमची आजची मराठी पिढी बर्गरग्रस्त असली, तरी
महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाच्या वेळी आमच्याकडे खाद्यपेयांचे स्टॉल
लावतात ना, तेव्हा त्यांना साबुदाणा खिचडीच खावी लागते; बटाटावडाच खावा
लागतो आणि मसाला दूधच प्यावं लागतं. नको तिकडे लाड करायला मराठी कधीच शिकवत
नाही, कधी शिकवलंही नाही. आम्ही तिची डोळ्यांत तेल घालून, महाराष्ट्र
मंडळं काढून, मराठी पिच्चर बघून, बालमंदिरांमधून 'देवा तुझे किती सुंदर
आकाश' वगैरे शिकवून इतकी काळजी घेतो, तर तिचा र्‍हास होईलच कसा?
देशातल्यांना उगाचच काळजी. डोन्ट यू वरी मराठी मानूस! आमच्याकडे तर आम्ही
विश्व मराठी साहित्यसंमेलनसुद्धा केलंय. आम्ही सुरुवात केल्यावर मग मागाहून
दुबई, लंडन वगैरेची मंडळं जागी झालीत!!

विश्व मराठी साहित्य संमेलनावरून आठवलं. पुढच्या जागतिक मराठीदिनी विश्व
मराठी खाद्ययात्रा भरवायचा प्रस्ताव मंडळाकडे ठेवला तर? निलेश लिमयेला
वगैरे आम्हीही सारे खवय्ये आहोत हे दाखवून द्यायचे; सरकारकडून मस्त अनुदान
वगैरे मिळवायचे; शनिवार-रविवारच्या नाश्तापाण्याची, जेवणाची सोय करायची.
त्याच सुमाराला हिची डिलिवरी पण असेल; म्हणजे खाद्ययात्रेच्या निमित्ताने
आईबाबांची तिकिटंपण स्वस्तात होऊन जातील! काय आहे, या माझ्या बोलकढीपेक्षा
खरीखुरी गुलाबी सोलकढी, पांढराशुभ्र फळफळीत भात आणि पापलेटचा गरमागरम तुकडा
ताटात पडला की आमचं मराठीपण आणखी उठून दिसतं ना!