गोष्ट जुनीच ..... माणसं नवीन (भाग पाच)

आताशा सरला पण शिवणाच्या क्लासला जाऊ लागली होती. पोरीची जात, कामाकरता किंवा शिक्षणाकरता तिला फार दूर पाठवणं माईंना मानवणारं नव्हतं. तिच्या लग्नाचंही बघायचं होतं. सध्यातरी, शर्मिलाच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी तात्याला सरलासाठी स्थळं पाहण्यासाठी कळवलं होतं. तो इथे आला मगच कोर्टाच्या केसबद्दल बोलावं, असं त्यांनी ठरवलं.

उन्हाळा चालू झाला. मार्चमध्ये होळी पेटली. घरातली होळी यावेळेला शिऱ्यावरच झाली. पहिलीच होळी आणि बाबासाहेब नाहीत. खरं तर रंग लावणं हा प्रकार घरात कोणालाही आवडत नसे. पण बाबासाहेब म्हणजे घरातल्यांच्या दृष्टीने विक्षिप्तच. मागच्याच होळीला नेहेमी प्रमाणे ते स्वतःच रंग घेऊन आले. बरोबर सीताराम पण होता. भैयाच तो, होळी खेळणारच. मग घरात रंगाच्या उधळणीतून माईही सुटल्या नाहीत. सगळ्यांचे चेहेरे, दिवसभर नुसते भुतासारखे दिसत होते. नुसत्या आठवणींनी सरलाला भरून आलं. आपले काका आहेत असं तिला कधी वाटलच नाही. कितीतरी गोष्टी त्यांनी तिच्यासाठी केल्या होत्या. स्वतःच्या मुलाना आणली नाही एवढी खेळणी ते सरलासाठी आणीत. पार अगदी ती बारा वर्षाची होईपर्यंत. मग माईंनीच एक दिवस त्यांना सांगितलं, " अहो जरा भान ठेवा, ती आता खेळण्यांशी खेळण्या इतकी लहान राहिली नाही. न्हाती धुती पोर आहे ती. " त्यावर ते म्हणाले, " आपली मुलगी असती तर असं म्हणाली असतीस का? " त्यांच्या मनस्वी वागण्याला कोणीही पायबंद घालू शकलं नाही. गावात सुद्धा ते यासाठी प्रसिद्ध होते. मागच्याच लोळीच्या दुसऱ्या दिवशी त्यांना कॅन्सर असल्याचं कळलं होतं. त्यांनी मात्र हे दुखणं कधी गांभिर्यानी घेतलं नाही. गाववाले पण बाबासाहेबांना मानीत असत. अडलेल्यांची कामं करणं तर त्यांचा विरंगुळाच होता. कोणाला जामीन शोधून दे, कोणाला कर्ज मिळवून दे, तर कोणाच्या मुलीच्या लग्नाची बैठक अशी रंगवीत की स्वतःच्याच मुलीचं लग्न आहे. मुलं वाल्यांना ते खडसावून बऱ्याच गोष्टी सांगत आणि एक प्रकारचा वचक त्यांच्यावर ठेवीत. हुंडा घेऊ देत नसत. ते प्रथमच सांगत हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही. म्हणून तर शिवा सोनारानी, बाबासाहेबांना टाळून बैठक केली आणि मुलासाठी हुंडा घेतला. सगळा गाव त्याच्याकडे जेवायला गेला, पण त्याने कितीतरी मिनतवाऱ्या केल्या, तरी बाबासाहेब काही जेवायला गेले नाहीत.

आजच्या होळीला लोकांची बोंबाबोंब तर ऐकू येत होती. पण त्यांच्या घरी कोणीही रंग लावायला आलं नाही. नाही म्हणायला सीताराम तेवढा डोकावला. माईंच्या पाया पडला आणि त्यांच्या पायावर रंग वाहून तो आदबीने बाजूला उभा राहिला. म्हणाला, " ही होळी मी कधीच विसरणार नाही. " माईंनाही गंहिवरून आलं...... दोनच दिवसांनी एवढं उकडायला लागलं की परीक्षेला जाणारी मुलं सोडली तर रस्त्यावर सकाळी दहा वाजल्यापासून शुकशुकाट होऊ लागला. उन्हाळ्याने नुसता फोफाटा उडवला होता. अर्धा मार्च सरला. शशांकला अचानक कोर्टाच्या तारखेची आठवण झाली........ सत्ताविस मार्च तारीख होती. त्या दिवशी सोमवार होता. शशांक आणि वाडेकर वकिलासोबत साडेदहा पावणे अकराच्या दरम्यान माई तालुक्याच्या कोर्टाच्या आवारात शिरल्या. ऊन रणरणत होतं. माईंच्या मनात आलं आत्तापर्यंत कोणत्याही सरकारी कचेरीत जावं लागलं नाही, पण आज त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागत होती... तीही शर्मिलामुळे.... "कोर्टाची पायरी "... केवढा घातक शब्द! स्वतः चढा, की कोणी तुम्हाला चढायला लावो. दोन्ही प्रकार अप्रियच. बरेचसे लोक आपापल्या वकिलांसोबत घोळका करून उभे होते. काही कागदपत्र पाहात हलक्या आवाजात चर्चा करीत होते. पण एकूण वातावरण ताण आणणारं आणि कोंदट वाटत होतं. माई, वाडेकर आणि शशांक, कोर्टाच्या सावली असलेल्या व्हरांड्याच्या भागात उभे होते. बोलण्यासारखं काहीच नव्हतं. मध्येच वाडेकर म्हणाला, " बहुतेक शर्मिला वहिनी येणार नाहीत. मुंबईहून केवळ एका तारखेसाठी यायचं म्हणजे जरा....... " त्याने वाक्य अर्धवट सोडलं, कारण कोर्टाच्या गेटा बाहेरच शर्मिलाची गाडी उभी राहात होती. त्यातून तात्या आणि शर्मिला उतरत होते. तात्या घाबरत घुबरतच आत शिरला. रुमालाने घाम पुसण्याचा आव आणून त्याने चेहेरा झाकायचा प्रयत्न केला. न जाणो माईनी पाहिलं तर...? शर्मिला मुळे हे सगळं करावं लागतय. वाडेकर बोलायचा थांबला, तशी माईंची नजर गेटजवळ गेली. शर्मिला गाडीतून उतरत होती. बाहेरचं ऊन पाहून तात्या म्हणाला, " अगं अगं थांब जरा. " असं म्हणून त्याने गाडीतून छत्री घेऊन उघडली आनी शर्मिलाच्या डोक्यावर धरली. मग ते दोघे आवारात आले आणि व्हरांड्याच्या पायऱ्या चढू लागले. माईंना शर्मिलाच्या डोक्यावर तात्याने छत्री धरल्याचे अजिबात आवडले नाही. त्यांच्या मनात आलं, " तात्याला स्वतःचं असं मत नाही. बायकोचा गुलाम नुसता. ती पाहा कशी राणीच्या रुबाबात चालल्ये. " शेवटचं वाक्य त्या स्वतःशीच मोठयाने पुटपुटल्या. ते ऐकून वाडेकर म्हणाला, " माई काही म्हणालात का? " त्यांनी मानेनेच नाही म्हंटलं.

वाडेकर तात्याच्याच वयाचा. पण कमी बोलणाऱ्या माईंना, का कोण जाणे तो जाम घाबरून असायचा. त्याला शर्मिलाची अजिबात भीती वाटत नव्हती. ही बडबडणारी बाई, काही ही करणार नाही. असं त्याला सारखं वाटत होतं. त्याच्या मनात आलं भुंकणारी कुत्री चावत नाहीत (पण ते कुत्र्यांना माहित असायला हवं ना, आपण भुंकणारे आहोत, आपण चावायचं नाही, असा गंमतशीर विचारही त्याच्या मनात येऊन गेला). हळूहळू, तात्या, शर्मिला दोघेही व्हरांड्यात आले. कोर्ट रुम मध्ये गर्दी होती. त्यांचा वकील 'किटकिटे' समोर आला. मग तात्याचं लक्ष आधी वाडेकरकडे नंतर माई कडे गेलं. तो माई जवळ गेला त्याने तिला नमस्कार केला. शर्मिलाला हे अजिबात आवडलं नाही. तिच्या मनात आलं. " ही आपली "ऑपोनंट आहे, आपण तिच्याशी कशाला बोलायचं?, हे कोर्ट आहे. माई म्हणून त्यांचा मान घरी. "........ " माई कशी आहेस? घरी येऊन जाईन. " तात्याचे शब्द तिच्या कानावर आले. उत्तरादाखल माई म्हणालया, "तुला कशी दिसत्ये?. शर्मिला स्वतःशी पुटपुटली, " ह्या तात्याला अक्कलच नाही. आता घरी जाण्याची काय गरज आहे.....? " तिच्या मनात आणखीनही विचार येत होते. पण वाडेकरनी आत बोलावल्याने तिला काही बोलता आलं नाही....... जज्ज साहेब आले. स्थानापन्न झाले. कोर्टरूम मधल्या सगळ्यांच्याच उठाबशा झाल्या(म्हणजे जज आल्यावर उभे राहणे व ते बसल्यावर बसणे). एकामागून एक केसेस पुकारल्या गेल्या. शर्मिलाचीही केस पुकारली गेली. किटकिटे पुढे झाला. नक्की त्यांचं आणि जजसाहेबांचं काय बोलणं झालं, हे माईंना कळलं नाही. पण वाडेकर 'आमची तयारी आहे ' असं म्हणाल्याचं ऐकू आलं. मग किटकी टे म्हणाला, ' तुमची तयारी आहे हो. पण अजून काही कागदपत्र कोर्टाला सादर करायचे आहेत त्यासाठी वेळ हवा ना? ' मग कोर्टाने तारीख दिली..... १७ जून.... म्हणजे उन्हाळ्याची सुटी संपल्यावर आठ दिवसांनी. झालं... आजचा दिवस संपला. वाडेकर, माई, शशांक आणि शर्मिला, तात्या आणि किटकिटे बाहेर आले. मग माईंना तात्याचा आवाज ऐकू आला. "किटकिटे, खरं तर ही केस फाईल करण्याची गरजच नाही. " किटकिटे म्हणाला, " नाही कशी, अहो तुमच्या मिसेस्चा हक्क डवलला गेलाय, आणि तुम्ही म्हणता गरज नाही?. अहो, आपली बाजू "स्ट्राँग " आहे. (असं सगळेच वकील. म्हणतात ). मग शर्मिला पुढे झाली. हातातल्या नोटा त्यांच्या हातात सरकवीत म्हणाली, " बर आहे तर, वकील साहेब. १७ जूनला भेटू. मध्ये एकदा येऊन जाईन. "

माईंना मघापासून तिडिक आलीच होती. तात्या त्या तिघांना म्हणाला, " चला मी पण घरीच येतोय. गाडीतूनच जाऊ. " शर्मिला म्हणाली, " आता घरी आपण कशाला जायचं? " तात्या चिडून म्हणाला, " अगं असं कसं? एवढे आलोय आपण तर जायला नको? "... शर्मिला काहीच बोलली नाही. पण तिला तात्याच्या घाबरटपणाचा भयंकर राग आला. मग माई म्हणाल्या, " आम्ही जाऊ बसनी. तुला घरी यायलाच पाहिजे असं नाही. " तात्याला बोलण्याची संधी न देताच त्या वाडेकर आणि शशांकला घेऊन बस स्टँडकडे जाऊ लागल्या. तात्या त्यांच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहातच राहिला. शर्मिलाने त्याला म्हंटलं, " तात्यासाहेब, या, जरा भानावर या. माई गेल्येत. आपणही आपल्या घरी जाऊ. "... आता मात्र तात्या रागाने म्हणाला, " तुला नसेल यायचं ना तर तू थांब इथेच. मला गेलच पाहिजे. " शर्मिला चिडून म्हणाली, " चला एकदा. " आणि गाडीत बसत दबक्या आवाजात पुटपुटली. "घाबरट". ते ऐकून तात्यानी तोंड वाकडं केलं. मग ते लवकरच घरी पोचले.... सरला घरात एकटीच होती. माई अजून घरी आलेल्या नव्हत्या. तात्या आणि शर्मिलाला पाहून सरला भांबावली. पण स्वतःला सावरत तिने तात्याला विचारलं " माई कुठे आहे?. " तात्याने ती येत असल्याचं सांगितलं आणि संभाषण थोडक्यात आवरलं. सरला आतून पाणी घेऊन आली. शर्मिला घराकडे तुच्छतेने पाहात होती. तिच्या मनात आलं. काय घर आहे? काय ठेवलय? शीः! जरा या लोकांना चांगलं आणि व्यवस्थित वागायला नको. तिच्या तोंडावरचे भाव तात्याला कळले. पण तो काहीच बोलला नाही.

(क्र म शः)