जे जे घडले ते विसारावे जगण्यासाठी
दु:ख मनीचे कुरवाळावे हसण्यासाठी
ग्रिष्म उन्हाळा तगमग भारी नाराजी का?
वेड वसंताचे लागावे फुलण्यासाठी
क्षितिजापुढती काय असावे ओढ मनाला
मजला देवा पंख मिळावे उडण्यासाठी
दु:खच होते, कोणी कोठे दु:खी बघता
ओठावरती स्मीत फुलावे दिसण्यासाठी
देणे घेणे खाते लिहिणे बंद करू या
शुन्यामध्ये स्वप्न बघावे जपण्यासाठी
दरवळ घेउन आली, कानी कुजबुजली ती
रेतीवरती नाव लिहावे पुसण्यासाठी
व्यक्त कराया भाव मनीचे शब्द कशाला?
भाव तरल डोळ्यात दिसावे कळण्यासाठी
शस्त्र शिकारीसाठी तुजला हवे कशाला?
नजरेने नजरेस भिडावे फसण्यासाठी
"निशिकांता"ला राग जगाचा चिडचिड भारी
केंव्हा केंव्हा प्रेम करावे रुसण्यासाठी
निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा