शिक्षण एक घोळ

घोळ घातला गेला त्याचा हा पुढचा भाग. घरात संस्कार झाले ते घरापुरते सोयीचे होते पण घराबाहेरील वातावरणात ज्या समाजात मला दैनंदिन व्यवहार करायचे आहेत तिथले संस्कार व्यक्ती बदलतील तसे बदलणार, तसेच ते माझ्या बाबतीत बदललेले होते व आहेत. घरातले संस्कार वागणे, बोलणे, नाते ह्याची समज देणारे असतात. घराबाहेर व्यवहार कोणते, कसे असावेत ह्याचे संस्कार असतात. त्या विविध संस्कारांचे सर्व मान्य अनुभवाने तयार केलेले संस्कार म्हणजे शिक्षण हे मला पटले. प्राथमिक शिक्षण संपले तेव्हा कळले ते शिक्षण अपुरे होते. माध्यमिक शिक्षणात समजले मी जे शिकत होतो त्यापेक्षा वेगळे शाळेच्या बाहेर घडत होते. सर्व प्रथम फरक जाणवला तो भाषेचा होता. माझी भाषा कोणती व कशी असावी? ह्या भाषेचे मूळ काय असणार, ते कोण ठरवणार? दोन गावं अलीकडे व पलीकडे भाषा बदलते, शब्द बदलतात हे मी अनुभवले / अनुभवतो आहे.

अहो भाषा, शब्द, अक्षरे ह्यात सुसूत्रात नाही. ल हे अक्षर कसे असावे हा प्रश्न? क्त चा उच्चारात आधी त मग क येणार हे बरोबर का अर्धा क त्याला त जोडणार? ज्ञ लिहिता येत नाही म्हणून द्न्य लिहिणार? ह्या गोंधळातून मार्ग काढण्या करता अक्षरे निश्चित होणे आवश्यक आहे. टंक लेखनात सोय नाही म्हणून बदल करणे योग्य नाही. त्या नंतर शब्द हे कार्य दर्शक असणे आवश्यक आहे. कार्य दर्शवताना बरेच शब्द वापरणे आवश्यक असल्यास त्या शब्दांचे लघुकरण करणे शक्य आहे. डिजीटल स्टील कॅमेऱ्याला अंकित स्थिर चित्र प्रतिमा ग्राहक (ग्रहण करणारा विकत घेणारा नव्हे) असे शब्द वापरण्याऐवजी - अस्थप्रगा - म्हणता येणे सोपे होण्याची शक्यता आहे. फ्लॅश ह्या शब्दाला मराठी कार्य दर्शक शब्द क्षणिक प्रकाश - क्षप्र - म्हणावे का क्षणिक दिवा - क्षदि - म्हणावे? "कॅमेरा, फ्लॅश किती क्युट आणि ईझी आहे" असे व्ह्यूज असणार्‍या व्यक्तीचे मूळ शोधणे सोपे आहे. मी भाषा तज्ज्ञ आहे की नाही ह्याचा संबंध नसावा, पण असे शब्द घडू शकतील अशी कल्पना करणे म्हणजे ह्या देशात उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघण्या सारखे झाले आहे. प्रचलित शब्द देशी असोत की परदेशी असोत सोयिस्कर आहेत म्हणून वापरणे हे आळशी असणे, जबाबदारीतून पळ काढणे म्हणावे लागेल.

मी प्राथमिक शाळेत असताना जे मराठी शिकलो होतो त्याचा हा एक नमुना. "म्हणा पानी आनी भाकर. . .  गधडीच्या गधड्या कायले कोकलतो आहे. . . मुतायला जायचे हाय. . .  जा मेल्या मसणात?" मराठी शिक्षणाची ही माझी सुरुवात होती. आरक्षणाने हा घोळ घातला होता. कारण आरक्षण देताना पात्रतेला महत्त्व दिले नाही हाच घोळ झाला. आरक्षण चुकीचे नव्हते व नाही पण आरक्षित जागा दिल्या नंतर पात्रता असणे तितकेच आवश्यक का झाले नाही? विलेपार्ल्याच्या एका नावाजलेल्या शाळेत एक कोळीण (माफ करा इथे कोळी समाजाचा अपमान करण्याचा उद्देश नाही, त्यांच्या मुळेच आम्हाला चांगला ताजा "बाजार" खायला मिळतो त्यांच्या मेहनतीचा मी आदर करतो. फडकिणं, जोशीण, लेलीण, रानडीण वगैरे म्हणतात तसेच मी म्हटले आहे) आरक्षणातून प्राथमिक वर्गाची शिक्षिका म्हणून आली. तिचा हा संवाद, " इथे मासळी बाजार हाय की काय, ही शाला हाय, एकेकाला असा धुऊन काढीन की चड्डीत मुताल." ज्या पालकांनी ह्या शाळेतून शुद्ध मराठी भाषा शिकण्या करता, चांगले संस्कार घडावे म्हणून आपल्या मुला/मुलीला ह्या शाळेत पाठवले होते त्यांनी शाळेतून त्या शिक्षिकेला ताबडतोब बाहेर काढण्या करता धरणा दिला. शिक्षण खात्याचा अधिकारी (आरक्षित) आला, त्याने त्या शिक्षिकेला दम भरला होता, "एक वर्ष ह्या शाळेत शुद्ध मराठी बोलण्याची सवय करायची मग शिकवायला वर्गात जायचे, तोवर फक्त ह्या ताई सांगतील ती कामे करायची."

माध्यमिक शाळेत मी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान / रसायन शास्त्र, यांत्रिक तंत्रज्ञान, विद्युत तंत्रज्ञान, यांत्रिक नकाशा रेखाटण व प्रात्यक्षिके असे विषय चार वर्ष शिकलो होतो. त्या काळात ते माझ्या वयाला सोयीचे होते म्हणून माला चांगले वाटले. पण आज त्याचे दुष्परिणाम जाणवतात. अशा विषयातून तयार होणार्‍या प्रत्येक तंत्रज्ञाला नीतिमत्ता, माणुसकी, समाजाशी नाते हे समजण्याची आवश्यकता नसावी असे पाठ्यक्रम तयार करणार्‍यांना वाटले असावे म्हणून ह्या तीन विषयांना शिकवणे शिक्षण खात्याची जबाबदारी नसावी.

एक माणूस म्हणून ह्या समाजातल्या घटकाला घडवताना हे तिन विषय वेगळे न करता माध्यमिक शिक्षणातल्या प्रत्येक विषयातून ह्या तिन विषयांशी संबंधीत उदाहरणे, नमुने, प्रश्न तयार करणे सहज शक्य होते व आजही आहे, पण घोळ घालणे हा उद्देश लक्षात येणार नाही इतक्या सहजतेने महत्त्वाचा झाला आहे. तीन भाषा विषयातून नीतिमत्ता, माणुसकी, समाजाशी नाते असणारे लेख सहज देता येतील. हे तीन नि.मा.स गणित ह्या विषयातून मांडण्याची पद्धत सहज शक्य आहे. हेच भूमिती, विज्ञान / रसायन शास्त्र व इतर विषयांतून शक्य आहे.  त्या वयात शिक्षण घेऊन पैसा मिळवायचा हा एकच उद्देश होता, त्या शिक्षणाचा दर्जा व बाजारातील किंमत कळायला फार वेळ गेला. प्रशिक्षित कामगारांच्या बाजारात मी उतरल्यावर योगायोगाने, वेळोवेळी मला काम मिळाले, पैसा मिळाला, मात्र त्याही पेक्षा जास्त माझ्या कामाला जो विरोध झाला त्यातून विचारमंथन करावे लागले.   
 
नीतिमत्ता, माणुसकी, समाजाशी नाते ह्यांचे महत्त्व कमी झाल्याने नकळत घोळ सहज कसे घालावे ह्याचे तंत्रज्ञान वर्ग सुरु झाले आहेत ते कसे? प्रश्न-उत्तरे मार्गदर्शिका (गाइड), शिकवणी वर्ग एक व्यवसाय, स्वकेंद्रित अधिकारी वर्ग, ही यादी मोठी होण्याची शक्यता आहे. प्रश्न-उत्तरे मार्गदर्शिका (गाइड) च्या साह्याने परीक्षेत कोणत्याही मार्गाने गुण मिळवणे व प्रमाणपत्र पदरात पाडून घेणे हा एकच हेतू साध्य होत आहे. असे झाल्याने मागणीपेक्षा जास्त प्रमाणपत्र धारक नोकरीच्या शोधात उड्या मारण्यात अडकले आहेत. ह्याचा आवाजवी फायदा नोकरी मिळवून देणार्‍या संस्था घेत आहेत. नोकरी देणार्‍या कंपन्या कामगार पुरवठा जास्त असल्याने कमी पगारात चांगले कामगार मिळवण्याच्या घटना रोज घडत आहेत. छोट्या जागेत सुरु केलेल्या शिकवणी वर्गाच्या विविध शहरातून, गावातून, खेड्यातून शाखा सुरु झाल्या आहेत. ह्या शिकवणी वर्ग संस्थांना निकालाआधी पैसा मिळाल्याने त्या पैशाचा गैर वापर करून अपेक्षीत निकाल मिळवून देणे शक्य झाले आहे. तसे अपेक्षित निकाल मिळवून दिल्या बद्दल वर्तमान पत्रातून मोठ्या जाहिराती दिल्या जात आहेत. स्वार्थी असणे जिवंत राहण्या करता आवश्यक आहे पण स्वकेंद्रित असणे समाजाला अत्यंत घातक आहे. नीतिमत्ता, माणुसकी, समाजाशी नाते ह्या सगळ्या पासून दूर असणारे ते स्वकेंद्रित अधिकारी असे मी अनुभवले आहे. आज जागोजागी कायद्याने असे स्वकेंद्रित अधिकारी घडवण्याचे काम करणार्‍या सरकार मान्य संस्था दिमाखाने टोलेजंग इमारती बांधून उभ्या आहेत. असे घडवलेले अधिकारी अधिकार पदांवर फेवीकोल (काळा पैसा) लावून बसले आहेत, अपवाद वगळता.

मी अनुभवलेले ह्या शैक्षणिक घोळाचे काही नमुने पुढील भागात.