शैक्षणिक घोळाचे अनुभव

शिक्षण एक घोळ - पुढील भाग. हे अनुभव माझे आहेत ह्याला अजून पुरावा मी काय देणार? जे भोगायचे होते ते भोगले, पण ते न विसरता, "शब्दरूप आले मुक्या भावनांना", हा एक प्रयत्न आहे.

मी १९७२ ते ७५ ह्या काळात एका पॉलीटेक्निक मध्ये काम करत असताना घडलेला हा प्रसंग आहे. महाराष्ट्रातील इतर पॉलीटेक्निकचे प्रतिनिधी सेमिस्टर पद्धतीची समीक्षा व आवश्यक बदल ह्या करता आमच्या संस्थेत एकत्र जमले होते. त्या कार्यक्रमाकरता खास निमंत्रणाने अमेरिकेतील पॉलीटेक्निक संस्थांचा एक प्रतिनिधी आलेला होता. सेमिस्टर पद्धतीमुळे झालेल्या फायद्यांचे खूप कौतुक झाल्या वर अमेरिकी प्रतिनिधी बोलायला उठला. त्याने सुरुवातीलाच एक वाक्य टाकले होते, "सेमिस्टर पद्धतीचे फायदे, त्याचे कौतुक ऐकवून तुम्ही मला आश्चर्याचा एक धक्का दिला आहे. सेमिस्टर पद्धतीचे अपेक्षीत फायदे कमी व अनपेक्षित तोटे जास्त आढळून आल्याने अमेरिकेत हि पद्धत १० वर्षापूर्वी बंद झाली आहे." वाक्य संपताच तिथे जमलेल्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या. टाळ्या ऐकून पुढची वाक्ये न बोलता त्याने विषयांतर केले. मुंबई शहर, आमची संस्था वगैरे कौतुकास्पद चार शब्द सांगितले व तो खाली बसला. सेमिस्टर पद्धतीची समीक्षा करण्या करता जमलेल्या एकानेही सेमिस्टर पद्धतीचे तोटे काय होते हे जाणून घेण्याचे धाडस केले नाही. कदाचित महाराष्ट्रात सेमिस्टर पद्धतीने निर्माण झालेल्या तोट्यांची प्रसिद्धी होऊ नये असा उद्देश असेल. त्या कार्यक्रमात मी एक मदतनीस म्हणून असल्याने मी प्रश्न विचारणे अशक्यच होते.

कार्यक्रम संपल्यावर मी आमच्या विभाग प्रमुखाला प्रश्न टाकला, "त्या अमेरिकन प्रतिनिधी मार्फत सेमिस्टर पद्धतीचे तोटे कोणते होते हे समजून घेण्याचा प्रयत्न का झाला नाही?" माझा विभाग प्रमुख शिक्षणातील पगारी घोळकर होता, त्याने हे उत्तर दिले, "नसते प्रश्न विचारून माझ्या प्रगतीत मी उगीच अडथळा का म्हणून तयार करावा, असेच काहीसे मत इथे जमलेल्या प्रत्येकाचे आहे म्हणून ते अधिकारी आहेत व तुझ्या सारखे मदतनिसाचे काम करतात." ह्याला अपवाद असू शकतात, (हे वाक्य टाकून मूळ मुद्द्याला फाटे फोडणार्‍यांना शांत करण्याचा मी प्रयत्न केला आहे). ह्याच विभाग प्रमुखाने (तो सी के पी होता, मी ब्राम्हण) मला रात्र शाळेत प्रवेश मिळू दिला नव्हता, म्हणजे डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळू नये, म्हणून त्याने मला परवानगी पत्र १९७५ पर्यंत दिले नाही, शेवटी मला त्या संस्थेने सोडून जायला सांगितले तो एक अजून वेगळा अनुभव होता.

इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रयोग शाळेत माझी टेक्निशियन म्हणून निवड त्या वेळच्या प्राचार्य महाशयांनी(मराठी ब्राम्हण) केली होती. मी विद्यार्थ्यांना ऑसिलोस्कोप, सिग्नल जनरेटर, स्टॅबिलाईझ्ड पॉवर सप्लाय वगैरे उपकरणांचे कार्य व दुरुस्ती प्रत्यक्ष करून दाखवत होतो. त्याचे कौतुक त्या प्राचार्य महाशयांना होते. परंतु नवीन आलेल्या प्राचार्याला (गुजराथी) ते आवडले नाही, त्याकरता त्याने असे दुरुस्ती काम न दाखवण्याची लेखी नोटीस मला दिली होती. काही महिन्यात त्या नवीन प्राचार्याच्या बायकोचा भाऊ बी.ई. नापास, आमच्या विभागाचा प्रमुख म्हणून आला. त्याने मी उपकरणे दुरुस्त करताना सुरुवात कशी करतो हे नीट लिहून काढायला सांगितले. त्या लिखाणाचे तो दुरुस्ती मार्गदर्शिका नावाचे पुस्तक त्याच्या स्वत:च्या नावाने लिहिणार होता. एक उपकरण दुरुस्त करण्याचे लिखाण पूर्ण करण्याला आम्हा दोघांना चार महिने लागले. त्याने लिखाणाप्रमाणे उपकरण दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तो न जमल्याने मला कामावरून कमी करण्याची नोटीस प्राचार्याच्या मार्फत पाठवली होती.

इलेक्ट्रॉनिक्सचे सिलॅबस १९७४ ते ८४ चा अभ्यासक्रम निश्चित करण्या करता आमच्या विभागात महाराष्ट्र सरकार तांत्रिक शिक्षण निवड समितीची बैठक झाली होती. मला त्यात सहभाग मिळणे शक्यच नव्हते म्हणून मी माझ्या प्राध्यापक मित्राद्वारे एक सूचना केली होती, नव्याने वापरात आलेल्या एकत्रित बंदिश (इंटिग्रेटेड सर्किट) किंवा लघुरूप एब (आयसी) ह्या सुट्या भागावर आधारित माहिती व प्रयोगांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. त्या सूचनेला निवड समितीच्या अध्यक्षाने दिलेले उत्तर, "आपण सगळेच एकत्रित बंदिश पद्धतीचे
अजून फारसे जाणकार नसल्याने कोणताही निर्णय ह्या बैठकीत घेऊ शकत नाही". मी व माझा प्राध्यापक मित्र चिडलो होतो, चडफडण्या शिवाय आम्ही काहीच करू शकलो नव्हतो. अभ्यासक्रमाच्या अधिकार्‍याची ही अवस्था तर विद्यार्थ्यांना का दोष द्यावा? एकत्रित बंदिश (इंटिग्रेटेड सर्किट) किंवा लघुरूप एब (आयसी) हा शब्द कार्य दर्शक आहे असे माझे मत आहे म्हणून इथे वापरला आहे.

मी ह्याच संस्थेत असताना माझ्या प्राध्यापक मित्राला त्याचा एक मित्र भेटायला आला त्याने नुकतीच आय आय टी ची पदवी मिळवली होती. तो कौतुकाने सांगत होता. मायक्रोवेव्ह पद्धतीत वापरल्या जाणार्‍या फिल्टरचा प्रबंध त्याने लिहिला होता. तीन वेळा त्याने फिल्टर तयार केला होता व तिन्ही वेळेला ते साधन जळले होते. त्याला व त्याच्या मार्गदर्शकाला अजून ते साधन जळण्याचे कारण समजलेले नव्हते. (जे काही मी माझे मत सांगितले ते मी माझे कौतुक सांगत नसून उच्च शिक्षणातला बेजबाबदारपणा व घोळ दाखवतो आहे) मला राहवले गेले नाही,  "त्या साधनातील सुटे भाग जोडताना सामान्य बॅकेलाइट बोर्डाचा वापर केला असल्यास ते साधन जळणार हे निश्चित आहे. कारण मायक्रोवेव्हला सामान्य बॅकेलाइट बोर्ड इन्शुलेटर म्हणून काम करणार नाही." तो भेटायला आलेला मित्र आ वासून माझ्या कडे बघत होता. "अगदी बरोबर पटवून दिलेस, त्या वेळेला मला व मार्गदर्शकाला हे सुचलेच नाही. आम्ही सहज मोटोरोला कंपनीला ते साधन जळण्याचे कळवले तेव्हा त्यांनी आम्हाला पाठवलेल्या बोर्डाचे चित्र पाठवले व कळवले की आम्हाला तीन वेळा खास बोर्ड व त्याची माहिती पाठवली होती, परंतू आम्ही ते पॅकिंगचे सामान असल्याचे समजून त्या कडे दुर्लक्ष केले होते. जाऊद्या फारसे काही बिघडले नाही, मला पदवी मिळाली ना, झाले गेले विसरून जा." अहो त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला होता, त्या पदवी मुळे त्याला राजस्थानातल्या एका मोठ्या सरकारी कंपनीत मोठ्या हुद्द्याची नोकरी मिळाली होती. अशा स्वकेंद्रित शिकवलेल्या अधिकारी वर्गा कडून काय अपेक्षा करणार?

मी इराणला एका कंपनीत कामाला होतो. तिथल्या ३० प्रकारच्या पॅकिंग मशीनला ३० प्रकारचे तापमान नियंत्रक (टेम्प्रेचर कंट्रोलर) वापरले होते. प्रत्येक नियंत्रकाची तापमान मर्यादा १५० ते ३५० सेंटिग्रेड होती. ह्या सगळ्या नियंत्रकांचा मी अभ्यास केला. सुटे भाग पुरवणार्‍या विभागाने प्रत्येकी १० ह्या हिशोबाने ३०० नियंत्रक व त्याचे आवश्यक सुटे भाग त्या प्रत्येक उत्पादक कंपनी कडून दर सहा महिन्याला मागवले होते. मी त्याकरता एकाच पद्धतीचा नियंत्रक विविध पॅकिंग मशीनला कसा वापरता येईल? सुटे भाग जतन करण्याचा खर्च किती कमी होणार? दुरुस्ती प्रशिक्षण कसे सोपे होईल, ह्या सगळ्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ते कंपनीच्या मुख्य अधिकार्‍याला पटले. पण सुटे भाग खरेदी करणार्‍या अधिकार्‍याने ते शक्य नसल्याचे पटवून दिले. तसे केल्याने त्या तीस पॅकिंग मशीन कंपन्या आमच्या कंपनीला बाकी सुटे भाग देणे बंद करतील वगैरे कारणे दाखवली. त्यावर बरेच वादविवाद झाले. हळूहळू खरा प्रकार मला समजला. त्या खरेदी अधिकार्‍याला व इतर साथीदारांना त्या विविध कंपन्यांनी दर वर्षाला युरोप प्रवासात खास मित्र ह्या नात्याने संपूर्ण मदत करण्याचा अलिखित नियम पाळला होता.

हे असले स्वकेंद्रित अधिकारी प्रत्येक संस्थेत घुसलेले आहेत. संस्थेच्या प्रत्येक व्यवहारात असे व्यवहार केल्याविना एकही कंपनी / संस्था नीट काम करू शकत नाही अशी परिस्थिती आज आहे. जमिनीचे व्यवहार असो की नवीन यंत्र सामुग्री असो, कर्ज देवाण घेवाण असो की नफा तोट्याचे हिशेब असो की मंत्री पद मिळवण्याचा घोळ असो हि कारणे शोधताना ह्या सगळ्याची सुरुवात संस्कार विरहित शिक्षणातून होणार्‍या घोळामुळेच घडते आहे असेच माझे मत झाले आहे.    

२००३ - ४ ह्या काळात एका नावाजलेल्या संस्थेत कॉम्प्युटर ग्राफिक्स ह्या विषया करता फोटोग्राफी शिकवण्या करता मला बोलावले होते. त्यांच्या जवळ एकही कॅमेरा व इतर साधने नव्हती म्हणून मी माझा कॅमेरा व इतर साधने वापरणे आवश्यक होते. ४५ मिनिटाचा एक वर्ग घेण्या करता ती संस्था मला २०० रुपये देणार होती. तसे काम करणे शक्यच नव्हते. घरातून माझी साधने त्या संस्थेत ने आण करण्यात मला ३०० रुपये खर्च होता. मी जरा खोलात शिरून चौकशी केली. २००० सालापासून १८० विद्यार्थी/विद्यार्थिनींना कॅमेरा व इतर साधने न वापरता प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र त्या संस्थेने दिलेले होते. संस्थेने १८० विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या फीचे प्रत्येकी २ लाख रुपये मिळवले होते. आज त्या लुटलेल्या पैशातून व सरकारी अनुदानाने नवीन भव्य इमारत बांधून प्रशिक्षण देण्याची भली मोठी जाहिरात करण्यात ती संस्था मग्न आहे. माझी आई असल्या प्रकारांना वासरात लंगडी गाय शहाणी म्हणत असे.

२००७ ते ०९ मी एका प्रसिद्ध आंतर्राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून काम केले होते. पहिल्याच महिन्यात एका ११ वीच्या परीक्षेचा पर्यवेक्षक होतो. १२ पैकी ७ पेपर कोरे होते, तरीही त्या ७ पैकी ३ जण पास झाले होते. पुढील सहा महिन्यात अशाच एका ११ वीच्या परीक्षेचा पर्यवेक्षक असताना पुन्हा तसाच प्रकार घडला. ह्या वेळेला जरा जास्त माहिती मिळाली. कोरा पेपर दिलेल्या पैकी एकाला संध्याकाळी गृहपाठ न केल्या बद्दल शिक्षा म्हणून एका छोट्या खोलीत बसवले होते त्याच्या हातात त्याचा तो कोरा पेपर होता. त्या विषयाच्या शिक्षकाला त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून मुख्याध्यापकाला देण्याची सक्ती केकी होती, त्या उत्तरांची नक्कल तो मुलगा त्याच्या हस्ताक्षरात त्या सकाळी दिलेल्या कोर्‍या पेपर मध्ये लिहीत होता. हे का तर नक्कल केली असे सिद्ध करता येऊ नये. अशा प्रकारे तो मुलगा ती परीक्षा पास झाला होता. हि सोय अशाच उमेदवाराला होती जो प्रत्येक विषयाकरता चार अंकी रक्कम देण्यास तयार होता. माझ्या विषयाची उत्तर पत्रिका तयार करण्या करता सक्ती केली गेली पण मी ते नाकारले होते, मुख्याध्यापकाने ते लक्षात ठेवून अजून काही कारणे त्यात एकत्र करून मला नोकरी सोडण्याचा दबाव आणला होता. हा प्रकार
बर्‍याच शाळांतून प्रत्येक परीक्षेत घडतो आहे हे मला समजले आहे. 

"द्राक्ष आंबट आहेत. . " असा हा प्रकार आहे असे ठरवणारे महाभाग जरूर अशीच प्रतिक्रिया देतील ह्याची खात्री आहे. पण अशा बर्‍याच घटना प्रत्येक संस्थेत सरकारी अनुदाने मिळवण्या करता घडल्या आहेत व घडत आहेत. ह्याची यादी खूप मोठी आहे. झाडाच्या बुंध्याला कीड लागली आहे असे नसून झाडाच्या बी पेरणीतच घोळ झाला आहे म्हणून नवीन येणार्‍या फळाचे स्वरूपच वेगळे झालेले दिसते आहे. आर्किटेक्चर शिक्षणाचा घोळ पुढील भागात.