साहित्याशी जवळिक साधत -

साहित्याशी जवळिक साधत खुशाल हा बसणार ,
गोड बोलुनी सर्वांशी हा साहित्यातच रमणार !
 
भविष्यवाणी सांगुन गेले जाणते कुणी स्वर्गाला
भविष्यवाणी खोटी नव्हती , सांगतोच मी तुम्हाला !
 
बालपणीचा काळ सुखाचा - म्हटले आहे कुणीतरी
वह्या नि पुस्तक हाती पडता, चीरफाड मी नित्य करी ;

शैशवात मी वह्यांत लपवी - आठवणींची मोरपिसे ,
फूल सखीच्या गजऱ्यामधले पुस्तकातुनी दडवितसे !

कविता, कादंबरी नि नाटक यांचा नव्हता गंध मला
दैनिक मासिक पुस्तक साहित्याची आवड तरी मला !

साहित्याशी सलगी करणे मजला खूपच आवडले,
'वजनदार साहित्य'  मलाही रद्दीत घेणे परवडले !

दीड-दान्डीचे मोल मला; ते नसेल काही इतरांना -
हर्ष होतसे मलाच , माझा 'रद्दी डेपो' बघताना !!