कठोपनिषद / प्रथमवल्ली [वृत्त साकी] १ते१२]

माझ्या आजोबांनी लिहिलेले कठोपनिषदाचे भाषांतर दिसले  ते येथे लिहीत आहे त्यात हल्लीच्या शुद्धलेखनाच्या नियमा प्रमाणे फरक होईल त्या मुळे कदाचित कवितेच्या नियमाप्रमाणे चुकेल त्या बद्दल क्षमा असावी.

कथा पुरातन तुम्हा सांगतो मुनी वाजश्रवसाची /

भवपंथा हा क्रमावयाला दीपिकाच जे साची //१//

यज्ञ विश्वजित संपादुनियां सर्वस्व दे द्विजांला /

स्नान करोनी अवभृत अंती  यापरी कृतार्थ जाला //२//

पुत्र तयाचा स्वल्प वयाचा नचिकेता त्या नाम /

द्विज ते निघतां तयें पाहिले आटोपुनियां काम //३//

दानतया मिळाल्या तया द्विजांना धेनू चालती पुढती /

तयां पाहुनी तदंतरीं बहू संशयतरंग उठती //४//

वृद्ध वृद्ध त्या होउनी झाले जीर्ण  तयांचे देह /

प्रसवती कुठल्या? तेव्हांच नसे दुग्धाचा संदेह //५//

राहो हे परी तृण भक्षाया करण्या वा जलपान/

धेनुगणीं त्या कोणतेंही न दिसे तो अवसान //६//

म्हणे मनी तों' दाने ऐशा पावे स्वर्गा नर की? /

स्वर्ग कोठला तया मिळावा ? जातो अनंद नरकीं //७//

खिन्न जाहला विचार येतां यापरी अंतःकरणीं /

लडिवाळपणें पुसे पित्यातें नर्म  होउनी चरणी //८//

' कुणा ऋत्विजा बाबा ! आता देता दान मला हो' /

न बोलतां तो बोलायला तयें घेतला लाहो//९//

पुनः पुन्हा तो पुसे तयांतें 'कुणासी देता माला'? /

क्रोधें बोले पिता तेधवां 'देतो तुजसी यमाला'//१०//

कठिण शब्द ते श्रवणी पडतां त्याच्या अंतःकरणी/

उठती संशयतरंग; नुकले पितयाची त्या करणी//११//

म्हणे मनी तो ' शिष्यगणांमधिं अग्रेसर मज म्हणती /

मध्यम केव्हा म्हणती परी नच करती अधमीं गणती //१२//